महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री माननिय देवेंदर्जी फडणवीस यांचे मुख्य सचिव श्रीमान श्रीकर परदेसी यांनी फडणवीस यांचा एक वेगळाच परिचय करून दिलेला वाचनीय (प्रदीर्घ) लेख
==========================
||•• नीतीवंत, पुण्यवंत, वरदवंत ••||
श्री. देवेंद्र फडणवीस
मुंबई – मुख्यमंत्री म्हणून शपथविधी झाल्यानंतरची गेली अडीच वर्षे मी त्यांचा प्रधान सचिव म्हणून काम पाहात आहे. परंतु त्यांच्याशी असलेला प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष ऋणानुबंध मात्र अडीच वर्षांहून किती तरी जुना, म्हणजे जवळपास पंचवीस वर्षांचा आहे ..!!
मसुरीच्या प्रशिक्षणात प्रत्येक प्रशिक्षणार्थीला एक ज्येष्ठ आय.ए.एस.अधिकारी काउन्सेलर म्हणून देण्यात येतात. ते सगळी यथासांग चर्चा करुन प्रशिक्षणार्थीच्या करियरची पुढील दिशा ठरवतात ..!!
“मी सोलापूरचा आहे ..!! आय.आय.टी.तून केमिकल इंजिनियर झालो, प्रशासकीय सेवेच्या माध्यमातून हातून काहीतरी चांगलं काम घडावं अशी माझी मनीषा आहे ..!!
उच्च शिक्षणासाठी अनेक उत्तम अमेरिकी विद्यापीठातील शिष्यवृत्ती मला मिळाल्या होत्या ..!! त्या निमित्ताने मी बरेच भ्रमण करु शकलो असलो तरी, मी तुळजापूरच्या पूर्वेला मात्र कधीही गेलो नाही ..!!”
माझे हे वाक्य ऐकताच ते काउन्सेलर म्हणाले ..
“उत्तम, मग तुला चंद्रपूरला पाठवू .!!”
चंद्रपूरला पोचलो तर चंद्रपुरातच काय पण आख्ख्या विदर्भात (नंतर माझी पत्नी झालेल्या मनीषाचा अपवाद वगळता ..) माझा एकाही व्यक्तीशी परिचय नव्हता ..!! आय.ए.एस. प्रशिक्षणार्थीला वेळ भरपूर, निश्चित असं काम नाही, त्यामुळे भटकायची अमर्याद मुभा असते ..!! श्री. देवेंद्र फडणवीस (ज्यांना आम्ही सर्व अधिकारी वर्ग “सर” म्हणतोआणि बाकी तमाम दुनिया ‘भाऊ’ म्हणते ..!!
“हे काम कराच लागते हां, भौ ..!!”
असे पाच-सातशे तरी SMS त्यांच्या मोबाईलवर रोज दणादण आदळत असतात ..!!)
ह्यांच्या काकू शोभाताई तेव्हा आमदार होत्या. भा.ज.प. हा त्याकाळी फार हवा-हवासा फॅशनेबल पक्ष नव्हता. ह्या पक्षाचे मर्यादित लोक-प्रतिनिधी होते. सुमतीबाई सुकळीकर अनेक प्रयत्नांनंतरही शहरी नागपुरातून कधी निवडून येऊ शकल्या नव्हत्या. समितीच्या माध्यमातून मनीषाच्या आजीशी त्यांची खूपच सलगी होती आणि त्यांच्या निवडणुकीच्या रणनितीविषयी उत्साही चर्चा घडायच्या .. !! तगडी राजकीय मिरासदारी, वारसा नसलेल्या बाळबोध मध्यमवर्गीय घरातील गृहिणी आमदार म्हणून शोभातांईभोवती एक वलय होते. फटफटीवरुन किंवा 15-20 कार्यकर्ते कोंबलेल्या उघड्या कमांडर जीपमधून त्या चंद्रपूरच्या ४५ डिग्री उन्हात फिरत असत ..!!
