शिरजगाव मोझरी ते जळका रस्त्याचे नूतनीकरण न झाल्यास सोमवार पासून आमरण उपोषण करणार
– सामाजिक कार्यकर्ते प्रशांत कांबळे यांचा इशारा
– अर्थसंकल्पीय अधिवेशनात सरकारने रस्त्याच्या नूतनीकरणासाठी बजेट मंजुरी द्यावी
तिवसा WH NEWS : जळका ते शिरजगाव मोझरी १५.८ किलोमीटर रस्त्याचे तातडीने नूतनीकरण, रुंदीकरण आणि याच मार्गावरील पुलांची उंची वाढवण्याचे काम आणि स्ट्रीट लाईट, सूचना फलक लावण्याच्या मागणीसाठी शिरजगाव मोझरी, धोत्रा, सालोरा, शेंदोळा जळका, माळेगाव येथील नागरिकांनी तिवसा तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले. राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशनात तातडीने रस्त्याच्या नूतनीकरणाठी भरीव तरतूद करावी अन्यथा येत्या सोमवार (ता ९) पासून धोत्रा गावात आमरण उपोषणाचा इशारा या निवेदनाच्या माध्यमातून दिला आहे.
जळका ते शिरजगाव मोझरी हा १५.८ रस्त्यावर ६ गावांचे दळणवळण आहे. शिवाय, या मार्गाला लागून असलेल्या तब्बल १० गावातील विद्यार्थी, नागरिक याच रस्त्याचा वापर करून मोझरी गाठावी लागते. यापूर्वी सर्वात शेवटी २०१२ मध्ये या रस्त्याचे अत्यंत निकृष्ट दर्जाचे नूतनीकरण झाले होते. त्यानंतर फक्त डागडुजीच्या माध्यमातून रस्त्याची चाळण झाली आहे. सध्या रस्त्यात खड्डे की खड्यात रस्ते अशी परिस्थिती जळका ते शिरजगाव मोझरी गावापर्यंतच्या रस्त्याची वाईट परिस्थितीत आहे.
जेष्ठ नागरिक, विद्यार्थी अनेकवेळा गाडी, सायकली घेऊन पडले आहे. हृदय विकाराच्या रुग्णांना सुद्धा रस्त्यावरील खड्ड्यातून वाट काढतांना त्रास सहन करावा लागतो आहे. गावात येणाऱ्या बसेस नादुरुस्तीचे प्रमाण सुद्धा वाढले आहे. परिणामी विद्यार्थ्यांना महाविद्यालय, शाळेत पोहोचण्यासाठी उशीर होतो. मात्र गेल्या १५ वर्षांपासून गावकऱ्यांना रस्त्यावर नरक यातना सहन कराव्या लागत आहे.
त्यामुळे येत्या ५ दिवसात तातडीने जळका ते शिरजगाव मोझरी पर्यंतच्या १५.८ किलोमीटर रस्त्यासाठी तातडीने अर्थसंकल्पीय अधिवेशनात भरीव निधी मंजूर करून नूतनीकरणाचे काम सुरू करावे अन्यथा जळका ते शिरजगाव मोझरी या मार्गाच्या मध्यभागी म्हणजे माणिकग्राम धोत्रा या गावात सोमवार (ता.९) रोजी पासून बेमुदत ठिय्या राहूटी आमरण उपोषणाला सुरुवात करत आहे. जो पर्यंत या मागण्या पूर्ण होत नाही. तोपर्यंत आमरण उपोषणातून माघार घेणार नसल्याचा इशारा या गावातील गावकऱ्यांनी दिला आहे. याचे निवेदन जिल्हाधिकारी अमरावती, अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग तिवसा, पोलीस निरीक्षक तिवसा आणि कुर्हा पोलीस स्टेशन यांनाही निवेदन देण्यात आले आहे. यावेळी अनिल मेश्राम, नामदेव भोगे, प्रभाकर कावरे, गंगाधर मनोहर, शशुपाल तूरकाने, किशोर खवले, नरेश येरणे, एड.विकास तूरकाने,पंडित वावरे, जीवन वानखडे, लोचन नांदणे, प्रीतेश ठवरे, विजय कुरळकर, रामभाऊ उमप, सुरेंद्र गणेश, भास्कर बेले, प्रकाश चिचखेडे, तुलसीदास गडलिंग, धनंजय वैद्य, वैभव जीभकाटे, सुरेंद्र मेश्राम, स्वप्नील तूरकाने, साहेबराव होले, संदीप हगवणे, सुधाकर तूरकाने यांची उपस्थिती होती.
—————-
खड्डेमय रस्त्यातून वाट काढतांना वाहनांचे नुकसान होत आहे. एसटी बसेस नादुरुस्तीचे प्रमाण वाढले आहे. रुग्णांचे प्रवासात हाल होत आहे. त्यामुळे तातडीने या रस्त्याचे नूतनीकरण गरजेचे आहे.
– मंगेश डेहनकर , नागरिक
—————-
विद्यार्थ्यांना शाळा आणि ट्यूशनसाठी मोझरी जावे लागते. चार गावातील विद्यार्थी या रस्त्याचा सायकल ने प्रवास करत असतात. रस्ता अरुंद आहे. स्ट्रीट लाईट नाही. सूचना फलक नाही. त्यामुळे आम्ही पालकांनी मुलांना शाळेत कसे पाठवायचे त्यामुळे तातडीने रस्ता नवीन करण्यात यावा.
– संदीप हगवणे, नागरिक



