नागपूर बेलतरोडी पोलीस ठाण्यात महिला दिनानिमित्त जनजागृती कार्यक्रम
नागपूर WH NEWS : जागतिक महिला दिनानिमित्त बेलतरोडी पोलीस ठाण्याच्या वतीने महिलांच्या सुरक्षा व जनजागृतीसाठी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. हा कार्यक्रम पोलीस उपायुक्त परिमंडळ क्र. ४ यांच्या संकल्पनेतून बेलतरोडी पोलीस ठाणे व हॉटेल ली मेरिडियन यांच्या संयुक्त विद्यमाने पार पडला.

या कार्यक्रमात पोलीस परिमंडळ क्र. ४ अंतर्गत येणाऱ्या विविध पोलीस ठाण्यांमधील कर्तव्यदक्ष महिला पोलीस अंमलदार तसेच हॉटेल ली मेरिडियन येथील महिला कर्मचारी यांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमादरम्यान उपस्थित महिलांना कामाच्या ठिकाणी होणारा लैंगिक अत्याचार, महिलांवरील पिळवणूक तसेच महिलांच्या सुरक्षेसंबंधी कायदेशीर तरतुदी याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. अशा प्रकारच्या घटना घडल्यास महिलांनी न घाबरता पोलिसांकडे तक्रार करून कायदेशीर मदत घ्यावी, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

तसेच महिलांनी अनोळखी व्यक्तींवर सहज विश्वास ठेवू नये, सोशल मीडियाद्वारे होणाऱ्या फसवणुकीपासून सावध राहावे व स्वतःच्या सुरक्षिततेबाबत सतर्क राहावे, असे मार्गदर्शनही करण्यात आले.
कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित महिला पोलीस अंमलदार व महिला कर्मचाऱ्यांना भेटवस्तू देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. महिलांच्या सुरक्षितता, सक्षमीकरण व जनजागृतीसाठी हा उपक्रम अत्यंत उपयुक्त ठरल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.
