नवेगावबांध येथील ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टरांचा निष्काळजीपणाचा फटका..! -डॉक्टरांकडून चुकीच्या पद्धतीने टाके लावण्यात आल्यामुळे इन्फेक्शन होऊन महिलेची प्रकृती चिंताजनक!

नवेगावबांध येथील ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टरांचा निष्काळजीपणाचा फटका..!

-डॉक्टरांकडून चुकीच्या पद्धतीने टाके लावण्यात आल्यामुळे इन्फेक्शन होऊन महिलेची प्रकृती चिंताजनक!

गोंदिया : अर्जुनी मोरगाव तालुक्यात शासकीय आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले असून रुग्णांना आपला जीव गमावण्याची वेळ यंत्रणेतील हलगर्जीपणामुळे येऊ लागली आहे. अशात नवेगावबांध येथील ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टरांचा निष्काळजीपणाचा फटका स्तनदा मातेला बसला असून प्रसूती दरम्यान केलेल्या उपचारात डॉक्टरांकडून चुकीच्या पद्धतीने टाके लावण्यात आल्यामुळे इन्फेक्शन होऊन महिलेची प्रकृती चिंताजनक झाल्याने नागपूर येथील शासकीय महाविद्यालयात दाखल करण्याची वेळ आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार नवेगावबांध येथील रागिनी मसराम ही गरोदर माता पहिल्या प्रसूतीसाठी 6 डिसेंबर रोजी नवेगावबांध ग्रामीण रुग्णालयात आंतर रुग्ण सेवेसाठी दाखल झाली. दरम्यान, रात्री 8 वाजताच्या सुमारास तिने गोंडस बाळाला जन्म दिला. मात्र, प्रसूतीदरम्यान तिला टाके लावण्याची वेळ आली असता डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे चुकीच्या पध्दतीने टाके लावण्यात आल्याने सदर स्तनदा मातेची प्रकृती बिघडली. त्यानंतर तिला गोंदिया येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात हलविण्यात आले. दरम्यान, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय गोंदिया येथे त्या महिलेवर उपचार होऊ शकत नाही, अशी असमर्थता दाखवून नागपूरला हलविण्यात आले.

गेल्या 20 दिवसापासून स्तनदा माता नागपूर येथील वैद्यकीय महाविद्यालयात उपचार घेत असून नागपूर येथील डॉक्टरांनी शरीरात इन्फेक्शन झाल्याने किडनी व मेंदूवर आघात झाल्याचे सांगितले. त्यामुळे त्या महिलेची प्रकृती चिंताजनक झाली असून डॉक्टरांचा निष्काळजीपणा स्तनदा मातेच्या जिवावर बेतला आहे. तर दुसरीकडे तिने जन्म दिलेल्या गोंडस बाळाचा सांभाळ गेल्या वीस दिवसापासून वृद्ध आजी करीत आहे. या प्रकारामुळे मसराम कुटुंब चांगल्याच अडचणीत आला आहे.

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

More posts