१.५२ लाखांच्या घनकचरा शेड प्रकरणाला अखेर चौकशीचा दणका! -जिल्हा परिषद प्रशासनाचे कडक निर्देश; प्रत्यक्ष पाहणीत मोठ्या तफावतीचा दावा, ग्रामस्थांचे कारवाईकडे लक्ष

Follow Us on :

१.५२ लाखांच्या घनकचरा शेड प्रकरणाला अखेर चौकशीचा दणका!
-जिल्हा परिषद प्रशासनाचे कडक निर्देश; प्रत्यक्ष पाहणीत मोठ्या तफावतीचा दावा, ग्रामस्थांचे कारवाईकडे लक्ष
गडचिरोली : (लोमेश कुळमेथे )दर्शनी माल येथील घनकचरा व्यवस्थापन शेडच्या कामात सुमारे १ लाख ५२ हजार ४२२ रुपयांच्या निधीच्या गैरव्यवहाराचा आरोप करण्यात आला असून, या प्रकरणाची अखेर वरिष्ठ स्तरावरून चौकशी सुरू करण्यात आली आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे यांनी प्रकरणाची गंभीरता लक्षात घेऊन १ सप्टेंबर २०२६ रोजी चौकशीचे निर्देश दिल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली.

ग्रामस्थांच्या तक्रारीनुसार, गट ग्रामपंचायत दर्शनी माल अंतर्गत घनकचरा व्यवस्थापन शेडसाठी मंजूर झालेल्या निधीतून प्रत्यक्षात अपूर्ण व निकृष्ट दर्जाचे काम झाले आहे. मात्र, काम पूर्ण झाल्याचे दाखवून मोजमाप पुस्तिकेत (MB) नोंदी करण्यात आल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. मंजूर रक्कम १,५२,४२२ रुपये असताना प्रत्यक्ष कामाची किंमत अंदाजे ३० ते ४० हजार रुपये असल्याचा दावा ग्रामस्थांनी केला आहे.
या प्रकरणी यापूर्वीही ग्रामस्थांनी तक्रार केली होती. त्यानंतर २५ फेब्रुवारी २०२६ रोजी प्रत्यक्ष चौकशी करण्यात आली होती. तक्रारदार, ग्रामस्थ आणि पोलीस पाटील यांच्या उपस्थितीत झालेल्या पाहणीत इस्टिमेटनुसार काम झाले नसल्याचे निदर्शनास आल्याचा दावा करण्यात आला. मात्र, या चौकशीचा अहवाल अद्याप प्राप्त झालेला नसल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

इस्टिमेटनुसार अनेक कामे अपूर्ण असल्याचा दावा
घनकचरा शेडच्या कामामध्ये कचरा वर्गीकरणासाठी ओला कचरा, सुका कचरा, प्लास्टिक, काच व धातू यासाठी आवश्यक व्यवस्था, कंपोस्ट खड्डा, A-A सेक्शन, बी.बी. दगडी बांधकाम, गेट व प्रवेशद्वार, चेनलिंक कुंपण, व्हेंटिलेशन, पाया व पाईप ट्रेंचसाठी आवश्यक उत्खनन आदी कामे पूर्ण नसल्याचे ग्रामस्थांनी तक्रारीत नमूद केले आहे.
तसेच दरवाजासाठी आवश्यक जागा, भाजलेल्या विटांचे बांधकाम, १२ सेंमी जाडीचे सिंगल कोट प्लास्टर, भिंती, दरवाजे आणि इतर मूलभूत सुविधा अपूर्ण असल्याचा आरोपही करण्यात आला आहे.
पुन्हा प्रत्यक्ष पाहणी; तफावत आढळल्याचा दावा
ग्रामस्थांनी प्रकरणाचा पाठपुरावा सुरूच ठेवत जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे पुन्हा तक्रार दाखल केली. त्यानंतर १ सप्टेंबर रोजी चौकशीचे निर्देश देण्यात आले.

त्यानुसार गटविकास अधिकारी, पंचायत समिती धानोरा, सहाय्यक अभियंता श्रेणी-२ एम. एस. कोडापे आणि विस्तार अधिकारी (पंचायत) श्री. देवारे यांनी ग्रामस्थांच्या उपस्थितीत सदर कामाची पाहणी केल्याचे सांगण्यात आले. प्रत्यक्ष पाहणीदरम्यान इस्टिमेटनुसार लेआउट नसल्याचे आणि कामामध्ये मोठ्या प्रमाणात तफावत असल्याचे अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आल्याचा दावा ग्रामस्थांनी केला आहे.
आता या चौकशीचा अधिकृत अहवाल काय येतो, याकडे संपूर्ण गावाचे लक्ष लागले आहे.
दोषींवर फौजदारी कारवाईची ग्रामस्थांची मागणी
शासकीय निधीचा गैरवापर झाल्याचे चौकशीत निष्पन्न झाल्यास संबंधित सरपंच, ग्रामसेवक तसेच मोजमाप व कामाशी संबंधित जबाबदार अधिकारी-कर्मचाऱ्यांवर नियमानुसार फौजदारी कारवाई करावी, तसेच झालेल्या आर्थिक नुकसानीची वसुली करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
४ जानेवारी २०१७ च्या शासन निर्णयानुसार दोषींवर योग्य ती कारवाई करण्यात यावी, अशीही मागणी करण्यात आली आहे. तसेच दोषींना वाचविण्याचा प्रयत्न करणाऱ्या संबंधितांवरही नियमानुसार शिस्तभंगाची कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
शासकीय निधीतील प्रत्येक रुपया जनतेच्या हितासाठीच खर्च झाला पाहिजे आणि दर्शनी माल येथे दर्जेदार व पूर्ण क्षमतेचे घनकचरा व्यवस्थापन शेड उभारण्यात यावे, अशी भूमिका ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.

यावेळी लोमेश कुळमेथे (जिल्हा सोशल मीडिया संयोजक, गडचिरोली), धोंडूजी उडान (पोलीस पाटील, दर्शनी माल), ग्रामसेवक ज्ञानेश्वर उईके, प्रशासक यशोदा बोबाटे, कवडूजी मशाखेत्री, सुधाकर वैरागडे, किसन उडान, जयदेव कोठारे, दिनेश बुरले, नागेश उडान, निलेश वासेकर, साईनाथ भोयर, बंडू उडान यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.
दरम्यान, या प्रकरणातील आरोपांची अधिकृत चौकशी पूर्ण होऊन अहवाल प्राप्त झाल्यानंतरच गैरव्यवहाराची वस्तुस्थिती आणि जबाबदारी स्पष्ट होणार आहे.

News By

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

यह भी पढ़िए