चविष्ट पदार्थांसोबत आरोग्याची काळजी घेत साजरी करा दिवाळी
– स्वाती अवस्थी, सिनियर डायटीशियन, वोक्हार्ट हॉस्पिटल्स
नागपूर WH NEWS – दिवाळी हा दिव्यांचा, प्रेमाचा, कुटुंबीयांच्या भेटीगाठींचा आणि अर्थातच स्वादिष्ट पदार्थांचा सण आहे. घरगुती चकली, करंजी, लाडू आणि पारंपरिक मिठाई यांसारखे पदार्थ आपल्या दिवाळीच्या आनंदात गोडवा आणतात. मात्र, जेवणाच्या वेळा बदलणे, वारंवार काही ना काही खाणे, रात्री उशिरापर्यंत जागणे आणि गरजेपेक्षा जास्त खाणे यामुळे अनेकदा पोट फुगणे, थकवा आणि अस्वस्थता जाणवू शकते.
यंदाची दिवाळी केवळ ताटातील गोड पदार्थांसोबतच चांगल्या आरोग्याचा आनंद देणारी ठरू द्या. कारण सणाचा खरा आनंद तेव्हाच मिळतो, जेव्हा आपण उत्साही, आनंदी आणि निरोगी असतो.

खाण्याच्या सवयींबाबत जागरूक राहून सण साजरा करा
सणासुदीच्या काळात अनेकजण नंतर गोड पदार्थ खाता यावेत म्हणून जेवण टाळतात. ही एक सामान्य चूक आहे. यामुळे खूप भूक लागते आणि नंतर गरजेपेक्षा जास्त खाल्ले जाते. त्यामुळे जेवणाच्या नियमित वेळा पाळा आणि संतुलित आहार घ्या. आपल्या आवडीचे सणासुदीचे पदार्थही योग्य प्रमाणात खाण्याचा आनंद घ्या.
उपलब्ध असलेले प्रत्येक पदार्थ चाखण्याऐवजी तुम्हाला खरोखर आवडणारे गोड पदार्थ निवडा. हळूहळू खा, प्रत्येक घासाचा आनंद घ्या. खाण्यावर अनावश्यक बंधने घालण्यापेक्षा विचारपूर्वक आणि योग्य प्रमाणात खाणे अधिक फायदेशीर ठरते.
सणासुदीच्या ताटात पौष्टिक पदार्थांचाही समावेश करा
सणासुदीचे जेवण चविष्ट असण्यासोबतच पौष्टिकही असू शकते. पारंपरिक पदार्थांसोबत भाज्या, डाळ, दही आणि प्रथिने असलेल्या इतर पदार्थांचा समावेश करा. यामुळे तुमचे जेवण अधिक संतुलित होईल.
तुमच्या आवडीच्या फराळासोबत भाजलेले मखाणे, ढोकळा, चणा चाट आणि घरगुती भाज्यांच्या टिक्की यांसारखे पर्यायही ठेवू शकता. यामुळे पारंपरिक चवीचा आनंद कायम ठेवत सणासुदीच्या खाण्यात वेगळेपण आणि पौष्टिकतेची भर पडेल.
वोक्हार्ट हॉस्पिटल्स, नागपूर येथे दैनंदिन जीवनात आरोग्यदायी सवयींना प्रोत्साहन देणे हा दीर्घकाळ चांगले आरोग्य राखण्याच्या प्रयत्नांचा महत्त्वाचा भाग आहे. खाण्याच्या सवयींमध्ये केलेले छोटे आणि सहज बदल कुटुंबांना सणाचा आनंद घेताना नियमित आणि संतुलित आहार राखण्यास मदत करू शकतात.
निरोगी दिवाळीसाठी सात महत्त्वाच्या टिप्स
1. रिकाम्या पोटी पार्टीला जाऊ नका. पार्टीला जाण्यापूर्वी संतुलित जेवण किंवा हलका नाश्ता करा. यामुळे खूप भूक लागणार नाही आणि गरजेपेक्षा जास्त खाणे टाळता येईल.
2. आवडीच्या पदार्थांना आधी पसंती द्या. तुम्हाला खरोखर आवडणारे गोड पदार्थ आणि फराळ निवडा. हळूहळू खा आणि प्रत्येक घासाचा आनंद घ्या.
