डिजिटल मीडिया न्यूज पोर्टल संघाने जिल्हा माहिती अधिकाऱ्यांना निवेदन दिले — डिजिटल पत्रकारांना शासनमान्यता व सुविधा देण्याची मागणी

डिजिटल मीडिया न्यूज पोर्टल संघाने जिल्हा माहिती अधिकाऱ्यांना निवेदन दिले — डिजिटल पत्रकारांना शासनमान्यता व सुविधा देण्याची मागणी

नागपूर (विजय खवसे) — डिजिटल मीडिया न्यूज पोर्टल संघ, नागपूर तर्फे शुक्रवार दिनांक 18 ऑक्टोबर 2025 रोजी जिल्हा माहिती अधिकारी विनोद रापतवार यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनाद्वारे डिजिटल मीडिया पत्रकारांना शासनमान्यता, सुविधा आणि संरक्षण मिळावे, तसेच डिजिटल माध्यमाच्या प्रगतीसाठी आवश्यक बाबी शासनाकडे पाठविण्याची मागणी करण्यात आली.

निवेदन देताना संघाचे अध्यक्ष संतोष गायकवाड, सचिव विजय खवसे आणि कोषाध्यक्ष अमित वानखडे उपस्थित होते.

सध्या डिजिटल मीडिया हे माहिती प्रसाराचे सर्वात प्रभावी माध्यम बनले आहे. समाजातील प्रत्येक घटकापर्यंत बातम्या, सरकारी योजना आणि सामाजिक प्रश्न तत्काळ पोहोचविण्यात डिजिटल मीडियाचे योगदान अत्यंत महत्त्वाचे आहे. मात्र, शासनमान्यता, सुविधा आणि संरक्षण या दृष्टीने डिजिटल पत्रकारांना अद्याप न्याय मिळालेला नाही, असे संघाचे म्हणणे आहे.

संघाने सादर केलेल्या प्रमुख मागण्या पुढीलप्रमाणे आहेत —

🔹 शासनमान्यता (Accreditation): जिल्हास्तरावर कार्यरत डिजिटल न्यूज पोर्टल्स व त्यांच्या प्रतिनिधींना शासनमान्य पत्रकार म्हणून मान्यता द्यावी.
🔹 ‘डिजिटल मीडिया भवन’ उभारणी: जिल्हा मुख्यालयावर डिजिटल पत्रकारांसाठी स्वतंत्र भवन उभारण्यात यावे, जेथे पत्रकार परिषद, बैठक व संपादकीय कार्ये पार पाडता येतील.
🔹 वाहतूक सुविधा व प्रवास सवलत: डिजिटल पत्रकारांना बस, रेल्वे व विमान प्रवासात शासनमान्य पत्रकारांप्रमाणे सवलती देण्यात याव्यात.
🔹 शासन योजनांमध्ये समावेश: मान्यता प्राप्त डिजिटल पत्रकारांना पत्रकार कल्याण निधी, विमा योजना, निवास योजना आदींचा लाभ मिळावा.
🔹 पत्रकार संरक्षण कायद्यात समावेश: महाराष्ट्र पत्रकार संरक्षण कायद्यात डिजिटल मीडिया पत्रकारांचा स्पष्ट समावेश करण्यात यावा.
🔹 प्रशिक्षण व कार्यशाळा: जिल्हा माहिती कार्यालयामार्फत डिजिटल पत्रकारांसाठी तंत्रज्ञान, पत्रकारिता नीती आणि सायबर सुरक्षा विषयक कार्यशाळा आयोजित करण्यात याव्यात.
🔹 प्रेस रिलीज वितरणात समावेश: जिल्हा माहिती कार्यालयाकडून प्रसारित होणारे सर्व शासकीय प्रेसनोट्स डिजिटल मीडियालाही नियमितरित्या पाठवावेत.
🔹 जाहिरात वाटप धोरण: माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या जाहिरात वाटप धोरणात डिजिटल मीडियाला स्वतंत्र व समान स्थान देण्यात यावे.
🔹अधिवेशनांमध्ये प्रतिनिधित्व: मुंबई अधिवेशन तसेच नागपूर हिवाळी अधिवेशन दरम्यान होणाऱ्या पत्रकार बैठकीसाठी संघाच्या एका प्रतिनिधीला आमंत्रित करण्यात यावे.

संघाने स्पष्ट केले की, या सर्व मागण्या डिजिटल माध्यमांच्या प्रगतीसाठी आणि पत्रकारांच्या सक्षमीकरणासाठी अत्यंत आवश्यक आहेत. शासनाने या मागण्यांकडे सकारात्मक दृष्टीकोनातून पाहून लवकरात लवकर निर्णय घ्यावा, अशी नम्र विनंती संघाने केली आहे.

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

More posts