ट्रक खाली दबून शेतकर्याचा मृत्यू
◾️अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील घटना
गोंदिया : शेताकडे जात असलेल्या शेतकर्याच्या अंगावर धानाचा कोंडा भरून जात असलेला ट्रक उलटल्याने ट्रकच्या खाली दबून त्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना आज सोमवार (ता. 9) दुपारी 1 वाजताच्या सुमारास कोहमारा-वडसा मार्गावरील अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील इसापूर ते माहुरकुडा जोडरस्त्यावर घडली. वासुदेव विठोबा लांजेवार (वय 65, रा. इसापूर) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.
मृत शेतकरी वासुदेव हे आज, दुपारी आपल्या शेताकडे जात होते. दरम्यान, कोहमारा-वडसा मार्ग ओलांडून शेतीकडे जात असता त्याच वेळी इसापूर माहूरकुडा जोड रस्त्यावर अर्जुनी मोरगावकडून वडसा कडे धानाचा कोंडा भरून जात असलेला ट्रक क्रमांक एम.एच. 49 एटी 3259 त्यांच्या अंगावर पलटला ज्यामध्ये ट्रक खाली दबून त्यांचा जागीच मृत्यू झाला.
या घटनेची माहिती अर्जुनी-मोरगाव पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून पोलीस निरीक्षक कमलेश सोनटक्के यांच्या मार्गदर्शनात घटनास्थळाचा पंचनामा केला. यावेळी दोन जेसीबींच्या सहाय्याने मृतक वासुदेव यांचा मृत्यदेह बाहेर काढण्यात आला. दरम्यान मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालय अर्जुनी मोरगाव येथे पाठविण्यात आले. पुढील तपास पोलीस करीत आहेत.