आंबेडकरी चळवळीतील ‘ढाण्या वाघ’ रणजित मेश्राम यांचे निधन; समतेसाठी झटणारे वादळ शांत
नागपूर WH NEWS : आंबेडकरी चळवळीतील अभ्यासू विचारवंत, परखड वक्ते आणि क्रांतिकारी लेखक पत्रकार म्हणून ओळख असलेले रणजित मेश्राम यांचे निधन झाले आहे. त्यांच्या जाण्याने सामाजिक वर्तुळात हळहळ व्यक्त होत असून नागपूरसह राज्यभरातून शोकसंदेशांचा वर्षाव होत आहे.
समतेसाठी धगधगणारे वादळ म्हणून ओळखले जाणारे मेश्राम यांनी आयुष्यभर आपली लेखणी अन्याय, विषमता आणि व्यवस्थेतील त्रुटींविरोधात निर्भीडपणे चालवली. सत्याच्या बाजूने ठाम भूमिका घेणे, परखड मांडणी करणे आणि अभ्यासपूर्ण भाष्य करणे ही त्यांची खास ओळख होती.
त्यांच्या विचारांत धार होती, शब्दांत ज्वाला होती आणि समाज परिवर्तनाची तळमळ प्रत्येक कृतीतून दिसून येत होती. आंबेडकरी विचारसरणीचा प्रसार, सामाजिक न्यायासाठी सातत्याने लढा आणि वंचित घटकांच्या प्रश्नांवर आवाज उठवणे हे त्यांचे आयुष्यभराचे ध्येय राहिले.
आज एक सच्चा मानवतावादी रिपाई चळवळीचा सिपाही समाजातून निघून गेला आहे. ही हानी मोठी आणि न भरून निघणारी असल्याची भावना त्यांच्या सहकाऱ्यांकडून व्यक्त होत आहे.
त्यांचा संघर्ष, योगदान आणि समाजासाठीचे समर्पित कार्य यामुळे ते सदैव स्मरणात राहतील.
6 मार्च (शुक्रवार) स. ८-०० वा.रुग्णालयातुन थेट प्रा. रणजीत मेश्राम सरांचे पार्थिव इंदोरा बुद्ध विहार त्यांच्या राहते घरी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. प्रा. रणजीत मेश्राम सरांनी दलित पँथर आणि त्यानंतरच्या काळातील विद्रोही कवितेत मोलाचे योगदान दिले आहे. त्यांच्या कवितांमधून शोषितांच्या वेदना आणि संघर्षाचे दर्शन घडते.
ते विविध नियतकालिकांमधून सामाजिक प्रश्नांवर भाष्य करत असत. त्यांनी केवळ लेखनातूनच नव्हे, तर प्रत्यक्ष चळवळीत सक्रिय राहूनही काम केले आहे. विद्रोही सांस्कृतिक चळवळीत त्यांचा मोठा सहभाग राहिला आहे. महाराष्ट्रातील विविध साहित्य संमेलनांमध्ये त्यांनी आपली भूमिका आग्रहाने मांडली आहे. ते स्पष्टवादी होते. आपले विचार परखडपणे मांडीत. आदरणीय मेश्राम सरांच्या चित्तास सद्गती लाभो.
6 मार्च (शुक्रवार) स. ८-०० वा. रुग्णालयातुन थेट प्रा. रणजीत मेश्राम सरांचे पार्थिव इंदोरा बुद्ध विहार त्यांच्या राहते घरी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे.
स. ११-०० वा. इंदोरा ते वैशाली घाट येथे अंत्यसंस्कार उरकण्यात येईल.
WH NEWS चा अखेरचा जय भीम!
साश्रुनयनांनी भावपूर्ण श्रद्धांजली.



