गरजु लाभार्थ्यांपर्यंत सामाजिक न्याय विभागाच्या योजनांचा लाभ पोहचविण्यासाठी कटिबध्द व्हा – आनंदराव अडसूळ, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाती आयोग

गरजु लाभार्थ्यांपर्यंत सामाजिक न्याय विभागाच्या योजनांचा लाभ पोहचविण्यासाठी कटिबध्द व्हा

– आनंदराव अडसूळ, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाती आयोग

नागपूर,दि. 15 : अनुसूचित जाती -जमाती प्रवर्गातील अनेक लोक आजही सामाजिक न्यायाच्या विविध योजनांपासून वंचित आहेत. या वर्गाला विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठीच शासनाने विविध योजनांची निर्मिती केली. गरजु लाभार्थ्यांपर्यंत सामाजिक न्याय विभागाच्या योजनांचा लाभ पोहचविण्यासाठी अधिकाऱ्यांनी खबरदारी घ्यावी असे निर्देश महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाचे अध्यक्ष आनंदराव अडसूळ यांनी दिले.

सामाजिक न्याय भवन येथे आज त्यांनी नागपूर जिल्ह्यातील सामाजिक न्याय विभागाअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा आढावा घेतला. यावेळी त्यांच्या समवेत आयोगाचे उपाध्यक्ष ॲड. धर्मपाल मेश्राम, समाज कल्याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्त बाबासाहेब देशमुख, समाज कल्याण अधिकारी किशोर भोयर, सहाय्यक आयुक्त सुकेशिनी तेलगोटे व विविध महामंडळाचे अधिकारी उपस्थित होते.

मांग, गारुडी, पारधी सारखे भटके समाज विदर्भातील अनेक गाव, वस्ती शेजारी राहतात. त्यांना विविध शासकीय योजनांचा लाभ देण्यासाठी जी कागदपत्र लागतात त्यात जात प्रमाणपत्र, रहिवास प्रमाणपत्र, आधार आवश्यक तपासली जातात. त्यांना आवश्यक असलेले प्रमाणपत्र वेळेत मिळावेत यासाठी महसूल विभागाशी समन्वयातून प्रयत्न करणे गरजेचे आहे, असे त्यांनी सांगितले.

मिनी ट्रॅक्टरच्या धर्तीवर शहरी भागातील युवावर्गासाठी नव्याने योजना साकारण्याचे त्यांनी स्पष्ट केले. प्रारंभी समाज कल्याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्त बाबासाहेब देशमुख यांनी आढावा बैठकीचे प्रास्ताविक केले. सहाय्यक आयुक्त सुकेशिनी तेलगोटे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

More posts