१ ली ते ग्रॅज्युएशनपर्यंत मोफत शिक्षणाची मागणी; प्रेम (हितेश) मुंदाफळे यांचे मंत्र्यांना निवेदन
नागपूर WH NEWS : महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थ्यांना १ लीपासून ते ग्रॅज्युएशनपर्यंत मोफत व एकसमान शिक्षण मिळावे, या मागणीसाठी शिवसेना (शिंदे गट) सामाजिक कार्यकर्ते प्रेम (हितेश) युवराज मुंदाफळे यांनी राज्याचे मंत्री मा. आशिष जयस्वाल यांना निवेदन सादर केले आहे.
सध्याच्या शिक्षण व्यवस्थेत खासगी शाळा व महाविद्यालयांच्या वाढत्या फीमुळे सामान्य, गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबांवर मोठा आर्थिक भार पडत असल्याचे त्यांनी निवेदनात नमूद केले. ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थी आजही दर्जेदार शिक्षणापासून वंचित राहत असल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली.
प्रेम (हितेश) मुंदाफळे यांनी सरकारकडे काही महत्त्वपूर्ण मागण्या केल्या असून, त्यामध्ये राज्यातील १ ली ते ग्रॅज्युएशनपर्यंतचे शिक्षण पूर्णपणे मोफत करणे, संपूर्ण महाराष्ट्रात एकसमान शिक्षण व्यवस्था लागू करणे, ग्रामीण व शहरी भागातील विद्यार्थ्यांना समान शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देणे, तसेच खासगी शाळा व महाविद्यालयांमध्येही मोफत व समान शिक्षण व्यवस्था लागू करण्याची मागणी करण्यात आली आहे.
याशिवाय सर्व विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण, पुस्तके आणि आवश्यक सुविधा शासनाकडून उपलब्ध करून द्याव्यात, अशीही मागणी त्यांनी केली.
“शिक्षण हा प्रत्येक विद्यार्थ्याचा मूलभूत हक्क आहे. पैशाअभावी कोणताही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये. सरकारने यावर तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा,” असे प्रेम (हितेश) मुंदाफळे यांनी सांगितले.
या मागणीला राज्यभरातील नागरिकांनी पाठिंबा द्यावा आणि शिक्षण हक्काच्या आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
