राजकीय क्षेत्रात धांगडधिंगा! हवसे, गवसे, नवसे निवडणूक रिंगणात -मोहन गंगण पत्रकार
अमरावती – आत्ताच महाराष्ट्रात नगरपालिकेच्या निवडणूका मोठ्या उत्साहात पार पडल्या, आता 2026 च्या मनपा निवडणुकीचे वारे जोरदार वाहू लागताच कार्यकर्त्यांची इनकमिंग, आऊटगोईंग मोठ्या प्रमाणावर सुरु आहे त्याचे मुख्य कारण असे की, प्रत्येक कार्यकर्ता आणि उमेदवाराला असे वाटत आहे की आपण निवडून येणारच आणि त्याचं विश्लेषण सुध्दा योग्य पद्धतीने मांडून दाखवित आहे. असो, यामधे एक महत्वाचे असे की कितीही उमेदवार उभे राहिले आणि छाती ठोकून मीच निवडून येणार असे सांगत असले तरी मनपा मधे जेवढ्या जागा आहे (उदा. आपण अमरावती मनपा चा विचार करु 87 जागेकरीता ही निवडणूक होणार आहे. त्याकरिता अपक्षांसह किमान 1000 ते1100 उमेदवार दंड थोपटतील आणि त्यापैकी 87 च उमेदवार फक्त विजयी होतील ही काळ्या दगडावरची रेघ आहे आणि बाकीच्या उमेदवारांना निवडणूकीत पराजय पत्करावा लागेलच.
सर्वात महत्त्वाचे असे की कोणतीही निवडणूक आता उमेदवारांकरीता सोपी राहिलेली नसून पैशाचा मोठ्या प्रमाणात चुराडा होतो.ज्यांना माहित आहे की आपण या निवडणुकीत निवडून येणार नाही आपले डिपाॅजिट ही आपल्याला वाचवता येणार नाही असे हवसे, गवसे,नवसे सुध्दा शौकाखातर आपले भाग्य आजमावत आहे. महाराष्ट्रात सध्याच्या मनपा निवडणूकीचे मतदान 15 जानेवारी व निकाल 16 जानेवारी ला होणार आहे. मनपा निवडणूक ही महाराष्ट्रात सर्वच जागी चुरशीची होणार आहे कारण 9 वर्षानंतर ही निवडणूक होत आहे. या निवडणुकीत उभे राहायचे डोहाळे बहुतेकांना लागले आहे गेली चार वर्षापासून अनेकांनी मनपा निवडणुकीसाठी गुडघ्याला बाशिंग बांधून ठेवले होते ते आता उभे ठाकून आपले भाग्य आजमावणार आहे.ज्याला थोडासा राजकीय गंध आणि आपल्या वार्डातील 5/50 जण ओळखायला लागले की अशांना नगरसेवक ते महापौर व्हायची दिवसाढवळ्या स्वप्ने पडू लागली आहेत मग ते पक्षाचे असोत की अपक्ष युतीत असो वा युतीच्या बाहेर. आता बघा कोणत्याही वार्डात पक्षातर्फे अधिकृत उमेदवार एकच असतो, राष्ट्रीय पक्षाचे जेवढ्या जागा तेवढेच उमेदवार ठरलेले असतात मात्र मनपा निवडणुकीत बर्याच ठिकाणी युती न झाल्यामुळे निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची मोठ्या प्रमाणात भाऊगर्दी आणि चांदी झाली आहे असं म्हणता येईल! तसेच या मनपा निवडणुकीच्या तोंडावर आयाराम,गयाराम ची स्थिती मोठ्या प्रमाणात सुरु आहे.
