प्रशासक कार्यकाळातील सर्व कामांची ‘क्रीडा घोटाळ्या’च्या धर्तीवर चौकशी करा:आमदार विकास ठाकरे

प्रशासक कार्यकाळातील सर्व कामांची ‘क्रीडा घोटाळ्या’च्या धर्तीवर चौकशी करा: आमदार  विकास ठाकरे

नागपूर WH NEWS : नागपूर महानगरपालिकेत प्रशासक म्हणून कार्यरत असताना डॉ. अभिजीत चौधरी यांच्या कार्यकाळात मंजूर व पूर्ण करण्यात आलेल्या सर्व कामांची सखोल चौकशी करून दोषींवर ‘क्रीडा घोटाळ्या’च्या धर्तीवर कठोर कारवाई करावी, अशी जोरदार मागणी पश्चिम नागपूरचे आमदार व नागपूर शहर (जिल्हा) काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष विकास ठाकरे यांनी आज विधानसभेत केली.

विधानसभेत बोलताना ठाकरे यांनी स्पष्ट केले की, डॉ. अभिजीत चौधरी यांची बदली झाली असली तरी त्यामुळे त्यांच्या कार्यकाळातील नियमभंग व अनियमिततांपासून त्यांना दिलासा मिळू शकत नाही. महानगरपालिकेत प्रशासकीय कारभाराच्या काळात अनेक निर्णय आणि कामांबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले असून त्याची निष्पक्ष चौकशी होणे अत्यावश्यक आहे, असे त्यांनी सांगितले.
यावेळी ठाकरे यांनी एमएसआयडीसी (MSIDC) मार्फत झुडपी जंगलासाठी आरक्षित असलेल्या जमिनीवर उभारण्यात येत असलेल्या प्रदर्शन केंद्राच्या कामातील गंभीर अनियमितता सभागृहाच्या निदर्शनास आणून दिली. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशांनुसार झुडपी जंगल जमीन ही वनजमीन मानली जाते, तरीही अशा जमिनीवर प्रकल्प उभारण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप त्यांनी केला.

तसेच, एमएसआरटीसी (MSRTC) संदर्भातील एका मोठ्या आर्थिक घोटाळ्याचाही त्यांनी सभागृहात पर्दाफाश केला, ज्यामुळे सार्वजनिक पैशांच्या वापराबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले असल्याचे त्यांनी नमूद केले.
याशिवाय, गोरवाडा आणि बोरगाव येथील काँग्रेसचे नेते व कार्यकर्त्यांवर लावण्यात आलेल्या मकोका (MCOCA) प्रकरणावरही ठाकरे यांनी तीव्र आक्षेप नोंदवला. मकोका हा कायदा सतत संघटित गुन्हे करणाऱ्या टोळ्यांवर लागू करण्यासाठी आहे, मात्र ज्यांच्यावर एकही गुन्हा नोंद नाही आणि ज्यांनी कधीही टोळी करून गुन्हे केले नाहीत अशा व्यक्तींवरही पोलिसांनी मकोका लावला आहे, असा गंभीर आरोप त्यांनी केला.
सरकारने या सर्व प्रकरणांची तातडीने निष्पक्ष चौकशी करून जबाबदार अधिकाऱ्यांवर व संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी ठाकरे यांनी सभागृहात केली.

ताजा अपडेट