3. खाण्याच्या पदार्थांमध्ये योग्य पर्याय निवडा. सणासुदीच्या मेन्यूमध्ये भाजलेले मखाणे, ढोकळा, चणा चाट किंवा भाज्यांपासून बनवलेल्या पदार्थांचा समावेश करा. यामुळे खाण्यात विविधता येईल.
4. जेवणाऐवजी गोड पदार्थ खाऊ नका. नियमित आणि संतुलित जेवण घेतल्यामुळे खूप भूक लागत नाही आणि दिवसभरात वारंवार काहीतरी खाण्याची गरजही कमी होते.
5. पाणी नियमित प्या. दिवसभर पुरेसे पाणी प्या आणि साखर असलेली पेये कमी प्रमाणात घ्या.
6. शारीरिक हालचाल सुरू ठेवा. जेवणानंतर थोडे चालणे, कुटुंबासोबत नाचणे किंवा घरातील दिवाळीच्या तयारीत सक्रिय सहभाग घेणे यामुळे शरीराची हालचाल कायम राहते.
7. जास्त खाल्ले आहे म्हणून मनात खंत बाळगू नका.. एखाद्या वेळी ठरवलेल्या प्रमाणापेक्षा जास्त खाल्ले गेले, तरी दुसऱ्या दिवशी जेवण टाळू नका. त्याऐवजी पुन्हा आपल्या नेहमीच्या संतुलित आहाराच्या सवयी सुरू करा.
आरोग्याच्या समस्या असल्यास विशेष काळजी घ्या
मधुमेह, हृदयविकार, उच्च रक्तदाब किंवा किडनीच्या समस्या असलेल्या व्यक्तींनी त्यांच्या आहाराकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. त्यांच्या आरोग्याच्या स्थितीनुसार जेवणाचे प्रमाण, साखरेचे सेवन, मिठाचे प्रमाण, पाण्याचे प्रमाण आणि खाण्याचे पदार्थ यामध्ये बदल करावे लागू शकतात. यासाठी डॉक्टर किंवा आहारतज्ज्ञांचा सल्ला घेणे महत्त्वाचे आहे.
आधीच योग्य नियोजन करून आणि आपल्या आरोग्याला अनुकूल असलेले पदार्थ निवडून अशा व्यक्तीही आरोग्याकडे दुर्लक्ष न करता सणाचा आनंद घेऊ शकतात. आहाराबाबत काही शंका असल्यास योग्य मार्गदर्शनासाठी डॉक्टर किंवा आहारतज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
कुटुंबात आरोग्यदायी सवयी निर्माण करा
दिवाळी हा कुटुंबात चांगल्या आरोग्याच्या सवयी निर्माण करण्यासाठीही एक उत्तम काळ आहे. मुलांना रंगीबेरंगी नाश्त्याचे ताट तयार करणे, घरगुती पदार्थ बनवणे आणि फळांपासून वेगवेगळे पदार्थ तयार करणे यामध्ये सहभागी करून घ्या. पारंपरिक पदार्थ योग्य प्रमाणात खाण्यास आणि पौष्टिक जेवणासोबत शारीरिक हालचालींनाही महत्त्व देण्यास कुटुंबातील प्रत्येकाला प्रोत्साहन द्या.
निरोगी खाणे म्हणजे आपल्या आवडत्या पदार्थांचा त्याग करणे नव्हे. तर विचारपूर्वक योग्य पदार्थ निवडणे आणि सण संपल्यानंतरही चांगल्या आहाराच्या सवयी कायम ठेवणे होय.
या दिवाळीत माझा संदेश अगदी सोपा आहे. सणाचा आनंद आणि चांगले आरोग्य यापैकी एकाची निवड करण्याची गरज नाही. आपल्या आवडीचे पारंपरिक पदार्थ खा, विचारपूर्वक आहार घ्या, सक्रिय राहा आणि पौष्टिक पदार्थांनाही आपल्या जेवणात स्थान द्या.
चला, आपल्या घरात दिव्यांचा प्रकाश पसरवूया, मनात आनंद भरूया आणि आपल्या आयुष्यात निरोगी आरोग्याचा कायमस्वरूपी प्रकाश आणूया.