टिकीट न मिळणार या आशेने अनेक कार्यकर्त्यांचा हिरमुस होतो पण शेवटी राष्ट्रीय पक्षासाठी नाईलाज सुध्दा आहे. मग अशावेळी मला टिकीटच मिळाले नाही म्हणून बंडखोरी करुन अपक्ष निवडणूक लढण्याची तयारी करतात कारण अपक्ष म्हणजे स्वतंत्र कितीही उमेदवारांना निवडणूक लढविता येते. चार जण ओळखायला लागले की राजकारणाचा भूत डोक्यात शिरतो आणि निवडणूक लढण्यास सज्ज होतात. आता राष्ट्रीय पक्षाचा विचार केला तर तो पक्ष जो उमेदवार निवडून येऊ शकतो ज्याची जवळपास खात्री असते अशाच होतकरु उमेदवाराला उमेदवारी देतो, मात्र सध्याच्या राजकीय परिस्थितीचा धांगडधिंगा पाहता एकाच पक्षात एकाच जागेसाठी अनेक उमेदवार निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत म्हणजे “एक अनार सौ बिमार या म्हणीप्रमाणे, मात्र नाईलाजाने इतर उमेदवारांना टिकीट नाकारावे लागते मग पर्यायाने यापैकी काही कार्यकर्ते नाराज होतात आणि अनेकदा त्याचे नुकसान पार्टी ला सहन करावे लागते, कधी कधी तर पक्षाशी एकनिष्ठ असणारी काही राजकीय मंडळी सुध्दा बंडखोरी करतात त्याचप्रमाणे आम्हीच निवडून येणार असल्याचे भासवित आपली उमेदवारी दाखल करून पक्षाशी सुध्दा गद्दारी करतात व कालांतराने पक्षाचे व आपलेच नुकसान करून घेतात अनेक वेळा तर असे होते की आपल्याला आपल्या पक्षाने तिकीट दिले नाही तर ते दुसऱ्या पक्षात पक्ष प्रवेश करतात अशी उदाहरणे राज्यात मनपा निवडणुकीच्या वेळी मोठ्या प्रमाणात घडू लागली आहे आणि ती पहावयासही मिळत आहे,अनेक वेळा अशा कार्यकर्त्यांना पक्षातून निलंबित सुद्धा केल्या जाते. आता आपण हे पाहू की राजकारणात निवडणूका लढविण्यासाठी एवढी भाऊ गर्दी का तर त्याचे महत्त्वाचे कारण असे आहे की राजकारणात अनुभवाची गरज नाही, शिक्षणाची कोणतीही अट नाही,18 वर्षावरील कोणतीही भारतीय नागरिकत्व असलेली व्यक्ती निवडणूक लढवू शकते.
आता थोडं बघा समजा राजकारणात किमान ग्रॅज्युएट,अनुभव आणि वयोमर्यादा ही अट असती, तर राजकारणातील भाऊगर्दी आपसूकच कमी झाली असती परंतु तशी व्यवस्था नाही आणि तुम्ही एकदा निवडून आल्यानंतर कितीही मालमत्ता म्हणजे प्रॉपर्टी कोणत्याही मार्गाने कमवू शकता तसेच तुम्ही विकास करा अथवा करु नका वार्डातील कामे करा किंवा करु नका याचे कोणतेही बंधन नाही. पण काही महत्त्वपूर्ण बाबीचा विचार केला तर त्यावर ही राजकीय मंडळी कधीच विचार करीत नाही जेणेकरून आपल्या क्षेत्राचा विकास होईल. एकदा निवडून आले की निवडणुकीच्या आधि दिलेल्या आश्वासनांचा विसर पडण्यास सुरु होतो आपणाला मतदारांनी आपले अमुल्य मत देऊन निवडून दिले म्हणून आपण महानगरपालिका क्षेत्रातील येणाऱ्या वार्डाचा प्रभागाचा विकास कसा होईल याकडे लक्ष घातले पाहिजे मात्र एकदा निवडणूका झाल्या की नगरसेवक वार्डात फिरकत नाही आणि आपण निवडून आलो व आपली जबाबदारी संपली आपलं 5 वर्षेपर्यंत कुणीही वाकडं करु शकत नाहीत असे वावरतात. मात्र ज्या मतदारांनी निवडणूकीच्या वेळी तुम्हाला डोक्यावर घेतलं “भाऊ तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है” अशा गगनभेदी घोषणा दिल्या त्या मतदारांचे प्रश्न कसे सुटतील याकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे हे विसरुन चालणार नाही.
