“पोलीस आयुक्तांची बदली होणे आवश्यकच होते” – माजी पोलीस अधिकारी नितीन मोहोड

0
37

“पोलीस आयुक्तांची बदली होणे आवश्यकच होते” – माजी पोलीस अधिकारी नितीन मोहोड

अमरावती, प्रतिनिधी :
अमरावतीचे पोलीस आयुक्त अरविंद चावरिया यांच्या जागी शासनाने राकेश ओला यांची नियुक्ती केल्याबद्दल माजी पोलीस अधिकारी नितीन मोहोड यांनी समाधान व्यक्त केले असून ही बदली अत्यंत आवश्यक होती, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.

मोहोड यांनी म्हटले आहे की, चावरिया यांच्या कार्यकाळात शहरात भ्रष्टाचारासह गुन्हेगारीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली. जुगार, अवैध दारू व गुटखा विक्री, बूटलेगिंग, ढाब्यांवर व रस्त्यावर खुलेआम दारू पिण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणात वाढले होते. गुन्हे शाखेची संपूर्ण जबाबदारी एकाच व्यक्तीकडे देण्यात आली होती, तर गुन्हे शाखेचे युनिट क्रमांक दोन बंद करण्यात आले होते. याशिवाय सर्व पोलीस ठाण्यांतील डीबी युनिटही बंद करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला.

फ्रेजरपुरा पोलीस ठाण्याच्या बाजूला गुन्हे शाखेने अवैधरित्या कार्यालय थाटून तिथून सर्व हालचाली केल्या जात असल्याचेही त्यांनी नमूद केले. गुन्हे शाखेतील काही कर्मचारी हॉटेल व्यावसायिकांवर दबाव टाकून हप्ते बांधत असल्याच्या ऑडिओ क्लिप्सही यापूर्वी जाहीर झाल्या होत्या, असे मोहोड यांनी सांगितले.

खोटे गुन्हे दाखल करण्याची धमकी देऊन पैसे वसुली केल्याचा अनुभव स्वतःला आल्याचा दावाही त्यांनी केला आहे. तसेच गुन्हे शाखेतील अधिकारी संदीप चव्हाण यांच्या कथित बेकायदेशीर नियुक्तीबाबत पुराव्यासह शासन व पोलीस महासंचालकांकडे तक्रार केल्यानंतर चौकशीचे आदेश देण्यात आले होते, असे त्यांनी स्पष्ट केले. चव्हाण यांच्यावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असूनही 2009 च्या पोलीस महासंचालकांच्या परिपत्रकाचे उल्लंघन करून त्यांची नियुक्ती करण्यात आल्याचा आरोप मोहोड यांनी केला.

शहरातील वाढत्या गुन्हेगारीबाबत अनेक आजी-माजी लोकप्रतिनिधी व आमदारांनी कारवाईची मागणी केली होती. शिक्षक आमदार जगन्नाथ अभ्यंकर यांनीही याबाबत पोलीस आयुक्तांना पत्र लिहिले होते. वर्तमानपत्रांतूनही पोलीस प्रशासनावर सातत्याने प्रश्न उपस्थित करण्यात येत होते, असे मोहोड यांनी सांगितले.

मोहोड यांच्या मते, अमरावतीतील सुमारे 80 टक्के पोलीस कर्मचारी तत्कालीन आयुक्त व गुन्हे शाखेच्या कार्यपद्धतीवर नाराज होते. आता नव नियुक्त पोलीस आयुक्त राकेश ओला यांच्या कार्यकाळात गुन्हे शाखेत निष्कलंक व प्रामाणिक कर्मचाऱ्यांची नियुक्ती होईल, अशी अपेक्षा नितीन मोहोड यांनी व्यक्त केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here