दत्ता मेघे इन्स्टिट्यूटचे नाव बदलणार; ‘अदाणी इन्स्टिट्यूट ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्च’ला UGCची मंजुरी
नागपूर, WH NEWS : दत्ता मेघे इन्स्टिट्यूट ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्च (DMIHER) या अभिमत विद्यापीठाचे नाव बदलून ‘अदाणी इन्स्टिट्यूट ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्च’ करण्यास विद्यापीठ अनुदान आयोगाने (UGC) मंजुरी दिली आहे. या निर्णयामुळे संस्थेच्या नव्या पर्वाला सुरुवात झाली आहे.
1990 मध्ये स्वर्गीय दत्ताजी मेघे यांनी सावंगी (मेघे), वर्धा येथे जवाहरलाल नेहरू मेडिकल कॉलेजच्या माध्यमातून संस्थेची सुरुवात केली. वैद्यकीय महाविद्यालयापासून सुरू झालेल्या या संस्थेचा पुढे वैद्यकीय, दंतचिकित्सा, नर्सिंग, आयुर्वेद, फिजिओथेरपी, फार्मसी, अभियांत्रिकी आणि व्यवस्थापन अशा विविध क्षेत्रांमध्ये विस्तार झाला.
संस्थेचे व्हाईस चान्सलर डॉ. ललितभूषण वाघमारे यांनी सांगितले की, नव्या नावाने पुढे जात असताना संस्थेची शैक्षणिक गुणवत्ता, संशोधन, नवकल्पना आणि सामाजिक बांधिलकी कायम ठेवली जाईल. ग्रामीण तसेच आरोग्यसेवेपासून वंचित समुदायांसाठी दर्जेदार शिक्षण व आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यावर भर राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
या नव्या बदलामागे DMIHER आणि अदाणी फाउंडेशन यांच्यात जून 2025 मध्ये झालेल्या सहकार्याची पार्श्वभूमी आहे. या भागीदारीतून परवडणारे आरोग्य शिक्षण आणि आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यासाठी जागतिक दर्जाचे ‘सेंटर ऑफ एक्सलन्स’ विकसित करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
संस्थेच्या चॅन्सलर डॉ. प्रीती अदाणी यांच्या नेतृत्वाखाली हा नवा टप्पा पुढे नेला जाणार आहे. दरम्यान, विद्यापीठातील अभ्यासक्रम, शिक्षकवर्ग, कॅम्पस आणि प्रशासनाचे कामकाज पूर्वीप्रमाणेच सुरू राहणार असल्याचे संस्थेकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
दत्ताजी मेघे यांचे 22 मार्च 2026 रोजी वयाच्या 89व्या वर्षी निधन झाले. शिक्षण आणि आरोग्यसेवा क्षेत्रातील त्यांच्या योगदानाच्या पायावर संस्थेचा पुढील विस्तार करण्यात येणार असल्याचेही सांगण्यात आले.
