लकडगंज पोलिसांचा स्तुत्य उपक्रम; रक्तदान शिबिरातून १०० रक्तपिशव्या संकलित!
नागपूर WH NEWS : पोलीस ठाणे लकडगंजच्या पुढाकाराने नागरिक व सामाजिक संस्थांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या शिबिरातून तब्बल १०० रक्तपिशव्या संकलित करण्यात आल्या असून त्या डागा शासकीय रुग्णालय, नागपूर येथे रुग्णांच्या उपचारासाठी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

दिनांक ३० ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ११.३० वाजता या समाजोपयोगी उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. शिव अमृत फाउंडेशन, शहर व शहर मित्र परिवार, महादेव संस्थान, जुनी मंगळवारी, घास बाजार, रामपेठ लकडगंज परिसरातील नागरिक व सामाजिक कार्यकर्त्यांनी या उपक्रमात सक्रिय सहभाग घेतला.
या शिबिरात पोलीस ठाणे लकडगंजचे पोलीस उपनिरीक्षक सागर भंडारी, पोलीस हवालदार नरेंद्र गिरडे, प्रवीण डाबरे, संघदीप लाझेवार, गजानन गिरी, सुरज देशमुख, निखिलेश शेंडे, तसेच पोलीस शिपाई अनिल महतो, हेमंत उइके, तुकेश्वर चव्हाण, पवन पित्तलवार यांच्यासह बीट मार्शल सहभागी झाले. सामाजिक कार्यकर्ते मनोज भाऊ चापले, कृष्णाजी कांबळी, जीवन पराते, निलेश रामगुणीवार, राहुल महादुले, अक्षय कोदलीकर, रोशन दामले आणि पवन सोनेकर यांच्यासह नागरिकांनीही रक्तदान केले.
रक्तदान प्रक्रियेदरम्यान रक्तदात्यांची नोंदणी, वैद्यकीय तपासणी आणि आवश्यक आरोग्यविषयक सुरक्षितता प्रक्रिया पार पाडण्यात आली. पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी स्वतः रक्तदान करून नागरिकांसमोर सामाजिक बांधिलकीचे उदाहरण ठेवले.
संकलित करण्यात आलेल्या १०० रक्तपिशव्या डागा शासकीय रुग्णालयात उपलब्ध करून देण्यात आल्याने अपघातग्रस्त, गंभीर तसेच तातडीने रक्ताची गरज असलेल्या रुग्णांना त्याचा लाभ होणार आहे.
पोलीस आणि नागरिकांच्या संयुक्त सहभागातून राबविण्यात आलेल्या या उपक्रमामुळे सामाजिक सलोखा, जनसहभाग आणि रक्तदानाबाबत जनजागृती वाढण्यास मदत झाली. भविष्यातही अशा समाजोपयोगी उपक्रमांना प्रोत्साहन देण्याचा मानस असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुकुंद कवाडे यांनी सांगितले.
“रक्तदान हेच श्रेष्ठ दान” या भावनेतून राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे नागरिकांकडून कौतुक होत आहे.
