बाबासाहेबांच्या संविधानात प्रत्येक प्रश्नाचे उत्तर
-धम्मगुरू भदंत आर्य नागार्जुन सुरेई ससाई यांचा धम्मसंदेश
-जगाला शांतता, करुणा आणि प्रज्ञाची गरज
नागपूर, 29 ऑगस्
देशासमोर सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, बेरोजगारी, विषमता अशी अनेक मोठी आव्हाने असून संक्रमणाच्या अवस्थेतून जात आहे. मात्र कितीही आव्हान आणि संकट असले तरी प्रत्येक प्रश्नाचे उत्तर बाबासाहेबांच्या संविधानात आहे. संविधान म्हणजे देशाचा श्वास आहे. या राष्ट्रीय ग्रंथामुळेच लोकशाही जिवंत आणि राष्ट्रीय एकात्मता टिकून आहे. त्यामुळे लोकशाही अधिक बळकट करण्यासाठी सर्व भारतीयांचे प्रयत्न असावेत, अशी अपेक्षा डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे अध्यक्ष तथा आंतरराष्ट्रीय बौद्ध धम्मगुरू भदंत आर्य नागार्जुन सुरेई ससाई यांनी व्यक्त केली.
वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला इंदोरा विहार येथील निवासस्थानी धम्मसंदेश देताना ते बोलत होते. ससाई म्हणाले, माणूस कितीही मोठा बुद्धिवंत असला आणि तो इतरांचा द्वेष करण्याइतका स्वत:ला मोठा समजू लागला तर तो उजेडात हातात मेणबत्ती धरलेल्या आंधळ्यासारखा असतो. त्यामुळे कुणाचाही द्वेष करू नका. माणसामाणसात प्रेम निर्माण करा, त्याची फुले निर्माण करा. कारण आज जगाला शांतता, करुणा आणि प्रज्ञेची खर्या अर्थाने गरज आहे.
जीवन फुलांसारखे सुंदर असले तरी आयुष्य संकटात सापडले आहे. एकीकडे माणूस सुखासाठी धडपडतो तर दुसरीकडे संकटाच्या जगात माणसांचा संघर्ष सुरूच आहे. ‘जगाला युद्ध नको, बुद्ध हवा’ पण जगभरात घडणार्या घडामोडी मानवी मन आणि मेंदू विचलित करणार्या आहेत. मात्र मानवाने विचलित न होता संकटाचा सामना करावा. तथागत बुद्ध यांची मानवी आयुष्याकडे बघण्याची दृष्टी प्रगल्भ व परिणामकारक होती. त्यामुळे त्यांचा मार्ग नवी दृष्टी प्रदान करण्यास उपयुक्त आहे, असेही ससाई म्हणाले.
आयुष्यात शेकडो लढाया जिंकण्यापेक्षा स्वत:वर विजय मिळवा. मग विजय नेहमीच तुमचाच होणार आहे. हा विजय तुमच्याकडून कोणीही हिरावून घेणार नाही. वाईटाने वाईटावर कधीही मात करता येत नाही. तिरस्काराला केवळ प्रेमाने संपवले जाऊ शकते. त्यामुळे आयुष्यात हिंसाचाराला स्थान नको, हीच स्थायी शांततेची नांदी ठरू शकेल. तुम्ही भविष्यातील स्वप्नांमध्ये हरवू नका, भूतकाळात गुंतू नका, केवळ वर्तमान काळावर लक्ष्य केंद्रीत करा. जीवनात आनंदी राहण्याचा हा एकमेव उजेडमार्ग आहे.
जीवनात तुम्ही किती चांगल्या पुस्तकाचे वाचन करता. कितीही चांगले शब्द ऐका. मात्र जोपर्यंत हे सर्व काही तुम्ही आचरणात आणत नाही तोपर्यंत त्याचा कोणताही उपयोग होत नाही. नेहमी रागात राहणे म्हणजे जळलेल्या कोळशाला दुसर्या व्यक्तीवर फेकण्याच्या इच्छेने पकडून ठेवण्यासारखेच आहे. हा राग, द्वेष सर्वात आधी तुम्हालाच भस्मसात करतो. भविष्यात प्रकाशवाट निर्माण करण्यासाठी वर्तमानाचे संकट ओळखून स्वत:च्या अंतरगात दीप चेतवा, असेही भदंत सुरेई ससाई म्हणाले.
