तिवसा तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करा; हेक्टरी एक लाखांची मदत व सरसकट कर्जमाफी द्या! -काँग्रेस व शेतकऱ्यांचा आक्रमक पवित्रा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना शेताच्या बांधावर घेराव घालून दिले निवेदन

Follow Us on :

 

तिवसा तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करा; हेक्टरी एक लाखांची मदत व सरसकट कर्जमाफी द्या!

-काँग्रेस व शेतकऱ्यांचा आक्रमक पवित्रा
पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना शेताच्या बांधावर घेराव घालून दिले निवेदन

तिवसा WH NEWS | तिवसा तालुक्यात पावसाने दडी मारल्याने खरीप पिकांवर निर्माण झालेल्या गंभीर संकटाच्या पार्श्वभूमीवर तिवसा तालुका तात्काळ दुष्काळग्रस्त जाहीर करावा, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाख रुपयांची विशेष मदत द्यावी तसेच सरसकट कर्जमाफी लागू करावी, या प्रमुख मागण्यांसाठी तालुका काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांसह सार्सी व शिरजगाव मोझरी परिसरातील शेतकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतली.

याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे महसूल मंत्री तथा अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी तिवसा परिसरातील शेताच्या बांधावर शेतकऱ्यांची भेट घेतली. यावेळी शेतकऱ्यांनी पावसाअभावी करपलेल्या पिकांची परिस्थिती पालकमंत्र्यांच्या निदर्शनास आणून देत आपल्या व्यथा मांडल्या. विशेषतः धोत्रा, माळेगाव, सालोरा, शेंदोळा बुद्रुक, मार्डी या कोरडवाहू भागातील शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाल्याची बाब सामाजिक कार्यकर्ते प्रशांत कांबळे यांनी यावेळी पालकमंत्री यांच्या निदर्शनास आणून दिली.

तिवसा तालुक्यात गेल्या दीड महिन्यापासून पावसाचा मोठा खंड पडल्याने सोयाबीन, तूर, मूग, कपाशी तसेच संत्रा पिकांवर मोठा परिणाम झाला असून अनेक ठिकाणी पिके करपण्याच्या स्थितीत आहेत, अशी माहिती शेतकऱ्यांनी दिली. मागील वर्षी अतिवृष्टीमुळे नुकसान झाल्यानंतर यंदा कर्ज काढून आणि मोठ्या अपेक्षेने पेरणी केलेल्या शेतकऱ्यांसमोर पुन्हा संकट उभे राहिल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.

यावेळी पालकमंत्र्यांना निवेदन देत तिवसा तालुक्याचा दुष्काळ सांख्यिकीच्या वस्तुनिष्ठ निकषांनुसार पहिल्या ट्रिगरमध्ये समावेश करावा, अमरावती जिल्ह्यात कोरडा दुष्काळ जाहीर करावा, महसुली व पीक कर्जाच्या वसुलीस स्थगिती द्यावी, शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन तातडीने पंचनामे करावेत आणि नुकसानग्रस्त पिकांना हेक्टरी एक लाख रुपये विशेष सानुग्रह अनुदान द्यावे, अशा मागण्या करण्यात आल्या.

शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला खरीप हंगाम पावसाअभावी उद्ध्वस्त होत असताना शासनाने विलंब न करता तातडीने मदतीचा निर्णय घ्यावा, अशी भूमिका तालुका काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी व उपस्थित शेतकऱ्यांनी मांडली. यावेळी तालुका काँग्रेसचे पदाधिकारी विश्वजीत बाखडे, सामाजिक कार्यकर्ते प्रशांत कांबळे, शहर कार्याध्यक्ष काँग्रेस सुनिल बाखडे, शशांक राऊत, संजय चौधरी, मनोज डीगांबरे,संदीप हगवणे, गौरव चौधरी ,सर्जा वाघमारे,आकाश माहोरे, पुरुषोत्तम मेश्राम आकाश मकेश्वर, निलेश गुडधे, प्रविण देशमूख, रवींद्र बनकर अभिजित साबळे, श्रीधर कोहळे, संदीप वानखडे, रमेश कोहळे, अमोल काळे शेतकरी, काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

News By

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

यह भी पढ़िए