नागपूर शहरात ‘शुभलोभदन सन्मान सोहळा’; ४८ मोबाईल परत करून पोलिसांचा नागरिकांशी विश्वास दृढ
नागपूर WH NEWS : पोलीस उपायुक्त, परिमंडळ क्र. ४, नागपूर शहर यांच्या हस्ते आज कार्यालयात ‘शुभलोभदन सन्मान सोहळा’ उत्साहात पार पडला. या सोहळ्यात चोरी/हरवलेले मोबाईल शोधून काढून नागरिकांना परत देण्यात आले.

पोलिसांकडे प्राप्त झालेल्या तक्रारींवरून सायबर टीमने केंद्र सरकारच्या CEIR पोर्टलच्या मदतीने विविध राज्यांत शोधमोहीम राबवून एकूण ४८ मोबाईल हँडसेट शोधून काढले. हे मोबाईल महाराष्ट्रासह मध्यप्रदेश, तेलंगणा, छत्तीसगड आदी राज्यांत आढळून आले होते. संबंधित मोबाईल मालकांना संपर्क करून आज ते त्यांच्या स्वाधीन करण्यात आले.

या वेळी पोलिस उपायुक्तांनी सांगितले की, नागरिकांनी मोबाईल हरवल्यास किंवा चोरी झाल्यास त्वरित तक्रार नोंदवावी व CEIR पोर्टलवर नोंदणी करावी. त्यामुळे मोबाईल ट्रॅक करणे सुलभ होते. पोलिसांनी नागरिकांचा विश्वास जपत सातत्याने अशा कारवाया सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला.
कार्यक्रमाला सहाय्यक पोलीस आयुक्त, विविध पोलीस ठाण्यांचे वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. उपस्थित नागरिकांनी पोलिसांचे आभार मानत समाधान व्यक्त केले.



