गुरुकुंज मोझरीत दुष्काळी शासन निर्णयाची होळी
-संतप्त शेतकऱ्यांचा सरकारविरोधात एल्गार
-शेतकऱ्यांच्या सर्व पिकांना हेक्टरी १ लाख रुपयांची तातडीने मदतीची मागणी
गुरुकुंज मोझरी WH NEWS : राज्य सरकारने जाहीर केलेल्या दुष्काळी सवलतीच्या शासन निर्णयावर संतप्त शेतकऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत गुरुकुंज मोझरी येथील बसस्थानकासमोर शासन निर्णयाची होळी केली. वाळलेल्या सोयाबीनसह शासन निर्णय जाळत शेतकऱ्यांनी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
कोरड्या दुष्काळामुळे खरीप हंगामातील सोयाबीनसह विविध पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अशा परिस्थितीत सरकारने केलेली दुष्काळी घोषणा शेतकऱ्यांच्या प्रत्यक्ष नुकसानीच्या तुलनेत अपुरी असल्याचा आरोप आंदोलकांनी केला. ‘सर्व पिक उत्पादक शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी एक लाख रुपये मदत द्या’, अशी प्रमुख मागणी यावेळी सामाजिक कार्यकर्ते प्रशांत कांबळे यांनी केली आहे.
शेतकऱ्यांनी वाळलेल्या सोयाबीनसह शासन निर्णयाची होळी करत सरकारच्या दुष्काळी धोरणाचा निषेध केला. ‘शेतकरी विरोधी सरकारचा निषेध असो’, ‘शेतकऱ्यांना सरसकट मदत द्या’ अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला.
दुष्काळी सवलतीचा शासन निर्णय हा शेतकऱ्यांच्या प्रत्यक्ष संकटावर ठोस उपाय नसून ‘मेलेल्या शेतकऱ्याला व्हेंटिलेशन लावण्याचा प्रकार’ असल्याचा संतप्त आरोप आंदोलकांनी केला. कागदावरील घोषणा आणि प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या पदरात दमडीही मदत मिळत नसल्याचे त्यांनी सांगितले.
पिके हातची गेली, उत्पादन खर्चही निघण्याची शक्यता नाही, अशा परिस्थितीत केवळ सवलती जाहीर करून प्रश्न सुटणार नाही. शासनाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात तातडीने भरीव मदत जमा करावी आणि सरसकट हेक्टरी एक लाख रुपयांची मदत जाहीर करावी, अशी मागणी यावेळी सामाजिक कार्यकर्ते प्रशांत कांबळे यांच्यासह शेतकऱ्यांनी केली आहे. यावेळी राजिक शेख, विवेक ठाकरे, मनोज दिगांबरे, संदीप हगवणे, सतीश मुंद्रे, अनिल मेश्राम, रमेश हिवराळे, सलीम शेख, सुनील देहणकर, उमेश गणेश, संजय खेरडे यांच्यासह अनेक शेतकऱ्यांची उपस्थिती होती.
