दिव्यांगांना मदतीचा हात, ज्येष्ठांना आधार!
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या जनसंपर्क कार्यक्रमाला नागरिकांची गर्दी
नागपूर – केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री ना. श्री. नितीन गडकरी यांच्या जनसंपर्क कार्यक्रमात आज, रविवार, दि. २ नोव्हेंबरला दिव्यांग बांधवांनी गर्दी केली होती. यावेळी ना. श्री. गडकरी यांनी दिव्यांगांना मदतीचा हात दिला, तर ज्येष्ठांनाही आधार देऊन दिलासा दिला. अनेकांनी ऑन दि स्पॉट काम झाल्यामुळे ना. श्री. नितीन गडकरी यांचे आभार मानले.

खामला चौकातील जनसंपर्क कार्यालयात ना. श्री. गडकरी यांना भेटण्यासाठी नागपूरकरांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. यावेळी विविध समाजघटकांबरोबरच मोठ्या संख्येने दिव्यांग बांधवांनीही उपस्थित राहून आपल्या अडचणी आणि मागण्या मांडल्या.
दिव्यांग नागरिकांनी शैक्षणिक, आरोग्य व उपजीविकेसाठी आवश्यक साहित्याची मागणी केली. त्यांची निवेदने स्वीकारून घेतल्यानंतर केंद्रीय मंत्री श्री. गडकरी यांनी तात्काळ संबंधित विभागीय अधिकाऱ्यांना सूचना देत आवश्यक ते सहकार्य करण्याचे निर्देश दिले. ‘दिव्यांग बांधवांचे जीवन सुसह्य करण्यासाठी शासन विविध योजनांच्या माध्यमातून प्रयत्नशील आहे. कोणत्याही पात्र लाभार्थ्याला मदतीपासून वंचित राहू दिले जाणार नाही,’ असा विश्वास ना. श्री. गडकरी यांनी दिव्यांग बांधवांना दिला.
जनसंपर्क कार्यक्रमात नागरिकांनी स्थानिक पायाभूत सुविधा, वाहतूक व्यवस्था, तसेच सामाजिक कल्याणशी निगडित विविध विषयांवरही ना. श्री. गडकरी यांच्याशी चर्चा केली. यावेळी काही इनोव्हेटिव्ह कल्पना देखील तरुणांनी त्यांच्यापुढे मांडल्या. ना. श्री. गडकरी यांनी या कल्पनांचे कौतुक करून त्यांना योग्य मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाला नागपूरातील विविध विभागांचे अधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
साहेब, पेन्शनचे काम झाले हो!
‘सहा वर्षांपासून रखडलेले निवृत्तीवेतनाचे काम आपल्या पत्रामुळे मार्गी लागले. आपला खूप खूप आभारी आहे,’ या शब्दांत एका ज्येष्ठ नागरिकाने ना. श्री. गडकरी यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली.

Leave a Reply