दलीत समाजाला जातीयवाचक शिवीगाळ करणार्‍यांवर कारवाई करा  : प्रज्वल बोरकर व समाज बांधवांची पत्रकार परिषदेतून मागणी

दलीत समाजाला जातीयवाचक शिवीगाळ करणार्‍यांवर कारवाई करा

 : प्रज्वल बोरकर व समाज बांधवांची पत्रकार परिषदेतून मागणी
गोंदिया : मोबाईल फोनवर दलित समाज बांधवांना अश्लील शिवीगाळ करणार्‍या व्यक्तीच्या विरोधात पोलिसात तक्रार दाखल करूनही पोलिसांकडून थातूरमातूर चौकशी करत प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. तेव्हा या प्रकरणाची सखोल चौकशी करून गुन्हेगारावर कारवाई करावी. अन्यथा दलित समाज बांधवांच्या वतीने भिम आर्मी, वंचित बहुजन आघाडी व शिवसेना उबाठाच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात येईल, अशी माहिती गोरेगाव तालुक्यातील कलपाथरी येथील प्रज्वल बोरकर, प्रतिक बोंबार्डे व समाज बांधवांनी (ता. 23) गोरेगाव येथील जैन रेस्टॉरंट येथे पत्रकार परिषदेतून दिली.

यावेळी पत्रकार परिषदेत शाम डोंगरे, प्रज्वल बोरकर, प्रतिक बोबांर्डे, शुभम डोंगरे, गौतम रामटेके, मयुर डोंगरे, विनोद बोरकर, चंद्रकुमार बोरकर, सिद्धार्थ रामटेके, आकाश बोरकर, अतुल डोंगरे,ओमदास मेश्राम आदी उपस्थित होते. यावेळी प्रज्वल बोरकर यांनी सांगितले की, कलपाथरी येथील दुर्योधन कोरे वय ३० वर्ष यांनी ता. २४ नोव्हेंबरला तुषार प्रधान यांच्या मोबाईल नंबरवर प्रज्वल बोरकर व दलित समाजाला जातीयवाचक शिवीगाळ केली. दरम्यान, त्यांनी मोबाईल रेकॉर्डींगच्या आधारे गोरेगाव पोलिसात तक्रार दाखल केली. मात्र, पोलीसांनी मोबाईल रेकॉर्डिंगची शहानिशा न करता अदखलपात्र प्रकरण दाखल करून न्यायालयात दाद मागण्याची समज दिली. यावर या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी व गुन्हेगारास अट्रासिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा याकरिता पोलीस अधीक्षक गोंदिया यांच्याकडे २ डिसेंबर रोजी तक्रार केली. तरी देखील पोलीसांनी मोबाईल रेकॉर्डिंगची चौकशी न करता गुन्हेगारास मोकाट सोडले. बोरकर यांनी दिलेल्या माहितीनुसार कलपाथरी येथे सर्व जातीय वर्गाचे नागरीक वास्तव्यास आहेत.

त्यात दलित समाजसुध्दा वास्तव्यास आहे. दुर्योधन कोरे हे ग्रामपंचायत सदस्य असून नेहमी दलित समाजाचा तिरस्कार करतात. त्यामुळेच ते नेहमी दलित समाजातील व्यक्तींना शिवीगाळ करीत असतात. दरम्यान, २४ नोव्हेंबर ला त्यांनी तुषार प्रधान यांच्या 9529770584 या मोबाईल क्रमांकावर 9309211525 या क्रमांकावरून फोन करून प्रज्वल बोरकर व दलित समाजाला जातीयवाचक शिवीगाळ केली. दरम्यान, त्याची फोन रेकॉर्डिंग तुषार प्रधान यांनी प्रज्वल बोरकर यांना दिली. यावर रेकॉर्डिंगचा आधार घेऊन प्रज्वल बोरकर यांनी 25 नोव्हेंबर रोजी गोरेगाव पोलिसात तक्रार दाखल केली पण पोलिसांनी अदखलपात्र प्रकरण दाखल करून प्रकरण थंडबस्त्यात टाकले. तेव्हा या प्रकरणाची चौकशी व्हावी व न्याय मिळावा यासाठी प्रज्वल बोरकर व काही समाज बांधवांनी पोलीस अधीक्षक गोंदिया यांच्याकडे तक्रार नोंदवली. मात्र, पोलीस अधीक्षक कार्यालयातर्फेही या तक्रारीची दखल घेण्यात आली नाही.

तेव्हा संबंधित व्यक्तीवर कारवाई करून न्याय द्या अशी मागणी प्रज्वल बोरकर यांच्यासह कलपाथरी येथील दलित समाज बांधवांनी केली आहे. तर या प्रकरणात भिम आर्मी, बहुजन वंचित आघाडी व शिवसेना (उबाठा) लाही निवेदन सादर करण्यात आले असून दोन दिवसात संबंधितावर कारवाई न झाल्यास या संघटनांच्या मार्गदर्शनात कलपाथरी येथील दलित समाज बांधव आंदोलन करणार असल्याची माहीती प्रज्वल बोरकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

More posts