मिलिंद कीर्ती यांना मुंबई साहित्य संघाचा पुरस्कार घोषित -‘कृत्रिम बुद्धिमत्तेचे मायाजाल युग : तंत्रज्ञानाची प्रबळ सत्ता’ या ग्रंथाची निवड

मिलिंद कीर्ती यांना मुंबई साहित्य संघाचा पुरस्कार घोषित

-‘कृत्रिम बुद्धिमत्तेचे मायाजाल युग : तंत्रज्ञानाची प्रबळ सत्ता’ या ग्रंथाची निवड

नागपूर : पत्रकार व वैचारिक लेखक मिलिंद कीर्ती यांना मुंबई मराठी साहित्य संघातर्फे २०२२-२३चा पुरस्कार जाहीर झाला आहे. संघाच्या साहित्य पुरस्कार निवड समितीने मिलिंद कीर्ती यांनी लिहिलेल्या ‘कृत्रिम बुद्धिमत्तेचे मायाजाल युग (खंड पहिला) : तंत्रज्ञानाची प्रबळ सत्ता’ (२०२२) या ग्रंथाची रा. भि. जोशी वैचारिक साहित्य पुरस्कारासाठी निवड केली आहे. पुरस्काराचे वितरण २७ ऑक्टोबर रोजी मुंबई येथे होणार आहे.

मुंबई मराठी साहित्य संघाने यावर्षीच्या साहित्य पुरस्कारांची घोषणा केली आहे. त्यामध्ये श्रीमती निलिमा भावे पुरस्कृत रा. भि. जोशी वैचारिक साहित्य पुरस्कारासाठी संघाचे साहित्य शाखा कार्यवाह अशोक बेंडखळे, पद्माकर शिरवाडकर व प्रतिभा सराफ यांच्या निवड समितीने ‘कृत्रिम बुद्धिमत्तेचे मायाजाल युग : तंत्रज्ञानाची प्रबळ सत्ता’ या ग्रंथाची लोकशाही पद्धतीने निवड केली आहे. या पुरस्कार स्वरूपात १० हजार रुपये रोख आणि सन्मानपत्र दिले जाणार आहे. पुरस्काराचे वितरण संस्थेच्या वर्धापनदिनी दुबई येथील ‘अल अदिल’ ग्रुपचे अध्यक्ष व सुप्रसिद्ध उद्योगपती धनंजय दातार यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी केले जाणार आहे.

याशिवाय मुंबई साहित्य संघाचा चंद्रागिरी पुरस्कार अनुराधा कुळकर्णी, नाट्य पुरस्कार प्रतिभा रत्नाकर मतकरी, चित्रकला पुरस्कार विजयराज बोधनकर व उद्योजकता पुरस्कार धनंजय दातार यांना जाहीर झाला आहे.
पत्रकार मिलिंद कीर्ती यांनी ‘कृत्रिम बुद्धिमत्तेचे मायाजाल युग’ हा ग्रंथ दोन खंडात लिहिला आहे. त्या ग्रंथाचा पहिला खंड ‘तंत्रज्ञानाची प्रबळ सत्ता’ यामध्ये माहिती तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता, माहिती व संप्रेषण तंत्रज्ञान,रोबोटिक्स, इंटरनेट ऑफ थिंग्ज यासह कृत्रिम जन्म ते कृत्रिम इच्छा मरणापर्यंत विकसित झालेल्या विविध तंत्रज्ञानाचा मानवी जीवनाला होणार्‍या लाभाचे व आर्थिक विकासाचे सविस्तर विवेचन करण्यात आले आहे.

या ग्रंथाचा दुसरा खंड ‘सहमतीची हुकूमशाही : अ‍ॅरिस्टोक्रसी टू टेक्नोक्रसी’ याचे प्रकाशन महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी यांच्या हस्ते नागपूर येथे नुकतेच करण्यात आले. आतापर्यंत मिलिंद कीर्ती यांचे ‘दहशतवाद : न्यूयॉर्क ते खैरलांजी’ (२००८, सुगावा प्रकाशन, पुणे), ‘नवयान : विषमताअंताचा लढा’ (२०१२, लोकवाङमय गृह प्रकाशन, मुंबई), ‘मोहरा महाराष्ट्राचा’ (२०२२, संपादित, ग्रंथाली प्रकाशन, मुंबई) व ‘सहमतीची हुकूमशाही : अ‍ॅरिस्टोक्रसी टू टेक्नोक्रसी’ (२०२३, लोकवाङमय गृह प्रकाशन, मुंबई) आदी ग्रंथ प्रकाशित झाले आहेत.

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

More posts