ज्येष्ठ पत्रकार प्रशांत कांबळे यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार प्रदान
तिवसा: महाकवी वामनदादा कर्डक यांच्या स्मृती दिनाचे औचित्य साधून प्रकाशदीप बहुद्देशीय संस्था वरखेड, महाकवी वामनदादा कर्डक बहुद्देशीय संस्था आणि संबोधी बहुद्देशीय संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या विशेष सोहळ्यात ज्येष्ठ पत्रकार प्रशांत कांबळे यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तिवसाचे तहसीलदार मयूर कळसे यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि विविध क्षेत्रांतील साहित्यिक, उद्योजक, प्रसिद्ध गायक तसेच आंबेडकरी विचारवंतांच्या उपस्थितीत हा दिमाखदार सोहळा पार पडला.
गेल्या २० वर्षांपासून राज्यातील राज्यस्तरीय पत्रकारितेत सक्रिय असलेल्या प्रशांत कांबळे यांनी मंत्रालय, विधिमंडळ तसेच राज्य व केंद्राच्या राजकारणात आपल्या धारदार लेखणीने एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या अनेक शोधपत्रकारितेची गंभीर दखल घेत लोकप्रतिनिधींनी विधानसभा आणि विधानपरिषदेच्या सभागृहात लक्षवेधी व तारांकित प्रश्नांच्या माध्यमातून सरकारला वेळोवेळी जाब विचारला आहे.
आपल्या दोन दशकांच्या पत्रकारिता प्रवासात त्यांनी अनेक महत्त्वाचे पुरस्कार पटकावले आहेत. मुंबईतील मॅनहोल सफाई कामगारांच्या आयुष्यावरील त्यांच्या ग्राऊंड रिपोर्टची दखल घेऊन वर्ष २०१४ मध्ये त्यांना राज्य शासनाचा पु. ल. देशपांडे उत्कृष्ट दूरचित्रवाणी पुरस्कार मुख्यमंत्र्यांच्या हस्ते देऊन गौरवण्यात आले होते. त्यानंतर, राज्यातील दिव्यांग शेतकऱ्यांना कर्ज न देताच तब्बल १०९ दिव्यांग शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावर बोजा चढवण्यात आल्याच्या धक्कादायक प्रकरणाचा पर्दाफाश त्यांनी केला. या खळबळजनक इन्व्हेस्टिगेटिव्ह रिपोर्टिंगसाठी त्यांना सकाळ वर्तमानपत्राचा अत्यंत प्रतिष्ठेचा २०१९ चा डॉ. नानासाहेब परुळेकर पुरस्कार मिळाला. याशिवाय, महाराष्ट्रातील कामगार चळवळीतील अग्रगण्य संस्था इंटकच्या वतीनेही त्यांना वर्ष २०२३ चा राज्यस्तरीय पत्रकारिता पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.
प्रशांत कांबळे हे मंत्रालय विधिमंडळ वार्ताहर संघ, मुंबई प्रेस क्लब आणि वर्ष १९४१ साली स्थापन झालेल्या व ज्वलंत इतिहास लाभलेल्या मुंबई मराठी पत्रकार संघाचे सदस्य आहेत. आपल्या प्रदीर्घ पत्रकारितेच्या माध्यमातून जनसामान्यांचे प्रश्न मांडत आहेत.