आज फक्त अमरावती महानगरपालिका क्षेत्रातील पाण्याच्या प्रश्नाचा विचार केला तर काय परीस्थिती वाईट आणि बिकट आहे देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षापेक्षा जास्त काळ झाला मात्र जिवनावश्यक असणारे पिण्याचे व वापरा करीता भरपूर पाणी मिळू शकत नाही एक दिवसा आड येणारा नळ एक तास, दोन तास येतो, त्या नळाला फोर्स नसतो टिल्लू पंप लावून पाणी ओढावे लागते विनाकारण विजेचा खर्च वाढतो.पावसाळा चांगला झाला, लाखो गॅलन लिटर पाणी वाया जात आहे, धरणात पाणी भरपूर आहे तरी सुद्धा एक दिवसाआड जनतेसाठी सोडण्यात येणाऱ्या नळाची चातकासारखी सारखी वाट बघावी लागते लागते ही खरी शोकांतिका आहे आणि आपण विकासाच्या मोठमोठ्या (बाता)गोष्टी करतो हा आहे कां खरा विकास. मनपा क्षेत्रातील नागरिकांचे ज्यांनी आम्हाला डोक्यावर घेतलंय त्या मतदारांचे प्रश्न कसे सुटतील की फक्त निवडणुका तोंडावर आल्या की मग गाजर दाखविले जातात आश्वासनाची खैरात वाटल्या जाते मतदारांना प्रलोभन देऊन 1000/500 रुपयाचे आमिष दाखवून मते आपल्या पदरात पाडून घेतल्या जाते आणि एकदा निवडून आले की पाच वर्ष “हम आपके है कौन” भाड में जाये मतदार जनता अपना काम बनता” या धर्तीवर ही राजकीय मंडळी वावरताना दिसते!
एकंदरीत जर विचार केला तर लोकशाही मार्गाने निवडून आलेले सरकार कोणतेही असो ते चांगलेच असते आपल्या क्षेत्राचा आणि जनतेच्या समस्या सोडविण्याची व विकास करण्याची जबाबदारी ही मतदारांनी निवडून दिलेल्या प्रतिनिधीचींच असते मात्र अपवादात्मक काही लोकप्रतिनिधी खूप उदासीन असतात त्यांना आपल्या क्षेत्राची काही चिंता फिकीर किंवा देणंघेणं नसते फक्त शौकाखातर राजकारणांत ठाण मांडून बसलेले असतात, महान लोकशाही असलेल्या भारत देशात दर पाच वर्षांनी निवडणुका होतात मात्र अलीकडे ही मनपाची निवडणूक आता नऊ वर्षांनी होत आहे. लाखो करोडो चा खर्च या निवडणुकांवर केल्या जातो अनेक विभागाला मोठ्या प्रमाणावर परिश्रम करावे लागते, निवडणूक स्वच्छ वातावरणात आणि पारदर्शक तसेच निर्भीडपणे पार पडावी याकरिता निवडणूक आयोग कसोशीचे प्रयत्न करतो त्याचप्रमाणे या निवडणुकीचा सर्वात जास्त ताण हा पोलीस विभागावर असतो आदर्श आचार संहितेची अंमलबजावणी करून या निवडणुका आरोग्य रीतीने पार पडाव्या या करीता पोलीस विभागाला डोळ्यात तेल घालून आणि तारेवरची कसरत करुन तसेच वेळप्रसंगी कठोर निर्णय करुन आपले कर्तव्य बजावे लागते. निवडणूकीची सर्वच जबाबदारी शासनाची किंवा पोलिस विभागाचीच आहे असे न पाहता या निवडणुकी दरम्यान उमेदवाराने आणि सुज्ञ मतदारांनी काही गोष्टीचे भान ठेवले पाहिजे आदर्श आचारसंहितेचे तंतोतंत पालन केले पाहिजे.