मूल येथील त्यांचे घर, शेती पाहायचा योग तेव्हा आला. सरांचा, त्यांच्या कुटुंबाचा शेतीशी काही संबंध नाही असा जो बोभाटा सध्या सर्रास केला जातो तो ऐकून मला आश्चर्य वाटतं. तोपर्यंत, हुरडा खायला शेतावर जाण्याइतकाच शेतीशी संबंध असलेल्या मला, कास्तकारी, कास्तकारीचं अर्थशास्त्र, बारकावे समजून घ्यायची पहिली संधी तेव्हा मिळाली ..!! ही त्या ऋणानुबंधाची अप्रत्यक्षच सुरुवात ..!!
त्यानंतर अमरावती, वर्धा ह्या नागपूरच्या जवळपासच्या जिल्ह्यांत माझी नेमणूक झाली. सरांची राजकीय कारकीर्द आता कुठे सुरु झाली होती. वयाच्या विशीतच ते नागपूरचे महापौर झाले ..!! तेव्हा मी आणि मनीषा त्यांना भेटायला गेलो आणि म्हणालो ..
“वयाच्या विशीतच आपण महापौर झाला आहात ..!! वयाच्या चाळिशीत मुख्यमंत्री नक्की होणार ..!!”
तेव्हा त्यांनी किंचित स्मितहास्य केले. (ते मुख्यमंत्री झाल्यावर भेटायला गेलो आणि तशाच अर्थाचं काही म्हणालो तेव्हाही, त्यांनी पुन्हा तसेच स्मितहास्य केले ..!!) सरांचे ‘ट्रेडमार्क स्मित-हास्य’ हा त्यांच्या लोभस व्यक्तिमत्वाचा खास पैलू ..!!
‘मुद्दा पटला, मुद्दा पटला नाही, मुद्दा ठीक वाटतोय , पण पुढे त्याचं काय करायचं ..?? मुद्दा अगदीच किरकोळ आणि त्याज्य आहे पण तुमचा मान राखायचा म्हणून ऐकतोय ..!!’
असे असंख्य अर्थ त्या क्यूट स्मित हास्यातून निघू शकतात. “नृपस्य चित्तं, पुरुषस्य भाग्यम् ..!!” असा एक श्लोक आहे. म्हणजे राजाच्या मनात आणि पुरुषाच्या भाग्यात काय आहे हे ब्रह्मदेवालाही समजणार नाही. एका कॉलेजच्या स्नेह-संमेलनात असा विषय निघाला की, श्री. देवेंद्र फडणवीस मुलांना का आवडतात ? ते अत्यंत कर्तबगार आहेत, प्रामाणिक आहेत, अभ्यासू आहेत, प्रचंड हुशार आहेत अशी बरीच उत्तरे झाल्यावर एक मुलगी उत्स्फूर्तपणे म्हणाली “बिकॉज ही इज सो क्यूट !” सरांच्या चेह-यावरचे निरागस भाव हा त्यांच्या क्यूट स्मितहास्या इतकाच त्यांचा खास विशेष. माणसाला असंख्य सोंगं वठवता येतील, नाटकं करता येतील परंतु अखंड निरागसतेचं नाटक करणं अशक्य असतं. ज्याप्रमाणे मन चिंतामुक्त नसेल तर अगदी सर्वसुखांनी लगडलेल्या प्रासादातही माणसाला शांत झोप लागू शकत नाहीm त्याचप्रमाणे जर मन वैर-विद्वेष भावनेपासून पूर्ण मुक्त नसेल तर चेहरा निरागस राहू शकत नाही. सरांना ज्यांनी पूर्वायुष्यात मदत केली आहे, जे त्यांचे मित्र आहेत त्यांच्यासाठी सर नेहमीच धावून जातात हे तर ठीकच, स्वाभाविकच. पण जी लोकं अगोदरच्या काळात त्यांचेशी वाईट वागली आहेत, नाहक त्रास दिला आहे असाही कुणी जर अडचणीत असेल, त्याचे काही काम असेल तर सर लगेच ते करतील. इतक्या सरळ माणसाचा चेहरा नेहमी निरागस दिसणारच की ..!!
