धम्मचक्र प्रवर्तन दिनासाठी दीक्षाभूमीवर चोख सोयी-सुविधा द्या
– प्रधान सचिव डॉ. हर्षदीप कांबळे यांचे निर्देश;
विभागांनी समन्वयाने नियोजन करण्याचे आवाहन
नागपूर, दि. 25 : नागपूर येथील दीक्षाभूमीवर 20 ऑक्टोबर रोजी साजरा होणारा धम्मचक्र प्रवर्तन दिन हा देशभरातील अनुयायांसाठी महत्त्वाचा सोहळा आहे. या सोहळ्यासाठी देशभरातून येणाऱ्या लाखो अनुयायांना आवश्यक सोयी-सुविधा वेळेत आणि सुलभतेने उपलब्ध करून देण्यासाठी सर्व शासकीय विभागांनी परस्पर समन्वयाने सूक्ष्म नियोजन करावे, असे निर्देश सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. हर्षदीप कांबळे यांनी दिले.

विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार अनुयायांच्या सोयी-सुविधांवर विशेष लक्ष केंद्रित करून महोत्सवाचे नियोजन करावे, असे डॉ. कांबळे यांनी सांगितले.
अनुयायांच्या सुरक्षिततेसाठी पोलीस बंदोबस्त, महिला सुरक्षा पथक, अग्निशमन दल आणि नियंत्रण कक्ष कार्यरत ठेवण्यात येणार आहे. तसेच अनुयायांना आवश्यक माहिती मिळावी यासाठी हेल्पलाइन क्रमांक, दिशादर्शक नकाशे आणि उद्घोषणा प्रणालीची व्यवस्था करण्यात येणार आहे. सर्व विभागांनी समन्वयाने काम करून धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा सोहळा सुरळीतपणे पार पाडावा, असे निर्देश यावेळी देण्यात आले.
