आंबेडकरी विचारांचा बुलंद आवाज हरपला! ज्येष्ठ पत्रकार, लेखक व विचारवंत मिलिंद कीर्ती यांचे अपघाती निधन!
– नागपूरच्या वाडी फ्लायओव्हरवर अपघात; उपचारादरम्यान घेतला अखेरचा श्वास, पत्रकारिता आणि साहित्य क्षेत्रावर शोककळा!
नागपूर WH NEWS : आंबेडकरी विचारांचे निष्ठावंत भाष्यकार, ज्येष्ठ पत्रकार, लेखक आणि विचारवंत मिलिंद कीर्ती यांचे नागपूर येथील रस्ते अपघातात निधन झाले. त्यांच्या निधनाने आंबेडकरी चळवळीसह पत्रकारिता, साहित्य आणि वैचारिक क्षेत्राची मोठी हानी झाली आहे. समता, न्याय आणि परिवर्तनवादी विचारांची भूमिका मांडणारा एक महत्त्वाचा आवाज हरपल्याची भावना व्यक्त होत आहे.
मंगळवारी, १३ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री अमरावती रोडवरील वाडी फ्लायओव्हरवर हा अपघात घडला. पोलिसांच्या माहितीनुसार, भरधाव वेगाने जाणाऱ्या दुचाकीने दुसऱ्या दुचाकीला धडक दिल्यानंतर चारचाकी वाहनालाही धडक दिली. या अपघातात मिलिंद कीर्ती गंभीर जखमी झाले होते. त्यांना उपचारासाठी रामदासपेठ येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचार सुरू असताना बुधवारी पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली.
पत्रकारिता, साहित्य आणि आंबेडकरी विचारविश्वातील योगदान
मिलिंद कीर्ती यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून समाजातील विविध प्रश्नांना वाचा फोडली. त्यांनी लोकमत आणि लोकशाही वार्ता या माध्यमांमध्ये संपादक म्हणून काम केले होते. पत्रकारितेबरोबरच लेखन आणि वैचारिक क्षेत्रातही त्यांनी आपला ठसा उमटवला.
तंत्रज्ञान, तत्त्वज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि त्याचा समाजावर होणारा परिणाम अशा विषयांवर त्यांनी पुस्तके लिहिली होती. सामाजिक बदल, वैचारिक मंथन आणि समकालीन प्रश्नांवरील त्यांचे लेखन त्यांच्या बौद्धिक कार्याची साक्ष देणारे होते.
आंबेडकरी विचारधारा आणि परिवर्तनवादी चळवळीशी संबंधित वर्तुळात त्यांची ओळख एक अभ्यासू पत्रकार, लेखक आणि विचारवंत म्हणून होती. त्यांच्या निधनाने वैचारिक संवाद आणि सामाजिक प्रश्नांवरील निर्भीड पत्रकारितेच्या क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.
अपघातप्रकरणी वाडी पोलिसांत गुन्हा दाखल
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आदित्य दीपक खंडेलवाल हे आपल्या कुटुंबासह एमजी विंडसर या चारचाकी वाहनाने जात असताना हा अपघात झाला. MH-49-CV-3300 क्रमांकाच्या दुचाकीने MH-30-Q-3635 क्रमांकाच्या दुसऱ्या दुचाकीला धडक दिली. त्यानंतर या दुचाकीची चारचाकी वाहनालाही धडक बसली.
या अपघातात मिलिंद कीर्ती गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी वाडी पोलिसांनी दुचाकीचालक आश्रय डागा याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमांसह मोटार वाहन कायद्याच्या कलम १८४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांच्या नोंदीनुसार, गुन्हा दाखल होताना आरोपीला अटक करण्यात आलेली नव्हती.