विदर्भात जिल्हाधिकारी म्हणून काम करत असलो तरी सरांच्या भेटी फार व्हायच्या नाहीत. पण माझी सासुरवाडी नागपूरला आणि सर राहतात त्याच धरमपेठ भागात ..!! शिवाय मनीषा आणि सर एकाच शाळेत, कॉलेजात होते. त्यामुळे समान मित्र,स्नेह्यांची रेलचेल होती. त्यांच्या बहरत चाललेल्या राजकीय घोडदौडीविषयी, त्यांचे वडील कै. गंगाधरराव फडणवीस ह्यांच्या अफाट लोक-संग्रहाविषयी, खूपदा चर्चा व्हायची. गंगाधरराव आणिबाणीत तुरुंगात होते तेव्हां देवेंद्रनी बाणेदारपणे सांगितलं की अशा स्थितीत मी ‘इंदिरा’ कॉन्व्हेंट हया नावाच्या शाळेत जाणार नाही. वयाच्या सहाव्या वर्षी किती मुलांना इतकी जाण, इतकं धैर्य, इतका निश्चय असतो ..??
देवेंद्र फडणवीस हा माणूस खूप पुढे जायला हवा, अशी कळकळीची भावना, जी राजकारण्यांबद्दल अपवादानेच आढळते, सगळ्यांच्याच मनात असे. स्थानिक नगरसेवक, नंतर आमदार तेच असल्याने, आजूबाजूच्या परिसरात झपाट्याने चांगला बदल होत होता. नुकतंच लग्न झालं तेव्हा नव्या जावयासकट घरातील सर्वांना अंगणातल्या नळातून बादल्यांतून पाणी भरावं लागे. सरांच्या प्रयत्नामुळे 24 X 7 पाणी येऊ लागलं.समोरचं मैदान त्यांनी नेटकं तयार केलं, त्यामुळे मनसोक्त क्रिकेट खेळता यायचं, असे व्यक्तीगत फायदे होत होते. वेस्ट हायकोर्ट रोडवरील इंडियन कॉफी हाऊस, रेड्डी मेस अशा खवय्येप्रिय गप्पा अड्ड्यांवर सरांचं दर्शन हमखास व्हायचं. सामोसा खाऊन तो कुठला आहे हे त्यांना बिनचूक ओळखता यायचं. नागपूरच्या अजित बेकरीचा ओव्हनकेकच नव्हे तर जगभरात कोणता खाद्यपदार्थ कुठे, कसा असतो ह्या विषयी अगाध ज्ञान त्यांना आहे आणि तरीही आईच्या हातचं खाणं ही अत्युच्च पसंद, मग ती साधी फोडणीची पोळी का असेना ! साहजिकच आई देखील खूप अभिमानाने नेहमीच आवर्जून सांगतात, “आधी प्रश्न विचारतो, कोणी बनवलंय महाराजने की तू ? आणि मी बनवलेलं असेल तरच खातो.” (आई हा विषय निघाला म्हणून एक भटकणं अपरिहार्य आणि क्षम्य आहे. एरवी फारसे धार्मिक आणि सश्रध्द न वाटणारे सर,शिवाजी हा विषय निघाला की, मात्र’ भक्त ‘ हया वर्गात जाऊन बसतात. शिवाजी,जिजाऊ, संभाजी बद्दल ते बोलायला लागले की, वेळ काळ मोजमापाची काही मर्यादा राहात नाही. ) “ जगण्यासाठी खावं, खाण्यासाठी जगू नये” अशी शिष्टसंमत उक्तीअसतांना, “मी मात्र खाण्यासाठी जगतो” असं सर बिनधास्त म्हणतात ..!! पण त्याचवेळी, सरांनी नुकतंच तीस किलो वजन घटवलं हे विशेष ..!!
एकदा का एखादी गोष्ट मनावर घेतली की ती करायचीच, हे त्यांच्या उत्तुंग यशामागचं महत्वाचं सूत्र आहे ..!!
सरांचे काका अण्णासाहेब फडणवीस हे अत्यंत सत्प्रवृत्त आणि कार्यक्षम असे प्रशासकीय अधिकारी होते. माझ्या सासरेबुवांचे ते काही वर्षे वरिष्ठ सहकारी असल्यानें, त्यांच्या कुटुंबाचाही उत्तम परिचय होता. ते बुलढाण्याला जिल्हाधिकारी असतांना, तेव्हाचे मुख्यमंत्री शंकरराव चव्हाणांनी त्यांना एकदा विचारलं ..
“का हो, कलेक्टरसाहेब, ते तुरुंगात फडणवीस आहेत ते तुमचे कोण ..??”
