आंबेडकरी विचारांचा बुलंद आवाज हरपला! ज्येष्ठ पत्रकार मिलिंद कीर्ती यांचे अपघाती निधन; पत्रकारिता क्षेत्रावर शोककळा!

Follow Us on :

आंबेडकरी विचारांचा बुलंद आवाज हरपला! ज्येष्ठ पत्रकार मिलिंद कीर्ती यांचे अपघाती निधन; पत्रकारिता क्षेत्रावर शोककळा!
नागपूर WH NEWS (विजय खवसे) : आंबेडकरी विचारांचे निष्ठावंत पाईक, ज्येष्ठ पत्रकार, साहित्यिक आणि परिवर्तनवादी विचारांचे निर्भीड भाष्यकार मिलिंद कीर्ती यांच्या अपघाती निधनाच्या धक्कादायक बातमीने संपूर्ण पत्रकारिता क्षेत्राला मोठा धक्का बसला आहे. आपल्या लेखणीतून अन्यायाविरुद्ध आवाज उठवणारा, सामाजिक प्रश्नांना वाचा फोडणारा आणि आंबेडकरी विचारांची मशाल तेवत ठेवणारा एक लढवय्या पत्रकार काळाच्या पडद्याआड गेला आहे. त्यांच्या निधनाने आंबेडकरी चळवळीसह साहित्य आणि पत्रकारिता क्षेत्राची कधीही भरून न निघणारी हानी झाली आहे.

काम संपवून घरी निघाले, पण नियतीने घात केला!
मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री सुमारे ११.३० वाजण्याच्या सुमारास मिलिंद कीर्ती हे ‘लोकशाही वार्ता’ येथील आपले काम आटोपून वाडी येथील घरी जाण्यासाठी दुचाकीने निघाले होते. मात्र, शहरात पोहोचत असताना एका उड्डाणपुलावर त्यांच्या दुचाकीला दुसऱ्या दुचाकीची धडक बसली. या अपघातात दोन्ही दुचाकी खाली पडल्या आणि मिलिंद कीर्ती यांना गंभीर दुखापत झाली.
अपघातानंतर घटनास्थळी उपस्थित असलेल्या काही नागरिकांनी त्यांच्या बॅगेतील वाहन परवान्यावरून त्यांची ओळख पटवली. त्यानंतर तातडीने त्यांच्या मुलीला फोन करून अपघाताची माहिती देण्यात आली. घटनेची माहिती मिळताच कुटुंबीयांनी घटनास्थळी धाव घेतली आणि त्यांना वाडी येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, तेथे उपचार होऊ न शकल्याने त्यांना पुढील उपचारांसाठी नागपूर येथे हलविण्यात आले.

डॉक्टरांनी त्यांना वाचविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. मात्र, मृत्यूशी सुरू असलेली त्यांची झुंज अखेर अपयशी ठरली. बुधवारी सकाळी त्यांच्या निधनाची दुर्दैवी बातमी समोर आली. त्यांच्या पार्थिवावर शवविच्छेदनासाठी नागपूर येथील मेडिकल रुग्णालयात प्रक्रिया सुरू असल्याची माहिती त्यांच्या मुलीने WH NEWS ला दिली.

लेखणीच्या बळावर अन्यायाविरुद्ध लढणारा आवाज शांत!
मिलिंद कीर्ती हे केवळ पत्रकार नव्हते, तर आंबेडकरी विचारधारेचे अभ्यासक, संवेदनशील साहित्यिक आणि सामाजिक भान जपणारे विचारवंत होते. भारतीय संविधान, सामाजिक न्याय, समता, स्वाभिमान आणि वंचितांच्या प्रश्नांशी त्यांची लेखणी सातत्याने जोडलेली होती.
पत्रकारितेच्या प्रवासात त्यांनी ‘लोकमत’ आणि ‘देशोन्नती’ यांसारख्या वृत्तपत्रांमध्ये काम केले. WH NEWS ला पडघम नावाने त्यांचे सदर चालायचे.सध्या ते ‘लोकशाही वार्ता’मध्ये कार्यरत होते. आपल्या अभ्यासपूर्ण लेखनातून आणि निर्भीड मांडणीतून त्यांनी अनेक सामाजिक प्रश्नांना प्रकाशझोतात आणले. त्यांच्या लिखाणाची दखल शासन आणि प्रशासन स्तरावरही घेतली जात होती.

