ठिय्या आंदोलनाचा इशाऱ्यानंतर तातडीने डीपी मंजूर!
-धानोरा दोन येथे १०० केव्हीए तर कडू-पोजगे आणि दहेगाव धानोरा येथे ६३ केव्हीएची डीपी लावली.
-प्रशांत कांबळे यांच्या आंदोलनाला यश; प्रशासनाने घेतली दखल
तिवसा: तालुक्यातील १५ गावातील शेतकऱ्यांनी ओव्हरलोड डीपी दुरुस्ती किंवा नवीन डीपी देण्याची मागणी शुक्रवारी ता.२८ नोव्हेंबर रोजी केली होती. मागणीनंतरही तीन दिवस होऊन कारवाई झाली नाही. परिणामी दहेगाव धानोरा डीपीचे ऑइल लिकेज होऊन पेट घेतल्याची घटना रविवारी झाली. यासंदर्भातील माहिती उपकार्यकारी अभियंता अधिकाऱ्यांना माहिती देऊन सोमवारी ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते प्रशांत कांबळे यांनी दिला होता. परिणामी उपकार्यकारी अभियंता निलेश उईके यांनी आंदोलची दखल घेऊन तातडीने धानोरा दोन येथे १०० केव्हीए तर कडू-पोजगे आणि दहेगाव धानोरा येथे ६३ केव्हीएचा डीपी बसवण्याचे आदेश दिले.

धोत्रा, शिरजगाव मोझरी गावातील शेतकऱ्यांचे कृषी पंप दहेगाव धानोरा डीपीवर आहे. गेल्या १५ दिवसांपासून या डीपीवरील नादुरुस्तीमुळे शेतकऱ्यांचे रब्बीचे पिक संकटात सापडले होते. हरभरा, गहू आणि पालेभाज्याचे पिकांचे उत्पन्न घेणाऱ्या शेतकरी अडचणीत सापडला होता. सोमवारी (ता.१) रोजी शेतकऱ्यांनी पुन्हा उपकार्यकारी अभियंता निलेश उईके यांना निवेदन देऊन ठिय्या आंदोलन करण्यात आले. जोपर्यंत डीपी घटनास्थळावर जात नाही तोपर्यंत कार्यालयातून ठिय्या सोडणार नसल्याची भूमिका प्रशांत कांबळे यांनी घेतली होती.
परिणामी उपकार्यकारी अभियंता उईके यांनी तातडीने फोनद्वारे संपर्क करून तातडीने डीपी बसवण्याच्या सूचना दिल्या सोमवारी दुपारी १२ वाजता सुरू झालेल्या या ठिय्या आंदोलनानंतर अर्ध्या तासातच उपकार्यकारी अभियंता उईके यांनी जिल्हा कार्यालयांशी संपर्क करून ६३ केव्हीए डीपी तातडीने लावण्याचे आदेश दिल्याने धोत्रा, शिरजगाव मोझरी गावच्या शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असून प्रशांत कांबळे यांनी ठिय्या आंदोलनातून माघार घेतली. यावेळी विजय कुरळकर, एड.विकास तुरकाने, धोत्रा ग्रामपंचायत सरपंच भूषण गाठे, स्वप्नील तुरकाने, अमोल बेंद्रे, प्रभाकर वावरे, भाऊराव वैद्य, सुरेंद्र वाहने या शेतकऱ्यांची उपस्थिती होती.
