दिल्लीतील पत्रकारांना ताब्यात घेतल्याच्या घटनेचा निषेध!
-नागपूरचे पत्रकार विजय खवसे गुन्ह्यांच्या निष्पक्ष चौकशीची मागणी!
– अमरावतीत महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे जिल्हा कचेरीवर निदर्शने
अमरावती WH NEWS (प्रतिनिधी): दिल्ली येथे आंदोलनाचे वार्तांकन करणाऱ्या पत्रकारांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याच्या घटनेचा तीव्र निषेध नोंदवत महाराष्ट्रातील पत्रकारांवरील वाढते हल्ले रोखण्यासाठी कठोर उपाययोजना करण्याची मागणी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, मुंबईचे विदर्भ प्रदेशाध्यक्ष पत्रकार नयन मोंढे यांच्या आदेशाने बुधवार (ता.14 )रोजी विदर्भस्तरीय आंदोलनांतर्गत जिल्हा कचेरी परिसरात डिजिटल मीडिया जिल्हाध्यक्ष मनीष गुडधे यांच्या नेतृत्वात जिल्हा कचेरी परिसरात निदर्शने देण्यात आली. आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देऊन पत्रकार हल्लाविरोधी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी, कायद्यात आवश्यक सुधारणा आणि पत्रकारांच्या सुरक्षेसाठी स्वतंत्र यंत्रणा उभारण्याची मागणी करण्यात आली आहे.

दिल्लीतील घटनेमुळे पत्रकारांच्या अभिव्यक्तिस्वातंत्र्याचा आणि सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. कायदा व सुव्यवस्थेच्या नावाखाली पत्रकारांच्या स्वातंत्र्यावर गदा येऊ नये. दिल्लीतील घटनेची निष्पक्ष चौकशी करून संबंधित पत्रकारांना कायदेशीर प्रक्रियेनुसार वागणूक द्यावी, अशी मागणी निवेदनातून केली आहे.
पुण्यात आंदोलनाचे वार्तांकन करताना जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीचे पत्रकार निखिल सुक्रे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचाही निवेदनात निषेध करण्यात आला आहे. पत्रकारांना धक्काबुक्की, शिवीगाळ आणि मारहाणीला सामोरे जावे लागत असेल, तर केवळ घटनेनंतर कारवाई करून चालणार नाही. अशा घटना रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना आवश्यक असल्याचे निवेदन नमूद केले.
नागपूर येथील डब्ल्यूएच यूट्यूब चॅनलचे संपादक विजय खवसे यांच्याविरुद्ध दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यांची वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांमार्फत निष्पक्ष चौकशी करावी, गुन्हे दाखल करण्यामागील कारणे, पुरावे आणि कायदेशीर आधार तपासून तथ्यहीन किंवा कायदेशीर आधार नसलेली प्रकरणे नियमानुसार निकाली काढावीत,
पत्रकारांना सोशल मीडियावर ट्रोल करणे, धमक्या देणे, खोटी माहिती पसरवणे आणि वैयक्तिक बदनामी करण्याच्या प्रकारांवर लागू कायद्यांनुसार कारवाई करावी. ऑनलाइन धमक्यांसाठी स्वतंत्र तक्रार यंत्रणा, सायबर पोलिसांकडून तातडीची मदत आणि गंभीर प्रकरणांत आवश्यक संरक्षण उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
आंदोलने, मोर्चे आणि सार्वजनिक कार्यक्रमांच्या ठिकाणी पत्रकारांसाठी सुरक्षित वार्तांकन क्षेत्र निश्चित करावे. आयोजकांनी समन्वयक नेमून पत्रकारांच्या सुरक्षेसाठी आवश्यक व्यवस्था करावी. पत्रकारांवर हल्ला झाल्यास तातडीने पोलीस मदत व वैद्यकीय उपचार उपलब्ध करून द्यावेत, तसेच निष्काळजीपणा किंवा संबंधितांची भूमिका आढळल्यास कायद्यानुसार जबाबदारी निश्चित करावी,जिल्हास्तरावर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या समन्वयाने पत्रकारांच्या तक्रारींची तातडीने दखल घेणारी स्वतंत्र यंत्रणा उभारावी आणि पत्रकारांवरील हल्ल्यांच्या प्रकरणांचा नियमित आढावा घ्यावा, अशी मागणी करण्यात आली. आंदोलनात डिजिटल मीडिया अध्यक्ष मनीष गुडधे, जिल्हा संघटक विनोद इंगळे,
नितीन मुळे पाटील, सोमेश्वर जेवडे, सुनील घटाळे नेहा नागदिवे भारत पाटील, यांच्यासह पत्रकार उपस्थित होते.
पत्रकारांचे संरक्षण म्हणजेच जनतेच्या आवाजाचे संरक्षण:नयन मोंढे
पत्रकार हा कोणत्याही राजकीय पक्षाचा किंवा आंदोलनाचा विरोधक नसून जनतेपर्यंत वस्तुस्थिती पोहोचविण्याचे काम करतो. पत्रकारांचे संरक्षण म्हणजे लोकशाहीतील जनतेच्या आवाजाचे संरक्षण होय. त्यामुळे महाराष्ट्र शासनाने पत्रकारांच्या सुरक्षेसाठी ठोस निर्णय घेऊन त्यांना निर्भय वातावरणात काम करता येईल, अशी व्यवस्था निर्माण करावी.
-नयन मोंढे
विदर्भ प्रदेशाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ, मुंबई
