चिमुकल्याचा बैलपोळा विशेष लेख वाचा, अतुल प्रभाकर उज्जैनकर ( गुरुजी ) यांच्या लेखणीतून …..
WH-NEWS :-(प्रस्तुत )चांदुर रेल्वे शहरातला एक अनोखा उत्सव म्हणजेच. ‘ खडकपुरा ‘ येथे भरणारा बैलपोळा ,गेल्या अनेक दशकांपासून अगदी पारंपरिक पद्धतीने खडकपुऱ्याच्या ‘ गोठणावर ‘ हा बैल पोळा भरतो , दुसऱ्या दिवशी छोट्या बालगोपालांचा सुद्धा तान्हा पोळा ह्याच ठिकाणी भरतो .लहान चिमुकले सुरेख पहराव परिधान करून आपल्या लाकडी किंवा मातीच्या नंदीबैलाला सुंदर – सुबकरित्या सजऊन आणतात ,जो चिमुकला आपल्या नंदी बैलाला उत्कृष्टरित्या सजवितो त्याला मान्यवरांच्या सुभहस्ते पारितोषिक सन्मानित करण्यात येते .. पूर्वजांनी घालून दिलेल्या प्रथा परंपरेनुसार ह्या पोळ्यात बळीराजा ,छोटे चिमुकले आपल्या बैलाला आणतात इथे परंपरेनुसार ह्या नंदीबैलाचे पूजन करून धूप दाखविल्या जाते आणि वर्षभर त्यांच्या आरोग्यदायी आयुष्यासाठी प्रार्थना सुद्धा केल्या जाते. इथे बैल जोडी आणणाऱ्या गळी माणसाचा,कस्ताकारांचा शेला श्रीफळ देऊन सत्कार केल्या जातो हे विशेष, अशी ही अनोखी परंपरा मी लहानपणापासून बघत आलेलो. आज माझेच वय ४० वर्षे आणि साधारणतः मी ३ वर्षाचा असताना माझ्या आजोबां सोबत मी सुध्दा ह्याच पोळ्यामध्ये मध्ये माझ्या लाकडी बैलाला सजऊन घेऊन जायचो .खूप आनंदात अनुभव हा माझ्यासाठी होता.ह्या पोळ्यात गेलो की बालपणीच्या आठवणीना उजाळा मिळतो आणि मन अगदी प्रसन्न होते…
बळीराजाच्या खरा आधार म्हणजेच त्याच्या जवळ असलेली बैलजोडी जिच्या भरवशावर संपूर्ण वर्षभर बळीराजा आपली शेती करतो ,ह्या बैलाच्याच साहाय्याने शेतीचे सर्व कामे करून भरघोस पीक काढून आपला चरितार्थ चालवतात शिवाय ह्या देशाच्या अन्नसाठ्याची भव्य कोठारे भरभरून ठेवण्यासाठी सुद्धा ह्या बळीराजाचे आणि ह्या बैल जोडीचे अमूल्य योगदान आहे असे मला मनोमन वाटते. नंदी बैल हा भगवान शिवांच वाहन आहे आणि म्हणून आपल्या भारतीय संस्कृतीत नंदी बैलाला दैवत म्हणून पुजल्या जाते. अशा ह्या दैवताच्या सन्मानाचा तसेच त्याच्याबद्दल असलेली कृताज्ञनता व्यक्त करण्याचा हा अतुल्य सोहळा सर्वांच्या साक्षीने साजरा केल्या जातो . पोळा फुटल्यावर ही बैलजोडी घरी नेऊन प्रथम पूजा केली जाते त्यानंतर आपल्या शेजरापाजारत ही बैलजोडी पूजेसाठी नेली जाते आणि पोळी मागितल्या जाते .लहान चिमुकले सुद्धा आपल्या बैलजोडी अनेक ठिकाणी नेतात आणि खाऊ म्हणून पैश्याच्या स्वरूपात पोळी मागितली जाते .मुलांना ह्या उत्सवाबद्दल खूप आकर्षण असते.आपल्या महाराष्ट्रात विशेषतः आपल्या विदर्भामध्ये ह्या सणाला विशेष महत्त्व आहे .पोळ्याच्या दिवशी घरोघरी स्वादिष्ट पुरण पोळी केली जाते ,खमंग पंच पकवान घरची गुहिनी मोठ्या आनंदाने तयार करते , दुसरा दिवस हा ‘ कर ‘ म्हणून अगदी मनोरंजक रित्या साजरा केल्या जातो.