“तो माझा सख्खा बंधु ..”
-अण्णासाहेब ..!!
“ओह ..!! मग तुमचे संबंध आहेत कां त्यांचेशी अजून ..??”
-शंकरराव
“प्रश्नच नाही. पुर्वीप्रमाणेच उत्तम संबंध तर आहेतच, पण तितकेच नव्हे तर एका ध्येयापोटी ते हा तुरुंगवास भोगत आहेत ह्या गोष्टीचा अभिमान आहे ..!!”
-अण्णासाहेब ..
मुख्यमंत्र्यांना इतकं स्पष्टपणे बोलण्याची छाती खूप कमी अधिका-यांमध्ये असते. तो तर आणिबाणीचा कठीण काळ होता ..!! त्या काळात असं बोलण्याची हिंमत .. तेही कसलाच कटुपणा उद्भभवू न देता दाखवणं, हे विशेषच ..!!
श्री. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले तेव्हा आणि त्यानंतरच्या काळात, अनेकजण अधूनमधून चुकचुकायचे ..!! अजूनही चुकचुकतात की, श्री.देवेंद्र फडणवीस हे आहेत उत्तमच पण तरुण आहेत (म्हणजे ज्युनियर आहेत, असे वाचायचे ..!!) त्यांच्यापेक्षाही जेष्ठ, अनुभवी मंडळी आहेत की ..
असा तो सूर असतो ..!!
त्यावर मला असं वाटतं की, वर मी उल्लेख केलेल्या सर्व पूर्वसुरींची, त्यांनी घेतलेल्या परिश्रमांची, खालेल्ल्या खस्तांची पुण्याई श्री. देवेंद्र फडणवीस हयांच्यामागे भक्कमपणे उभी आहे ..!! त्यांची निस्सीम सेवेची, अनुभवाची, ज्येष्ठतेची पुण्य-शिदोरी सरांसोबत आहे ..!! आणि अशीही मौलिक शिदोरी बरोबर असायला माणूस सरांसारखा सुसंस्कृत, वडिलधा-या मंडळींचा मान राखणारा, त्यांच्या विषयी आदर असणारा असा आज्ञाधारक पुत्र, पुतण्या, भाचा असावा लागतो ..!! म्हणून लेखाच्या शीर्षकात ‘पुण्यवंत’ हा शब्द मी जाणीवपूर्वक वापरला आहे ..!!
त्याच काळात त्यांच्या पत्नी अमृताजी स्थानिक ॲक्सिस बँकेत होत्या. त्या स्कूटी घेऊन येत आणि बँकेची अमुक एखादी डिपॉझिट योजना घ्याच असं माझ्या सासूबाईंना पटवून देत ..!! मुरलेल्या LIC एजंटला शोभेल अशा चिकाटीने चाललेला तो संवाद शांतपणे ऐकताना मला मोठी गंमत वाटायची. एखाद्या व्यक्तीच्या सतत भेटीगाठी होत नसतानाही, असंख्य अदृश्य धाग्यांनी त्या व्यक्तीचा संबंध येत राहतो, हा अनुभव मला सरांच्या बाबतीत आला ..!! ह्यालाच मराठीत ‘ऋणानुबंध’ हा शब्द असावा. (समृध्द इंग्रजी भाषेत ‘ऋणानुबंध’ ला चपखल प्रति-शब्द मला सापडत नाही ..) वीस वर्षानंतर मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस ह्यांचा प्रधान सचिव म्हणून काम करण्याचे भाग्य माझ्या वाट्याला येईल हे त्या काळी माझ्या स्वप्नातही आलं नसतं ..!!
“Knowledge is Power” हे तंतोतंत खरं आहे तरी सध्याच्या गुगलच्या काळात, सगळंच ज्ञान प्रत्येकाला चुटकीसरशी उपलब्ध आहे म्हण्टल्यावर, प्रत्येकच जण पॉवरफुल होतो का ..?? ह्या प्रश्नाचं उत्तर मला सरांबरोबर काम करताना मिळालं ..!!