पत्रकारिता हे केवळ बातम्या देण्याचे माध्यम नसून समाजातील अन्याय, विषमता आणि शोषणाविरुद्ध लढण्याचे प्रभावी शस्त्र आहे, याची जाणीव त्यांच्या कार्यातून होत होती. त्यांची पुस्तकेही प्रकाशित झाली होती. साहित्य आणि पत्रकारितेच्या माध्यमातून त्यांनी वैचारिक योगदान दिले.
आज त्यांच्या निधनाने केवळ एक पत्रकार हरपलेला नाही, तर समाजातील वंचित, पीडित आणि शोषितांच्या प्रश्नांवर निर्भीडपणे भाष्य करणारा एक महत्त्वाचा आवाज कायमचा शांत झाला आहे.

धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या उत्साहावर दुःखाचे सावट!
नागपूर शहरात धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या सोहळ्याची तयारी आणि उत्साह सुरू असतानाच आंबेडकरी विचारांचे खंदे समर्थक असलेल्या मिलिंद कीर्ती यांच्या निधनाची बातमी समोर आली. त्यामुळे आंबेडकरी चळवळ, पत्रकारिता आणि साहित्य क्षेत्रात शोककळा पसरली आहे.
ज्या विचारधारेने त्यांना सामाजिक परिवर्तनाची प्रेरणा दिली, त्याच विचारधारेचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी त्यांनी आपल्या लेखणीचा उपयोग केला. त्यांचे अचानक निघून जाणे ही त्यांच्या कुटुंबीयांसाठी असह्य वेदना आहेच; पण त्यांच्या सहकाऱ्यांसाठी, मित्रपरिवारासाठी आणि त्यांचे लिखाण वाचणाऱ्या असंख्य वाचकांसाठीही हा मोठा आघात आहे.
काही माणसे आपल्या पदामुळे मोठी होत नाहीत, तर आपल्या विचारांमुळे, कार्यामुळे आणि समाजाप्रती असलेल्या बांधिलकीमुळे कायम स्मरणात राहतात. मिलिंद कीर्ती हे त्यापैकीच एक होते. त्यांचे विचार, त्यांची लेखणी आणि त्यांनी केलेले कार्य पुढील पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरेल.

अंत्यविधी मानेवाडा येथे
मिलिंद कीर्ती यांच्या पार्थिवावर अंत्यविधी त्यांच्या बंधूंच्या निवासस्थानी, जुने ज्ञानेश्वर नगर, प्लॉट क्रमांक १०३, रोड क्रमांक ६, श्रीमानजिवी नगरजवळ, मानेवाडा, नागपूर येथून होणार असल्याची माहिती आहे.
त्यांच्या अंत्यविधीच्या वेळेबाबत कुटुंबीयांकडून अधिकृत माहिती मिळाल्यानंतर ती जाहीर करण्यात येईल.

WH NEWS तर्फे भावपूर्ण आदरांजली!
ज्येष्ठ पत्रकार मिलिंद कीर्ती यांच्या निधनाने आंबेडकरी विचारविश्वातील एक महत्त्वाचा तारा निखळला आहे. त्यांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी सहजासहजी भरून निघणारी नाही.
मिलिंद कीर्ती सर, तुमची लेखणी थांबली असेल; पण तुमचे विचार कधीच थांबणार नाहीत. तुम्ही शब्दांच्या माध्यमातून पेटवलेली परिवर्तनाची मशाल सदैव तेवत राहील.
WH NEWS परिवारातर्फे ज्येष्ठ पत्रकार, आंबेडकरी विचारवंत आणि साहित्यिक मिलिंद कीर्ती यांना भावपूर्ण आदरांजली!

News By

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

यह भी पढ़िए