बेंडोजी महाराजांच्या संजीवन समाधीच्या दर्शनासाठी लोटला भक्तांचा महासागर बेंडोजी महाराजांच्या जयघोषाने दूमदूमली घुईखेड नगरी महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यातून १५२ दिंड्या दाखल

बेंडोजी महाराजांच्या संजीवन समाधीच्या दर्शनासाठी लोटला भक्तांचा महासागर

बेंडोजी महाराजांच्या जयघोषाने दूमदूमली घुईखेड नगरी

महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यातून १५२ दिंड्या दाखल

चांदूर रेल्वे – (राजेश सराफी )

महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यातून आलेल्या असंख्य भाविकांनी बुधवारी (ता. ५) १३ व्या शतकातील श्री संत बेंडोजी महाराज यांच्या संजीवन समाधीचे दर्शन घेतले. बुधवारी मोठ्या उत्साहात काल्याचे किर्तन व भव्यदिव्य दहिहांडी महोत्सव झाला. यामध्ये भाविक मोठ्या उत्साहात सामिल झाले होते. श्री संत बेंडोजी महाराजाच्या ऐतिहासीक पालखी सोहळयात संपूर्ण महाराष्ट्रातील १५२ दिंड्या सामील झाल्या. लेझीम, बँड, भजने व हरिनामाच्या गजराने संपूर्ण घुईखेड नगरी भक्तीमय झाली होती. सहभागी झालेल्या दिंड्यांतून ईश्वरचिठ्ठीने काढलेल्या सायंकाळच्या महाआरतीचा मान रूख्मिनी महिला भजन मंडळ, वाई यांना मिळाला. त्यांचा साळीचोळीने सत्कार करण्यात आला.

चांदूर रेल्वे तालुक्यातील घुईखेड येथील श्री संत बेंडोजी महाराजाच्या संजीवन समाधी महोत्सवाला ३० जानेवारीपासून प्रारंभ झाला. संगीतमय देवी भागवत कथा प्रवक्ता ह.भ.प. संगिताताई करंजीकर ह्या होत्या. ४ फेब्रुवारीपर्यंत देवी भागवत कथा दररोज सकाळी ९ ते १२ व दुपारी ३ ते ६ वाजतापर्यंत झाली. ५ फेब्रुवारी बुधवारी दुपारी १२ ते २ च्या दरम्यान ह.भ.प. उमेश महाराज जाधव (आळंदीकर) यांचे काल्याचे किर्तन होऊन ह.भ.प. गणेश महाराज व रुपमसिंग सूर्यवंशी यांच्या हस्ते कालावाटप करण्यात आले. श्री संत बेंडोजी महाराजांची भव्य सामुहिक आरतीने बुधवारी कार्यक्रमांची सुरूवात झाली. दुपारी २ वाजता बेंडोजी महाराजांच्या भव्य दिव्य पालखी सोहळ्याला सुरूवात झाली. यामध्ये घुईखेड येथील बेंडोजी बाबा विद्यालयाच्या दिंडीसह महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यातील आलेल्या महिला व पुरूषांच्या १५२ दिंड्या सहभागी झाल्या होत्या. लेझीम, बँड, भजन व हरिनामाच्या जयघोषात ऐतिहासीक पालखी व दिंड्या संस्थानच्या शेतामध्ये पोहचल्या. परंपरेनूसार शंभर वर्षांहून अधिकच्या चिंचीच्या झाडाजवळ दहिहांडीचा कार्यक्रम सायंकाळी ५ वाजता मोठ्या उत्साहात पार पडला. तर सायंकाळी ७ वाजता महाप्रसादाचा लाभ हजारो भक्तांनी घेतला.

तळेगाव दशासरचे ठाणेदार रामेश्वर धोंडगे यांच्या नेतृत्वात पोलिसांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता. यानंतर यात्रा महोत्सवाला सुरूवात झाली आहे. यात्रेत खेळणीचे दुकान व लोकपयोगी विविध साहित्यांची दुकाने सजली होती. यात्रेकरू संसारपयोगी साहित्य खरेदी करतांना दिसले. तर ९ फेब्रुवारीला होमहवन, कळस स्थापना व गोत आंबिल महाप्रसादाचे आयोजन सुध्दा करण्यात आले आहे. या सर्व कार्यक्रमाच्या आयोजनाकरिता संस्थानचे अध्यक्ष वसंतराव घुईखेडकर, विश्वस्त प्रविण घुईखेडकर व इतर विश्वस्त, समस्त गावकरी, भाविक भक्त परिश्रम घेत आहे.

आजपासून शंकरपटाचा थरार

श्री बेंडोजी बाबा संस्थान व गावकरी मंडळी घुईखेड यांच्या संयुक्त विद्यमाने जंगी शंकरपटाचे आज ६ व ७ फेब्रुवारी रोजी घुईखेड गावातील बेंडोजी बाबा एम.सी.व्ही.सी. महाविद्यालयाच्या मागील मैदानावर आयोजन करण्यात आले आहे. या शंकरपटाला विशेष उपस्थिती म्हणून श्री. बेंडोजी बाबा संस्थानचे विश्वस्त प्रविण घुईखेडकर, मिलिंद घुईखेडकर, अरविंद चनेकार, अ.भा. ग्रामिण पत्रकार संघाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष युसुफ खान, अनिल गायकवाड व इतरांची उपस्थिती राहणार आहे. तरी या भव्य शंकरपटाचा नागरिकांनी आस्वाद घ्यावा असे आवाहन श्री संत बेंडोजी बाबा संस्थान व गावकरी मंडळी, घुईखेड यांच्या वतीने करण्यात आले आहे. या शंकरपटात दोन गटांत एकुण दोन लाख रुपयांच्या जवळपास बक्षिसे ठेवण्यात आली आहे.

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

More posts