गुरुकुंज मोझरीत अतिक्रमणाच्या नावाखाली गरिबांच्या चुली विझवण्याचा डाव! -सामाजिक कार्यकर्ते प्रशांत कांबळे आणि पीडित दुकानदारा आक्रमक, – ऐन पुण्यतिथी महोत्सवाच्या तोंडावर प्रशासनाची हुकूमशाही!

Follow Us on :

गुरुकुंज मोझरीत अतिक्रमणाच्या नावाखाली गरिबांच्या चुली विझवण्याचा डाव!

-सामाजिक कार्यकर्ते प्रशांत कांबळे आणि पीडित दुकानदारा आक्रमक,

– ऐन पुण्यतिथी महोत्सवाच्या तोंडावर प्रशासनाची हुकूमशाही!

गुरुकुंज मोझरी WH NEWS : वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या आगामी पुण्यतिथी महोत्सवाच्या तोंडावर गुरुकुंज मोझरी येथील स्थानिक बेरोजगार तरुणांच्या उपजीविकेवर प्रशासनाने गदा आणण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) आणि प्रशासनाकडून कोणतीही पूर्वसूचना किंवा नोटीस न देता ऐन सणाच्या काळात दुकानांचे अतिक्रमण हटवण्याची कारवाई रचली जात असल्याने परिसरात तीव्र संताप व्यक्त होत आहे.

याविरोधात सामाजिक कार्यकर्ते प्रशांत कांबळे यांनी स्थानिक दुकानदारांसह मैदानात उतरून प्रशासनाच्या या मनमानी कारभाराला जोरदार विरोध दर्शवला आहे. आधीच कोरडा दुष्काळ, अवकाळी आणि अस्मानी-सुलतानी संकटांमुळे बळीराजा आणि स्थानिक नागरिक मेटाकुटीस आले आहेत. अशा परिस्थितीत मोझरीतील स्थानिक तरुणांनी उसणवारी आणि कर्ज काढून आगामी पुण्यतिथी महोत्सवासाठी दुकानांमध्ये माल भरला आहे. चहा, नाश्ता, पानसेंटर आणि झुणका भाकर केंद्र चालवून आपल्या कुटुंबाचा गाडा हाकणाऱ्या या छोट्या व्यावसायिकांवर आता उपासमारीची वेळ आणली जात आहे. त्यामुळे तातडीने अतिक्रमण काढण्याचा निर्णय रद्द करावा या मागणीचे निवेदन माजी मंत्री यशोमती ठाकूर, जिल्हाधिकारी अमरावती, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभाग, पोलीस अधीक्षक ग्रामीण अमरावती, पोलीस निरीक्षक तिवसा यांना देण्यात आले आहे. यावेळी विनायक तायडे, रमेश बावणे, प्रफुल बोके, गजानन भुरे, गजानन बायस्कर, अमोल तायवाडे, अमोल सावरकर, अशीद शहा, मंगेश मोरे, राजू खंडारे, अय्याज खा कदीर खा, नरेंद्र गायकवाड, संदीप शिंदे, आकाश खत्री, निलेश बावणे, गितेश बावणे, नवलसिंग ठाकूर, किसनराव गोहाड, प्रतीक राऊत, सचिन लाहोरे, ललित घारोडे, पवन ठक्कर, शाम गायकवाड, सुनील गाडगे, अजित लेकुरवाडे, अर्जुनसिंग पाल, प्रवीण बोके, विनोद भुरे, सुनील काकडे, रघुनाथ भोंगाडे, अय्याज खान यासह शेकडो दुकानदार उपस्थित होते

विकास कोणासाठी? बेरोजगारांना रस्त्यावर आणणारा विकास कसला?-यशोमती 

महामार्ग बायपास झाल्यामुळे आधीच येथील स्थानिक व्यावसायिकांचा धंदा मंदावला आहे. मुख्य रस्त्यावरून आता कोणतीही मोठी रहदारी किंवा वाहतुकीचा अडथळा नसताना केवळ सौंदर्यीकरणाच्या नावाखाली गरिबांचे रोजगार उद्ध्वस्त केले जात आहेत. ऐन पुण्यतिथी महोत्सवात लाखो भाविक येतात आणि याच दोन महिन्यांच्या काळात स्थानिक युवकांना चार पैसे कमवण्याची संधी मिळते. परंतु, प्रशासनाच्या या कारवाईमुळे व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे सावट पसरले आहे.माजी मंत्री ॲड. यशोमती ठाकूर आक्रमक; जिल्हाधिकाऱ्यांना थेट इशारा!

सामाजिक कार्यकर्ते प्रशांत कांबळे यांच्या पुढाकाराने पीडित दुकानदारांनी एकत्र येत माजी मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांची भेट घेऊन प्रशासनाच्या अन्यायाविरुद्ध गाऱ्हाणे मांडले. या घटनेची गंभीर दखल घेत यशोमतीताई ठाकूर यांनी तात्काळ आक्रमक भूमिका घेतली. त्यांनी थेट जिल्हाधिकारी, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी आणि पोलीस प्रशासनाला धारेवर धरत स्पष्ट इशारा दिला की, पुण्यतिथी महोत्सव होईपर्यंत कोणत्याही परिस्थितीमध्ये अतिक्रमण हटवण्याची कारवाई करण्यात येऊ नये! तरुणांच्या रोजगारावर नांगर फिरवणारा विकास काय कामाचा?” असा सवाल त्यांनी केला आहे.

प्रशासनाने हट्ट न सोडल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा!

सामाजिक कार्यकर्ते प्रशांत कांबळे आणि स्थानिक दुकानदारांनी स्पष्ट केले आहे की, आम्ही प्रशासनाला सहकार्य करण्यास नेहमीच तयार आहोत, मात्र ऐन यात्रेच्या काळात पोटारमार करणारी ही कारवाई खपवून घेतली जाणार नाही. जर प्रशासनाने आपली हुकूमशाही मोहीम तात्काळ स्थगित केली नाही, तर सर्व दुकानदार आणि नागरिक रस्त्यावर उतरून तीव्र संघर्ष करतील, असा इशारा आता देण्यात आला आहे.

News By

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

यह भी पढ़िए