पोंगेझरा शिव मंदिरात वन्यजीव अधिकाऱ्यांची दबंगशाही ◼️कारवाईच्या नावावर शिवभक्तांकडून अवैध वसुली ◼️नवेगाव-नागझिरा प्रवेश द्वारावर शिवभक्तांसह नागरिकांचा ठिय्या

पोंगेझरा शिव मंदिरात वन्यजीव अधिकाऱ्यांची दबंगशाही

◼️कारवाईच्या नावावर शिवभक्तांकडून अवैध वसुली

◼️नवेगाव-नागझिरा प्रवेश द्वारावर शिवभक्तांसह नागरिकांचा ठिय्या

गोंदिया : नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पाच्या बफर क्षेत्रात येत असलेल्या गोरेगाव तालुक्यातील बोळूंदा पोंगेझरा देवस्थानात 31 डिसेंबर रोजी दर्शनासाठी आलेल्या भाविकांशी वन्यजीव वनविभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी रात्रीच्या सुमारास असभ्य वर्तन केला व कारवाईच्या नावावर 25 हजार रुपये वसूल केल्याचा आरोप दर्शनासाठी आलेल्या शिवभक्तांनी केला आहे. तर तशी माहिती शिवमंदिर ट्रस्ट व परिसरातील नागरिकांना दिली. यावर मंदिर समिती व परिसरातील बोळूंदा, हिरापूर, आसलपाणी येथील गावकऱ्यांनी आज, (ता. 1) संताप व्यक्त करून संबंधित वन्यजीव कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी व शिवमंदिर परिसर वनविभागाच्या हद्दीतून मुक्त करण्यात यावे अशी मागणी करत शिवभक्तासह बोळूंदा येथील नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पाच्या प्रवेश द्वारावर आंदोलन केले. यावेळी प्रवेश द्वारावरील चौकीवर वन्यजीव विभागाच्या कर्मचाऱ्यांकडून नेहमीच भाविकांशी असा व्यवहार होत असल्याचे सांगत गावकऱ्यांनी आपला रोष व्यक्त केला. त्यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

मिळालेल्या माहितीनुसार, येथील वन्यजीव वनविभागाच्या हद्दीत पोंगेझरा शिवमंदिर असून, पाथरी येथील रहिवासी राजेश हर्षे हे आपल्या कुटुंबासह 31 डिसेंबर रोजी शिवमंदिरात पूजा करण्यासाठी आले होते, मात्र, सायंकाळ झाल्याने जंगलातील प्राण्यांच्या भीतीने ते आपल्या कुटुंबासह मंदिरात थांबले, याचवेळी गोंदियाचे रहिवासी बिट्टू अग्रवाल हे देखील उशीर झाल्याने घरी जाऊ शकत नव्हते त्यामुळे जवळपास सात ते आठ भाविकांनी रात्रभर मंदिरातच राहण्याचा ठरवले. दरम्यान रात्री 12 वाजताच्या सुमारास वन्यजीव विभागाचे पथकाने शिवमंदिर परिसर गाठत हर्षे कुटुंबाला शिवमंदिरातून बाहेर काढले. व मंदिरपासून दोन ते तीन किमी अंतरावरील नवेगाव नागझिऱ्याच्या प्रवेशद्वार परिसरातील चौकीवर आणून कारवाईच्या नावावर चार दुचाकी आणि एक चारचाकी वाहन ताब्यात घेतले. विशेष म्हणजे, रात्री गस्तीवर असलेले वनपरिक्षेत्राधिकारी यांनी बिट्टू अग्रवाल यांच्याकडून 25 हजार रुपयांचे दंड वसूल करून स्वाक्षरी न करता 25 हजार रुपयांची पावती दिली. तर राजेश हर्षे यांच्याकडेही वन्यजीव विभागाच्या अधिकाऱ्यांनी 10 हजार रुपये व इतर भाविकांकडून 5 ते 10 मागितल्याचे आरोप आंदोलकांनी करत रोष व्यक्त केला. त्यामुळे काही काळासाठी तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

◾️शिवमंदिर परिसर वनविभागाकडून मुक्त करावा…

शिव मंदिर परिसराला घेऊन मंदिर ट्रस्ट आणि वन्यजीव वनविभाग यांच्यात अनेक वर्षांपासून वाद सुरू आहे. त्यातच रात्री व आज सकाळी झालेल्या या प्रकाराने वाद आणखी चिघळला आहे. ट्रस्टचे अध्यक्ष विजय राणे यांनी सांगितले की, हे शिव मंदिर पुरातन काळातील असून हजारो भाविकांची श्रद्धा आहे, मात्र, वनविभागाकडून नेहमीच भक्तांना त्रास देण्याचा प्रयत्न केला जातो. ट्रस्टचे सदस्य व माजी उपसभापती सुरेंद्र बिसेन म्हणाले की, 31 डिसेंबरच्या रात्री वनविभागाच्याच कर्मचाऱ्यांनी प्रवेशद्वार परिसरातील चौकीवर ओली पार्टी केल्याचा आरोप केला असून मद्यपान करून कर्मचाऱ्यांनी शिवभक्तांना जबरदस्तीने मंदिराबाहेर काढण्याचे काम केले. व शिवभक्तांसोबत असे असभ्य वर्तन केल्याचा आरोप केला आहे. तेव्हा शिवमंदिर वन्यजीव वनविभागाकडून मुक्त करावे, शिवभक्तांशी असभ्य वर्तन करणाऱ्या वन्यजीव अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी ट्रस्टतर्फे केली असल्याचे सांगितले.

◼️पैशाचा कोणताही व्यवहार झाला नाही…
याबाबत वन्यजीव वनविभागाचे आरएफओ सागर बारसागडे यांनी सांगितले की, 31 डिसेंबरच्या रात्री 4 दुचाकी व 1 चारचाकी वाहनांवर कारवाई करण्यात आली असून त्यात केवळ पावती देण्यात आली आहे. तर, एकाही व्यक्तीकडून पैसे घेतलेले नाही. वनविभागाच्या कर्मचाऱ्यांवर हे आरोप निराधार आहेत.

सागर बारसागडे, वनपरिक्षेत्राधिकारी, नवेगांव-नागझिरा

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

More posts