महाराष्ट्रातील काना-कोपऱ्यातली एखादी गोष्ट असो किंवा हवामानशास्त्र, अद्ययावत तंत्रज्ञान, संगीत, एखाद्या अधिकाऱ्याचे, मंत्र्याच्या खाजगी सचिवाचे कोणकोणते ‘उद्योग’चालू आहेत ..??, चित्रपट, विमानं, GST, शेती अशा असंख्य विषयांची बित्तं-बातमी त्यांच्याकडे असते ..!!
त्यांच्या बरोबर काम करणाऱ्यांना भेडसावणारी एक अडचण म्हणजे, त्यांना काही सांगायला जावं, तर ते त्यांना अगोदरच ठाऊक असतं, मग भले ती घटना पाच-दहा मिनिटांपूर्वी घडलेली का असेना ..!! आणि हेच त्यांच्या थक्क करणा-या निर्णयक्षमतेचं रहस्य आहे. सरकारमध्ये प्रत्येक निर्णय हा कागदावर, फाईलवरच शिक्कामोर्तब होतो. हे काम चालू असतांना कधीही ते “नंतर बघू” किंवा “चर्चा करा” असे ते म्हणत नाहीत. तासाभराच्या अवधीत शेकड्याहून अधिक गुंतागुंतीच्या विषयांवर अचूक निर्णय ते घेवू शकतात कारण, तो विषय विविध मार्गांनी त्यांना अगोदरच माहीत झालेला असतो. सकाळी ९ ते रात्री ३ ह्या त्यांच्या दिवसात अनेक बैठका, विविध व्यक्तींशी प्रत्यक्ष भेटी, फोन, SMS अशा माध्यमांतून ही माहिती गोळा होते. रोज त्यांना हजार तरी SMS नक्कीच येत असावेत आणि कितीही छोटा माणूस असो, प्रत्येकाला उत्तर जातंच. बहुदा ते रात्री २ किंवा ३ वाजता जातं. मग तो माणूस किती सुखावत असेल ..!!
“खुद्द मुख्यमंत्री माझ्या कामाची तत्परतेने दखल घेत आहेत ..!!”
हे Perception फार मोलाचं असतं. उत्तरदायी सरकार म्हणजे ह्याहून अधिक काय ..?? अर्थातच नंतर आमच्या यंत्रणेकडून त्या कामाचा तडफेने पाठपुरावा होतो. माणूस लहान-मोठा, गरीब-श्रीमंत, प्रांत-जात-भाषा-धर्म असा कसलाच भेदभाव सरांच्या विचार विश्वात नसतो. ‘हा आपला तो तुपला ..’ अशी कसलीच जाणीव नसते, फक्त तो माणूस सच्चा हवा ..!!
सरांचा मेंदू हा बुध्दिमत्ता संशोधकांकरता प्रयोगशाळा म्हणून वापरला जाऊ शकतो ..!!
स्वामी विवेकानंदांबद्दल सांगतात की, एखाद्या जाडजूड ग्रंथाची पाने उलटून ते पंधरा वीस मिनिटांत ग्रंथ पालथा घालायचे. एकदा कुणी तरी शंका उपस्थित केली की असा कसा वाचून संपला लगेच ..?? तेव्हा ते शंकेखोराला म्हणाले ..
“विचार, जे विचारायचंय ते ..!!”
आणि जे विचारलं ते त्यांनी शब्दश: उद्धृत करुन दाखवलं. तसंच सर जेव्हा एखादा कागदांचा गठ्ठा पाहतात तेव्हा अगदी कॅज्युअल पध्दतीने ..!! मलाही प्रश्न पडतो की नेमकं काय वाचलं त्यांनी ..?? कधी वाटतं की पुन्हा एकदा सविस्तर सांगावं कां ..?? पण त्या संबंधीचा मंत्री/आमदार इ. नंतर येऊन सांगतो की, साहेबांना खडान् खडा माहीत होतं ते प्रकरण आणि व्यवस्थित समजावून दिलं मला ..!! त्यांचं माहिती घेणं, ती साठवणं, फोलपटं फेकून देणं, मौलिक माहितीवर प्रक्रिया करणं आणि नंतर त्या माहितीचा सामर्थ्यशाली वापर करणं, हे कसब एखाद्या सुपर कॉम्प्युटरला लाजवेल असं आहे ..!!