मात्र अलिकडे तसे होताना दिसत नाही. रात्री 10 वाजता पर्यंत प्रचार सुरू असल्याने मोठ्या प्रमाणात कर्कश आवाजाचा त्रास शालेय विद्यार्थी, लहान मुले, वरिष्ठ नागरिक, दवाखान्यात भर्ती असणार्या रुग्णांना होत असतो वास्तविक प्रचारासाठी संध्याकाळी 6 पर्यन्त ची वेळ भरपूर आहे मात्र रात्री 10 पर्यंत दिलेली वेळ ही चुकीची आहे हे म्हटल्यापेक्षा किंवा हा अतिरेक आहे असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही! आता आपण मुख्य मुद्द्यावर येऊ मतदारांनी मतदानाच्या दिवशी प्रत्येकाने आपला हक्क बजावलाच पाहिजे, मजबूत लोकशाही करता सर्वांनी आपले अमूल्य मत कोणत्याही आमिषाला बळी न पडता योग्य उमेदवाराला देऊन मतदानाचा उत्सव साजरा केला पाहिजे. निवडणुकीत निवडून कोण आणि किती उमेदवार निवडून येतील याचे उत्तर निकाल लागताच मिळेल निवडून आलेल्या उमेदवाराने जल्लोष साजरा करण्यापेक्षा सर्व हेवेदावे विसरुन आपल्या क्षेत्रातील विकासाकडे व जनतेचे मूलभूत प्रश्न कसे सोडविले जातील याकडे लक्ष दिले पाहिजे.
आता या मनपा निवडणूकीचे वास्तव विश्लेषण करायला गेलं तर यां उमेदवारांमधे काही उमेदवार आहेत ते फक्त आपलं शहर सुंदर कसं होईल आपल्या वार्डातील समस्या कशा सुटतील याकडेच त्यांचे लक्ष असते मात्र याउलट काही नगरसेवक एकदा निवडून आले की त्यांच्या मधे गुर्मी, माज, इगो, फोन रिसीव्ह न करणे, हो म्हणून मतदारांची कामे न करणे, वेळ मारून नेणे अशामुळे मतदार नाराज होतो आणि मग मतदारांची नाराजी होते आणि असे नगरसेवकांना पुन्हा डावलल्या जातात. आता आपण म्हणू काही राष्ट्रीय पक्षाचे मातब्बर नेते पक्ष कां बदलतात किंवा इकडून तिकडे म्हणजे भाजपा किंवा युतीत कां जातात तर त्याचे उत्तर असे आहे की जिकडे सत्ता असली तिकडे जर राहिले किंवा गेले तर विकास निधी भरपूर मिळतो, वार्डाचा, आपल्या क्षेत्राचा विकास होऊ शकतो नाहीतर मग विकास निधीसाठी ताटकळत राहावे लागते आणि वार्डाचा आपल्या क्षेत्राचा विकास खुंटतो, मी तर असं म्हणेन की कोणताही नगरसेवक असो त्याने आपल्या वार्डातील प्रत्येक समस्याचे भान ठेवून कार्य व समाजसेवा केली तर पुन्हा निवडून येण्याकरिता कोणीही त्यांना रोखू शकत नाही.
हे खरे ही असले तरी मनपा च्या राजकारणात सुरु असलेला धांगडधिंगा याची मतदारांत मोठी उत्सुकता असून हवसे, गवसे, नवसे निवडणूक लढवून आपल्या पदरात काय पाडून घेतात याकडे अनेकांचे सुज्ञ मतदारांचे लक्ष लागले आहे ! मोहन हि.गंगन. वरिष्ठ पत्रकार मो. 9021529842
