राणी लक्ष्मीबाई दुर्गा उत्सव मंडळाचा ११ दिवसांचा भव्य नवरात्रोत्सव; संगीत, नाटक, नृत्य, इतिहास आणि भक्तीचा अनोखा संगम!
-११ ते २१ ऑक्टोबरदरम्यान रंगणार सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी; मैथिली ठाकूर, सोनिया परचुरे, सुमीत राघवन यांच्यासह अनेक कलाकारांची उपस्थिती
नागपूर, WH NEWS ८ ऑक्टोबर २०२६ : राणी लक्ष्मीबाई दुर्गा उत्सव मंडळातर्फे यंदा ११ दिवसांचा भव्य नवरात्रोत्सव आयोजित करण्यात आला आहे. ११ ते २१ ऑक्टोबरदरम्यान होणाऱ्या या उत्सवात भक्तीसोबतच संगीत, नाटक, काव्य, नृत्य, इतिहास आणि मनोरंजनाचा अनोखा संगम पाहायला मिळणार आहे.

दररोज सायंकाळी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, महाराष्ट्रासह इतर राज्यांतील नामवंत कलाकार या उत्सवात सहभागी होणार आहेत. घटस्थापना, नवचंडी यज्ञ, महाप्रसाद, दसरा मिलन आणि विसर्जन अशा पारंपरिक धार्मिक कार्यक्रमांचीही रेलचेल असणार आहे.
बाजी प्रभूंच्या शौर्याची गाथा रंगणार
उत्सवाचे प्रमुख आकर्षण असलेल्या ‘पन्हाळगड ते पावनखिंड’ या विशेष सादरीकरणातून छत्रपती शिवाजी महाराजांचे निष्ठावान सरदार बाजी प्रभू देशपांडे यांच्या शौर्य, पराक्रम आणि बलिदानाची गाथा सादर केली जाणार आहे. स्वराज्यासाठी त्यांनी दाखवलेले धैर्य, निष्ठा आणि समर्पण या ऐतिहासिक सादरीकरणातून जिवंत केले जाणार आहे.
याशिवाय ‘खाऊ गप्पा आणि कविता’ या कार्यक्रमात विष्णू मनोहर आणि मुकुंद देशपांडे सहभागी होणार आहेत. मुंबईच्या सोनिया परचुरे आणि त्यांच्या टीमकडून ‘उत्तरा’ हे नृत्य सादर केले जाणार आहे.
‘ही दोस्ती तुटायची नाय’ या कार्यक्रमात चिन्मय सुमीत, अमृता बाणे, शुभंकर एकबोटे आणि सुमीत राघवन सहभागी होणार आहेत. तर १८ ऑक्टोबरला मैथिली ठाकूर यांच्या भजन संध्येला रसिकांना भक्तिमय वातावरणाचा अनुभव घेता येणार आहे.
२००६ पासून उत्सवाची परंपरा
राणी लक्ष्मीबाई दुर्गा उत्सव मंडळाची स्थापना २००६ मध्ये झाली. गेल्या १८ वर्षांपासून मंडळाच्या माध्यमातून नवरात्रोत्सवाचे आयोजन केले जात आहे. उत्सवात दरवर्षी सांस्कृतिक कार्यक्रमांसोबत सामाजिक आणि ऐतिहासिक विषयांनाही महत्त्व दिले जाते.
भारतीय स्वातंत्र्यलढा, निरक्षरता, ऑटिझम, बालमजुरी यांसारख्या सामाजिक विषयांवरही यापूर्वी कार्यक्रम सादर करण्यात आले आहेत. मंडळाच्या माहितीनुसार, उत्सवादरम्यान दररोज ५० हजारांहून अधिक नागरिक भेट देतात. उत्सवाचे नियोजन आणि व्यवस्थापनासाठी सुमारे ५० स्वयंसेवक कार्यरत असतात.
समाजसेवेचीही परंपरा
नवरात्रोत्सवाबरोबरच मंडळाच्या माध्यमातून वर्षभर विविध सामाजिक उपक्रम राबवले जातात. आदासा येथील मातोश्री वृद्धाश्रमाला मदत, अनाथालयांना पुस्तके व शैक्षणिक साहित्याचे वाटप तसेच पर्यावरणपूरक उत्सवाला प्रोत्साहन देण्यासाठी लक्ष्मीनगर येथे कृत्रिम विसर्जन टाक्यांची व्यवस्था अशा उपक्रमांचा त्यात समावेश आहे.
मंडळाचे अध्यक्ष प्रसन्न मोहिले आणि त्यांच्या टीमने सांगितले की, संस्कृती, परंपरा, इतिहास, भक्ती आणि समाजाचा सहभाग एका व्यासपीठावर आणणे, हा उत्सवाचा मुख्य उद्देश आहे.
नवरात्रोत्सवातील प्रमुख कार्यक्रम
११ ऑक्टोबर: घटस्थापना – सायं. ७ वाजता
१२ ऑक्टोबर: खाऊ गप्पा आणि कविता – सायं. ७ वाजता
१३ ऑक्टोबर: पन्हाळगड ते पावनखिंड – सायं. ७ वाजता
१४ ऑक्टोबर: हमसुफी बँड – सायं. ७ वाजता
१५ ऑक्टोबर: द बासुरीवाला कलेक्टिव्ह – सायं. ७ वाजता
१६ ऑक्टोबर: ही दोस्ती तुटायची नाय – सायं. ७ वाजता
१७ ऑक्टोबर: उत्तरा – सोनिया परचुरे आणि टीम – सायं. ७ वाजता
१८ ऑक्टोबर: भजन संध्या – मैथिली ठाकूर – सायं. ७ वाजता
१९ ऑक्टोबर: नवचंडी यज्ञ व महाप्रसाद – सकाळी ९ वाजता
२० ऑक्टोबर: दसरा मिलन – सायं. ६ वाजता
२१ ऑक्टोबर: विसर्जन – सायं. ७ वाजता
अधिक माहितीसाठी संपर्क : आनंद – 9923084400
राणी लक्ष्मीबाई दुर्गा उत्सव मंडळ, नागपूर
