ईडी सरकारच्या नाकर्तेपणाने महाराष्ट्राचा वेदांता प्रकल्प हातून गेला..
– युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊत यांचा आरोप
– एक लाख लोकांना रोजगार देणारा प्रकल्प गुजरातला गेल्याने युवकांमध्ये असंतोष
प्रतिनिधी/मालेगाव (वाशिम)
महाराष्ट्रातील सध्याच्या शिंदे-फडणवीस आंणि केंद्रातील मोदी सरकारने महाराष्ट्राचा महत्वकांशी असा वेदांता प्रकल्प गुजरातला पडविण्याचा घाट आखला आहे. भारताच्या वेदांता आणि तायवानच्या फॉक्स्वान या इलेक्ट्रॉनिक कंपनीचा १ लाख ५८ हजार कोटींचा सेमीकंडक्टर प्रकल्प महाराष्ट्रात उभारल्या जाणार होता. तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने याबाबत वेदांता कंपनीचे संचालक अग्रवाल यांच्याशी संवादही साधला होता.

मात्र अचानक हा प्रकल्प आता गुजरातच्या अहमदाबाद येथे उभारला जाणार आहे. हा प्रकल्प भाजपने गुजरातला पळून नेला असा आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष कुणाल राऊत यांनी मालेगाव येथे नुकत्याच आयोजित पत्रपरिषदेत केला.
ते पुढे म्हणाले, वेदांत फॉक्सकॉन यांच्या संयुक्तिक या प्रकल्पात सेमीकंडक्टर असेंबली आणि टेस्टिंग युनिट असा हा प्रकल्प होता. आता हा प्रकल्प अहमदाबाद येथे ११ एकरच्या परिसरात उभारला जाणार आहे. २६ जुलै रोजी शिंदे सरकारने पत्रकारांसमोर हा प्रकल्प महाराष्ट्रातच तयार होईल असे जाहीर केले होते, मात्र अचानक हा प्रकल्प गुजरातला जाणे हे समजण्यापलीकडे आहे.
वेदांत फॉक्स्वान या प्रकल्पामुळे महाराष्ट्रात १ लाख युवकांना रोजगार मिळणार होता. मात्र आता हा प्रकल्पा गुजरातला गेल्याने महाराष्ट्रातील 1 लाख युवकांची नोकरीची संधी हुकली असून युवकांमध्ये भाजप सरकारविरोधात रोष निर्माण झाला आहे. वेदांत प्रकल्प गुजरातला जाण्यामागे केंद्र आणि राज्यातील सरकार जबाबदार आहे यामुळे संतापाची लाट आहे आम्ही याचा विरोध करतो, असेही कुणाल राऊत म्हणाले.
सदर प्रकल्प गुजरात राज्यात नेण्याचा निर्णय आधीच झाला होता असे वेदांताचे संचालक अग्रवाल यांचे विधान आहे. असे असेल तर मग १५ जुलै २०२२ रोजी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली हाय पॉवर कमिटीची बैठक झाली. सगळ्या सुविधा देण्याचा या बैठकीत निर्णय झाला. वेदांता फॉक्स्वांच्या १ लाख ५८ हजार पाचशे कोटी रुपयांच्या सेमीकंडक्टर प्रकल्पाला वीज बिलात सवलत, २४ तास वीज पुरवठा, स्टॅम्प ड्युटी यासह सर्व सुविधा पुरवण्यात वर चर्चा झाली होती.
फिजीबिलिटी रिपोर्ट हा संपूर्णता महाराष्ट्रसाठी अनुकूल होता आणि गुजरातच्या विरोधात होता. यासाठीच हाय पॉवर कमिटीची बैठक घेण्यात आली होती. ६० हजार कोटी रुपयांची कॅपिटल सबसिडी महाराष्ट्र देणार होता. यानंतर २६ जुलैला वेदांत फॉक्स्वानच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक झाली. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी पत्रकारांसमोर सांगितले की हा प्रकल्प महाराष्ट्रातच होईल, मात्र हा प्रकल्प आता अहमदाबादला होणार आहे.
वेदांताचा एवढा मोठा प्रकल्प राज्याबाहेर गेल्यामुळे एक लाख युवकांचा रोजगार गेला आहे. एकीकडे प्रचंड बेरोजगारी असताना एवढा मोठा रोजगार देणाऱ्या प्रकल्प राज्याबाहेर जाणे राज्याच्या हिताचे नाही. हा प्रकल्प अहमदाबादला जाण्यामागे केंद्रातील भाजप सरकार व राज्यातील ईदी सरकारच जबाबदार असल्याचे राऊत म्हणाले.
बेरोजगारी आणि महागाईने देशातील जनता हैराण झाली आहे. दररोजच्या दैनंदिन उपयोगातील वस्तूंवरही पाच टक्केपेक्षा जास्त जीएसटी आकारल्याने प्रत्येक वस्तू महागली आहे. गोरगरीब जनतेला याचा फटका बसत आहे. मात्र केंद्र सरकार महागाई कमी करण्यात अपयशी ठरली आहे. बेरोजगारीने युवक हदबल झाला आहे. गेल्या पाच वर्षात २ कोटी १० लाख पेक्षा जास्त नोकऱ्या गेलेल्या आहेत. तसेच रोजगार मिळत नसल्याने ४ करोड ५० लाख युवक नोकरी शोधतच नाहीत. एवढ्या मोठ्या प्रमाणात बेरोजगारी असताना वेदांता सारखा एक लाख रोजगार देणारा प्रकल्प गुजरातला जाणे म्हणजे मोठे षड्यंत्र असल्याचे कुणाल राऊत म्हणाले.
पत्रपरिषदेला आमदार अमित झनक, युथ काँग्रेसचे महासचिव श्रीनिवास नालमवार, प्रदेश सरचिटणीस वाशिम प्रदेश काँग्रेस दिलीपराव सरनाईक, युवक काँग्रेस वाशिम जिल्हाध्यक्ष वैभव सरनाईक, वाशिम जिल्हा परिषद उपाध्यक्षडॉ. श्यामभाऊ गभणे, जिल्हा परिषद सदस्य प्रदीप तायडे आदी उपस्थित होते.