खडकपुऱ्यामध्ये भरणारा हा पोळा आमच्या शहराच खास आकर्षण आहे मला जिथपर्यंत माहीत आहे त्यानुसार ह्या पोळ्याला शंभरेक वर्षापेक्षा अधिक कालावधी झालेला असेल .इथे दरवर्षी बसविल्या जाणारा युवक गणेश मंडळांचा गणपती ,इथला होणारा भव्य दिव्य महाप्रसाद ,इथे लहान मुलांच्या खेळण्याची लागणारी दुकाने अनेकांची लक्ष वेधून घेतात. ह्या खडकपुरतला प्रत्येक नागरिक,इथला श्रमिक हा कमी शिक्षित जरी असला तरी तन मन आणि धन अर्पण करून हे दोन्ही उत्सव मोठ्या आनंदाने आणि ऊर्जेने आणि अतिशय मनोरंजक रित्या साजरे करीत असतात आणि म्हणून इथल्या रहिवासी असलेल्या प्रत्येक नागरिकांचे करावे ठेवढे कौतुक कमीच होतील.
विशेष म्हणजे इथली पोळा उत्सव समितीचे कार्य सुद्धा कौतुकास्पद आहे.ह्या समिती मध्ये आपला जीव की प्राण ओतणारे समिती सदस्यांमध्ये अगदी उमदे , ऊर्जावान आणि कार्यकुशल लोकांची ही फळी ह्या समितीमध्ये सातत्याने कार्यरत आणि प्रयत्नशील असते .ह्या उत्सवाचे यशस्वी नियोजन करणे,व्यवस्था करणे,बक्षिसे आणणे , वर्गणी गोळा करणे ,कधी कधी स्वखर्चातून सुद्धा खर्च करण्यासाठी ही मंडळी कधी धजली नाही .हे ह्या लोकांचे मोठपण आहे असे मला मनोमन वाटते.ह्या लोकांच्याच अथक परिश्रमाने ह्या उत्सवाचा महोत्सव होतो . हा उत्सव सर्वांग सुंदर करण्यासाठी इथला प्रत्येक लहान – थोर व्यक्ती आपला वेळ आणि परीश्रम देतो , ह्याच खरं श्रेय जर कुणाला जात असेल तर इथे खडकपुऱ्यात राहणाऱ्या याच प्रत्येक श्रमिक ,कष्टकरी ,सामाजिक एकोपा जपणारा प्रत्येक नागरिकाला जातो मग तो कोणत्याही जातीचा असो ,कोणत्याही धर्माचा असो शिवाय कोणत्याही वयाचा असो . अश्याच या आपल्या हिंदुसंकृतीच्या उत्सवाचे महत्व आणि याचा वारसा येणाऱ्या प्रत्येक पिढीला व्हावा अशी ईच्छा माझ्या अंतर्मनात नेहमीच जागृत होते शिवाय अशीच इच्छा प्रत्येक मना मनात जागृत होणे आवश्यक आहे तेव्हाच या सण उत्सवाचे संवर्धन होईल आणि माणूस आनंदी राहील नाहीतर या प्रगतीच्या युगात माणूस शेवटी पोरकाच राहील ,स्वतःच आनंद – दुःख त्याला वाटता येणार नाही .फक्त भौतिक सुखाचा आनंद भोगून तो फक्त यांत्रिक होईल . खऱ्या अर्थाने हे सण उत्सव हे एकमेकांना आनंद वाटण्यासाठीच असतात आणि आनंद वाटून परमानंद मिळवण्यासाठी असतात…. मला ह्या गोष्टीचा नेहमी आनंद राहील की मला वेळोवेळी अशा महोत्सवाचा प्रत्यक्ष साक्षीदार होता आलं यात मी नेहमीच धन्यता मानतो…
– अतुल प्रभाकर उज्जैनकर ( गुरुजी )चांदुर रेल्वे..
Leave a Reply