लाचखोर कंत्राटी गृहनिर्माण अभियंत्यासह दोघे एसीबीच्या जाळ्यात ◼️10 हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात अटक

लाचखोर कंत्राटी गृहनिर्माण अभियंत्यासह दोघे एसीबीच्या जाळ्यात

◼️10 हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात अटक

गोंदिया : घरकुल लाभार्थ्याकडून 10 हजार रुपयाच्या लाचेची मागणी करणाऱ्या कंत्राटी कनिष्ठ अभियंता व त्याच्या दोन साथीदाराला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने आज (ता. 1) लाच स्विकारताना रंगेहाथ पकडले. कंत्राटी गृहनिर्माण अभियंता
प्रमोद बीरसिंग उपवंशी ( वय 38, पंचायत समिती गोंदिया, रा.शारदा कॉलोनी, कुडवा), ग्रामपंचायत शिपाई धनंजय मुन्नालाल तांडेकर (वय 45 रा. कामठा, ता. जि. गोंदिया ), खाजगी ईसम विश्वनाथ गोविंदराव तरोणे (वय 62, रा. लहरी आश्रम रोड कामठा) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहे.

तक्रारदार हे शेतमजुरी करीत असून त्यांना प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरकुल मंजूर झाले आहे. दरम्यान, घरकुलाच्या अनुदानाचा पहिला हप्ता 15 हजार रुपये त्यांच्या खात्यात वळती झाल्याचे आरोपी धनंजय तांडेकर याने तक्रारदारास कळविले. या आधारावर त्यांनी घरकुलाचे बांधकाम चालू केले व पायाभरणीचे काम पूर्ण झाल्यानंतर आरोपी धनंजय तांडेकर यास कळविले. यानंतर 27 नोव्हेंबर 2024 रोजी आरोपी कंत्राटी गृहनिर्माण अभियंता प्रमोद उपवंशी व ग्रापं शिपाई धनंजय तांडेकर यांनी तक्रारदाराच्या घरी येऊन घराच्या बांधकामाचे फोटो काढले व तक्रारदाराच्या मुलास घरकुलाच्या अनुदानाची उर्वरित रक्कम वर्ग करणार असून त्याच्या मोबदल्यात 10 हजार रुपयाची मागणी केली. व 21 डिसेंबर 2024 रोजी तक्रारदारास फोन करून अनुदानाच्या दुसर्‍या हप्त्याचे 70 हजार तक्रारदाराच्या खात्यात वर्ग
केल्याचे सांगून 10 हजार आरोपी तांडेकर याच्याकडे देण्यास सांगितले होते.

मात्र, तक्रारदार यांना लाच देण्याची ईच्छा नसल्याने तक्रारदार यांनी लाच लुचपत प्रतिबंधक विभाग गोंदिया येथे तक्रार दिली.
लाच मागणी पडताळणीदरम्यान आरोपी उपवंशी याने प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत अनुदान तक्रारदार यांच्या पोस्टातील खात्यात वर्ग करण्याच्या मोबदल्यात 10 हजार रुपये लाचेची पंचासमक्ष मागणी केली व आरोपी तांडेकर याने लाच मागणीस प्रोत्साहन दिले. सापळा कारवाईदरम्यान आरोपी क्रमांक उपवंशी व तांडेकर यांच्या सांगण्यावरून आरोपी हॉटेल चालक विश्वनाथ तरोणे याने तक्रारदार यांचेकडून पंचासमक्ष 10 हजार रुपये लाच रक्कम स्वीकारली. दरम्यान, लाच रकमेसह आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून या प्रकरणी रावणवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केला आहे.

◾️यांनी केली कारवाई….

सदरची कारवाई लाच लुचपत प्रतिबंधक विभाग नागपूर परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक डॉ. दिगंबर प्रधान, अपर पोलीस अधीक्षक सचिन कदम, संजय पुरंदरे, पर्यवेक्षक अधिकारी पोलीस उप अधीक्षक विलास काळे यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक उमाकांत उगले, सहायक फौजदार चंद्रकांत करपे, पोलीस हवालदार संजय कुमार बोहरे, मंगेश काहालकर, नायक पोलीस शिपाई संतोष शेंडे, संतोष बोपचे, अशोक कापसे, प्रशांत सोनेवाने, महिला नायक पोलीस शिपाई संगीता पटले , रोहिणी डांगे, चालक नायक पोलीस शिपाई दिपक बाटबर्वे यांनी केली.

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

More posts