नागपुर पोलिसांचा OYO हॉटेल्सवर कडक आदेश; ग्राहकांची ओळख, CCTV व नोंदणी बंधनकारक!नियम मोडल्यास होणार कार्यवाही -नांगरे पाटील
नागपूर WH NEWS | १२ सप्टेंबर २०२६
नागपूर शहरातील OYO अंतर्गत चालणारे हॉटेल, लॉज, गेस्ट हाऊस, होम-स्टे व तत्सम निवास व्यवस्थांमध्ये मानवी तस्करी, देहविक्री तसेच फसवणुकीसारख्या गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी नागपूर पोलिसांनी कडक मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ मधील संबंधित तरतुदींनुसार पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांच्या स्वाक्षरीने हा आदेश जारी करण्यात आला आहे.
पोलिसांच्या आदेशानुसार, OYO व इतर हॉटेल्सच्या मालकांनी आणि व्यवस्थापकांनी ग्राहकांची काटेकोर ओळख पडताळणी करणे आवश्यक आहे. खोली देण्यापूर्वी ग्राहकाचे आधार कार्ड, पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स किंवा इतर वैध ओळखपत्र तपासून त्याची नोंद हॉटेलच्या रजिस्टर अथवा डिजिटल प्रणालीमध्ये करावी लागणार आहे.
प्रत्येक Check-in आणि Check-out ची नोंद
हॉटेलमध्ये येणाऱ्या प्रत्येक ग्राहकाची Check-in आणि Check-out वेळ, नाव, पत्ता, मोबाईल क्रमांक तसेच ओळखपत्राचा प्रकार व क्रमांक नोंदविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. संशयास्पद हालचाल, बनावट ओळखपत्र, संशयास्पद बुकिंग किंवा कोणत्याही गुन्ह्याची शक्यता आढळल्यास तात्काळ संबंधित पोलिस ठाण्याला माहिती देणे बंधनकारक करण्यात आले आहे.
CCTV फुटेज जतन करणे बंधनकारक
हॉटेलच्या प्रवेशद्वारापासून बुकिंग केलेल्या खोलीपर्यंत आवश्यक CCTV कव्हरेज असावे, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे. हॉटेलच्या सार्वजनिक ठिकाणी CCTV व्यवस्था असणे अनिवार्य असून, त्याचे फुटेज किमान ९० दिवस किंवा त्यापेक्षा जास्त कालावधीसाठी सुरक्षित ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
पोलिस तपासासाठी आवश्यक असल्यास ग्राहकांची नोंद, बुकिंगची माहिती, CCTV फुटेज आणि इतर संबंधित अभिलेख तात्काळ उपलब्ध करून द्यावे, असेही आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.
अल्पवयीन मुला-मुलींना प्रवेश देताना विशेष काळजी
अल्पवयीन व्यक्तींशी संबंधित कायदे व सुरक्षा नियमांचे काटेकोर पालन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. अल्पवयीन व्यक्तीची ओळख आणि निवासस्थानासंबंधी पडताळणी केल्यानंतरच, आवश्यक परिस्थितीत पालकांसोबत प्रवेश देण्याबाबत दक्षता घेण्याचे आदेश आहेत.
अनधिकृत व्यक्तींना प्रवेश नाही
हॉटेलच्या खोलीमध्ये नोंद नसलेल्या किंवा अपरिचित व्यक्तींना प्रवेश देताना आवश्यक सुरक्षा पडताळणी करावी. नागपूर शहरातील OYO आणि इतर हॉटेल्समधील कर्मचारी व अधिकाऱ्यांची ओळखपत्रे, रहिवासी प्रमाणपत्र तसेच संबंधित कागदपत्रांची फाईल हॉटेल मालकांकडे अद्ययावत ठेवण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.
‘Zero Tolerance’ धोरण
मानवी तस्करी आणि देहविक्रीसारख्या गैरप्रकारांबाबत ‘Zero Tolerance’ धोरण स्वीकारण्यात आले आहे. अशा प्रकारच्या संशयास्पद हालचाली आढळल्यास संबंधित पोलिसांना तात्काळ माहिती देण्याचे स्पष्ट निर्देश आहेत.
अविवाहित जोडप्यांबाबत काय?
आदेशातील महत्त्वाच्या मुद्द्यांमध्ये अविवाहित जोडप्यांसाठीही नियम स्पष्ट करण्यात आले आहेत. दोन्ही व्यक्ती प्रौढ म्हणजेच १८ वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त वयाच्या असल्यास, केवळ अविवाहित आहेत म्हणून त्यांना हॉटेलमध्ये एकत्र राहण्यास प्रतिबंध नाही. मात्र त्यांची वैध ओळखपत्रे तपासणे आणि नोंद ठेवणे अनिवार्य आहे.
आदेशानुसार, विवाहिता किंवा अविवाहित व्यक्तींकडे आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स किंवा पासपोर्ट यापैकी वैध ओळखपत्र असणे आवश्यक आहे. PAN कार्डवर जन्मतारीख व कायमचा पत्ता नसल्यास ते ओळखपत्र म्हणून स्वीकारू नये, असेही नमूद करण्यात आले आहे.
आदेशाचे उल्लंघन केल्यास कारवाई
नागपूर पोलिसांनी जारी केलेल्या या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या संबंधित OYO हॉटेल, लॉज, गेस्ट हाऊस, होम-स्टे किंवा तत्सम निवास व्यवस्थेच्या मालकांवर भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम २२३ अंतर्गत गुन्हा दाखल होऊ शकतो, असा इशारा आदेशात देण्यात आला आहे.
हा आदेश ११ सप्टेंबर २०२६ रोजी रात्री १२ वाजल्यापासून ९ नोव्हेंबर २०२६ रोजी रात्री १२ वाजेपर्यंत लागू राहणार असल्याचे आदेशात नमूद आहे.
नागपूर शहरातील हॉटेल व्यावसायिकांसाठी हा आदेश अत्यंत महत्त्वाचा असून, ग्राहकांची सुरक्षितता, ओळख पडताळणी आणि गुन्हेगारीला प्रतिबंध करण्यासाठी पोलिसांनी नियमांची अंमलबजावणी कडक करण्याचा स्पष्ट संदेश दिला आहे.
