पोलीस आयुक्तांच्या एस्कॉर्ट पथकाची ध्वनीप्रदूषणाविरोधात पोलिसांची कारवाई; हिचकी बार अँड रेस्टॉरंटविरुद्ध गुन्हा दाखल!
नागपूर WH NEWS | १४ सप्टेंबर २०२६ :
नागपूर शहरातील पब, कॅफे, बार आणि रेस्टॉरंटमध्ये निर्धारित मर्यादेपेक्षा अधिक आवाज करणाऱ्यांविरोधात पोलिसांनी कारवाईचा इशारा दिला आहे. सदर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील न्यू कॉलनी परिसरात असलेल्या हिचकी बार अँड रेस्टॉरंट येथे मोठ्या आवाजात डीजे वाजवून ध्वनीप्रदूषण केल्याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांना सदर पोलीस ठाणे हद्दीतील पार्क अॅव्हेन्यू बिल्डिंग येथील हिचकी बार अँड रेस्टॉरंटमध्ये जोरजोरात डीजेचा आवाज सुरू असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर त्यांनी एस्कॉर्ट पथकाचे प्रमुख सहा. पोलीस निरीक्षक भगवान कोळी यांना कारवाईचे आदेश दिले.
त्यानुसार पोलिस पथकाने ध्वनीमापक यंत्राच्या सहाय्याने आवाजाची पातळी तपासली. यावेळी रेस्टॉरंटसमोरील रोडवर आवाजाची तीव्रता ६३.२ डेसिबल असल्याचे आढळून आले. त्यानंतर रात्री पुन्हा तपासणी केली असता ध्वनीची पातळी १००.६ डेसिबल इतकी असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, परिसर निवासी क्षेत्रात येत असून विंडोच्या माध्यमातून ध्वनीप्रदूषण होत असल्याचे आढळले. त्यानंतर हिचकी बार अँड रेस्टॉरंटमध्ये सुरू असलेल्या डीजेची तपासणी करण्यात आली. डीजे ऑपरेटर दिप शंकरराव मोरे (वय २२ वर्षे) याच्याकडे चौकशी केली असता बारमधील डीजे बंद करण्यात आला.
या प्रकरणी डीजे ऑपरेटरविरुद्ध सदर पोलीस ठाण्यात प्रचलित कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
पोलिस आयुक्तांचा इशारा
ध्वनीप्रदूषणाबाबत पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी परिसरातील पब, कॅफे, रेस्टॉरंट, बार तसेच डीजे ऑपरेटर यांना आवाहन केले आहे. शासनाने ठरवून दिलेल्या नियमांनुसारच ध्वनीक्षेपकाचा वापर करावा. नियमांचे उल्लंघन करून नागरिकांना त्रास होईल अशा पद्धतीने ध्वनीप्रदूषण केल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा पोलिसांनी दिला आहे.
ही कारवाई एस्कॉर्ट पथकाचे प्रमुख सहा. पोलीस निरीक्षक भगवान कोळी, पोउपनि. प्रताप्रकुमार ढाले, पो.हे.कॉ. अनुप लोलूसरे, अंमलदार शेख, सोमेश्वर निखारे, राजेश घोडे, नितीन नारे तसेच सदर पोलीस ठाण्याच्या अधिकारी व अंमलदारांनी केली.
