गंगा-जमुना परिसरात लकडगंज पोलिसांची विशेष मोहीम; ६ महिलांना ताब्यात, ५ गुन्हे दाखल!
नागपूर WH NEWS : शहरातील गंगा-जमुना परिसरात अनैतिक कृत्यांना प्रतिबंध घालण्यासाठी आणि सार्वजनिक रस्त्यावरील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी लकडगंज पोलिसांनी गुरुवार, १९ नोव्हेंबर रोजी विशेष मोहीम राबविली. या कारवाईदरम्यान अनैतिक देहव्यापार प्रतिबंधक कायद्यांतर्गत ६ महिलांना ताब्यात घेण्यात आले, तर वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्या ऑटोचालकांविरुद्धही कारवाई करण्यात आली. या विशेष मोहिमेत एकूण ५ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
लकडगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गंगा-जमुना सिमेंट रोड आणि आतील परिसरात दुपारी १ वाजताच्या सुमारास ही मोहीम राबविण्यात आली. सार्वजनिक ठिकाणी अश्लील हावभाव व इशारे करून ग्राहकांना आकर्षित करत असल्याचे आढळून आलेल्या ६ महिलांविरुद्ध अनैतिक देहव्यापार प्रतिबंधक कायदा (PITA Act) कलम ७ व ८ अंतर्गत तीन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
याशिवाय गंगा-जमुना सिमेंट रोडवर अनधिकृतपणे ऑटो उभे करून वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्या ऑटोचालकांविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम २८५ अन्वये दोन गुन्हे दाखल करण्यात आले. त्यामुळे या मोहिमेत एकूण पाच गुन्ह्यांची नोंद झाली आहे.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुकुंद कवाडे यांच्या नेतृत्वाखाली महिला पोलीस अंमलदार आणि विशेष पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी या मोहिमेत सहभाग घेतला. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.
गंगा-जमुना परिसरातील सार्वजनिक ठिकाणी कायदा व सुव्यवस्था राखणे, अनैतिक कृत्यांना आळा घालणे आणि वाहतुकीचे अडथळे दूर करणे हा या मोहिमेचा उद्देश असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले. अशा प्रकारच्या विशेष मोहिमा यापुढेही सातत्याने राबविण्यात येणार असून, गैरप्रकार आणि वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्यांविरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुकुंद कवाडे यांनी दिली.
