राज्यातील सत्ता संघर्षावर आज पूर्णविराम लागणार का?- कुणाल राऊत
नागपुर – राज्यातील सत्ता संघर्षावर उद्या सोमवारी फैसला होणार आहे. यासोबतच राज्यातील शिंदे सरकारचे भविष्य ठरणार आहे. त्यामुळे या निर्णयाकडे राज्यात राजकीय वर्तुळात सर्वांचेच लक्ष लागले आहे. मात्र या संघर्षावर उद्या तरी पूर्णविराम लागेल काय असा प्रश्न महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष कुणाल राऊत यांनी उपस्थित केला आहे.
शिवसेना नेमकी कुणाची? उद्धव ठाकरेंची की शिंदेंची? धनुष्यबाण कुणाचा? आणि अपात्र आमदारांचे काय होणार? याचा उद्याच फैसला होणार आहे. आमच्याच बाजूने निकाल लागेल असे दोन्ही पक्षांना वाटत आहे. उद्या निर्णय लागतो की आणखी काही नवीन बेंच बसविण्यात येणार हे पाहावे लागणार आहे. वारंवार निर्णय पुढे ढकलण्यात येते आणि वारंवार घटनापीठ तयार करावे लागते. उद्या सरन्यायाधीश एन. व्ही. रमण्णा हे राज्यातील सत्ता संघर्षावर निकाल देणार आहेत.
विदर्भाच्या परिस्थितीवर बोलताना राऊत म्हणाले, विदर्भात जुलै आणि ऑगस्ट महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे हजारो शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान झाले. धान पीक, सोयाबीन, कपाशी सडायला आलेली आहे. उपमुख्यमंत्री, कृषीमंत्री, केंद्रीय समिती या सर्वांनी पाहणी दौरा केला, मात्र शेतकऱ्यांना अद्यापही नुकसान भरपाई मिळालेली नाही, असेही त्यांनी सांगितले. सत्तांतर झाले, मंत्रिमंडळ विस्तारही झाला एकही जिल्ह्यात पालकामंत्री नाही. त्यामुळे जनतेने कोणाकडे मागण्या मांडायच्या हा प्रश्न जनतेसमोर आहे.
——
Leave a Reply