बिबट्याच्या कातडीप्रकरणी दोघांना अटक; माजी उपसरपंचाचाही समावेश! -नागपूर प्रादेशिक युनिटची देवरी परिसरात कारवाई

Follow Us on :

 

बिबट्याच्या कातडीप्रकरणी दोघांना अटक; माजी उपसरपंचाचाही समावेश!
-नागपूर प्रादेशिक युनिटची देवरी परिसरात कारवाई

गोंदिया, २९ सप्टेंबर : बिबट्याची कातडी असल्याचे सांगितलेल्या वन्यजीव अवशेषाच्या कथित विक्रीप्रकरणी दोन व्यक्तींना नागपूर प्रादेशिक युनिटच्या पथकाने मंगळवारी (२९ सप्टेंबर) देवरी तालुक्यातील देवरी-पुराडा मार्गावरील ढीवरिनटोला (मडावीटोला) परिसरातून ताब्यात घेतले.

धनराज रामलाल उईके (३५), रा. ढीवरिनटोला, ता. देवरी आणि नीलकंठ रामचंद्र पांढरे (३७), रा. श्रीरामनगर, ता. सडक अर्जुनी, अशी ताब्यात घेण्यात आलेल्या व्यक्तींची नावे आहेत. धनराज उईके हे संबंधित ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच असल्याची माहिती आहे.

मिळालेल्या गुप्त माहितीनुसार नागपूर प्रादेशिक युनिटचे अधिकारी आदित्य कुमार बैरवा व जेरी थॉमस यांच्या पथकाने कारवाई केली. कारवाईदरम्यान दोघांकडून पांढऱ्या कापडात गुंडाळलेली, प्राथमिक माहितीनुसार बिबट्याची कातडी असल्याचे सांगण्यात आलेली वस्तू जप्त करण्यात आली.

सदर वस्तू वन्यजीव संरक्षण अधिनियम, १९७२ अंतर्गत संरक्षित वन्यजीवाशी संबंधित असल्याने पुढील कायदेशीर तपासणी व कार्यवाहीसाठी दोन्ही व्यक्तींना प्रादेशिक वन विभाग, देवरी यांच्या ताब्यात देण्यात आल्याची माहिती आहे.

जप्त करण्यात आलेली कातडी नेमकी कुठून आणण्यात आली, ती कोणाकडून मिळाली आणि तिची कथित विक्री कोणाला करण्यात येणार होती, याबाबत तपास यंत्रणांकडून चौकशी सुरू आहे. या प्रकरणामागे आणखी व्यक्ती किंवा वन्यजीव तस्करीचे मोठे जाळे आहे का, याचाही तपास केला जात आहे.

तसेच संबंधित व्यक्तींची पूर्वीची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे किंवा नाही, याचीही पडताळणी केली जात असल्याची माहिती आहे.

दरम्यान, या प्रकरणातील व्यक्तींवरील आरोप तपासाच्या अधीन असून, दोष सिद्ध होणे बाकी आहे. अंतिम निर्णय सक्षम न्यायालयाच्या प्रक्रियेनुसार होईल.

गोंदिया वन विभागाच्या भूमिकेबाबतही प्रश्न

देवरी तालुका छत्तीसगड सीमेलगत असल्याने या परिसरातील वन्यजीव संरक्षण आणि अवैध शिकारीविरोधातील यंत्रणेच्या कार्यक्षमतेबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. नागपूर येथील पथकाने कारवाई केल्याने स्थानिक वन विभागाला या कथित व्यवहाराची पूर्वकल्पना होती का, असल्यास त्यावर कोणती कारवाई करण्यात आली होती, याबाबत अधिकृत स्पष्टीकरण अपेक्षित आहे.

News By

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

यह भी पढ़िए