‘वक्ता दशसहस्त्रेशु’ हे वचन श्री. देवेंद्र फडणवीस यांनी साफ खोटं ठरवलं. कारण ते दहा हजारांत नव्हे तर दहा कोटींत एक असे वक्ते आहेत ..!! सचिन तेंडुलकरला पाहावं तर लीलया शतक झळकावताना, अमिताभ बच्चनला पाहावं तर अँग्री यंग मॅन म्हणून, तसं सरांना पाहावं तर भाषण करताना ..!! भाषणाचा विषय, प्रभावी मुद्दे, भरगच्च तपशील, विरोधकांना गुगल्या, त्यांच्या फुलटॉसवर निर्दय षटकार, कधीकधी मजेत टोप्या उडवणे अशा असंख्य पैलूंसकट सरांनी वक्तृत्व ही कला न ठेवता तिला शास्त्र, विद्या, कसब, कला हयांच्या एका वेगळयाच पातळीवर नेऊन ठेवलं आहे. एरवी कोणत्याही व्यक्तीला सहजप्राप्य असणा-या सरांना, महत्वाच्या भाषणाच्या आधी व नंतर मात्र व्यत्यय चालत नाही. अनेकदा आम्ही त्यांना सरकारी माहिती,धोरणे, आकडेवारी असा कच्चा माल उपलब्ध करुन देतो. पण कॅन्व्हास, रंगांची डब्बी, कुंचला आणि उदा. ‘मोनालिसा’ सारखे जग-प्रसिध्द पेंटिंग हयांचा जितका संबंध असतो तितकाच त्या शासकीय टिपण्या आणि सरांच्या भाषणाचा असतो. एखाद्या कसबी कारागिराने भरजरी पोताची पैठणी विणावी तसे सरांचे भाषण विणले जाते. कधी मंद, शांत सूर तर क्षणार्धात घणाघाती आक्रमक सूर पकडत, सर आपल्या भाषणात विषयाची पूर्ण उकल करतात. विधी मंडळातील भाषण असेल तर, अगोदर उपस्थित झालेल्या मुद्यांचा एक एक करत परामर्श घेऊन नंतर असा काही भन्नाट चकवा मुद्दा मांडतात की समोरचे दिग्मूढ होऊन जातात ..!! प्रभावी बोलण्यामुळे हा माणूस आम्हाला काहीही पटवून देऊ शकतो आणि काही प्रतिवादही करता येत नाही असा हतबल भाव समोरच्यांच्या चेह-यावर हमखास असतो ..!!
मराठी नेत्यांना कायम त्रस्त करत आलेली समस्या म्हणजे, मराठी व्यतिरिक्त हिंदी, इंग्रजी या भाषांत बोलता न येणे. ह्या एका कारणामुळे अनेक कर्तबगार मराठी नेते दिल्लीत किंवा राष्ट्रीय स्तरावर छाप पाडू शकले नाहीत, असे काही जाणकारांचे मत आहे. सरांचे मात्र मराठी, हिंदी, इंग्रजी या तिन्ही भाषांवर कमालीचे प्रभुत्व आहे आणि अतिशय सफाईने ते ह्या तीनही भाषांतून संवाद, वक्तृत्व साधू शकतात. “अभी यहाँ पांडे जी ने जो विचार मांडे है” किंवा “मागण्या मान्य करो नहीं तो आंदोलन का भडका उड जायेगा” अशा हिंदीला उदारपणे माफ करण्याची सवय झालेल्या महाराष्ट्राला सरांचं हिंदी म्हणजे एक मेजवानीच असते ..!! अटलजींच्या हिंदीशी बरोबरी करु शकेल अशा त्यांच्या वक्तृत्वामागे, ते नागपूरचे आहेत (आणि पुणे, नाशिक, सांगली, सोलापूरचे नाहीत ..) ह्याचा वाटा आहेच पण त्यांनी ते परिश्रमपूर्वक कमावलेले आहे हेही तितकंच खरं ..!!
कॉलेज जीवनात ते एक पट्टीचे वाद-विवादपटू होते. देशभरातल्या अनेक आंदोलनांमध्ये त्यांनी भाग घेतलेला आहे आणि हया सहभागामुळे त्यांचे वाक्पटुत्व कसदार बनले आहे. गंमत म्हणजे, सर्वसामान्यांना महाबळेश्वर, उटी, गोवा, शिमला ही ठिकाणं पर्यटनामुळे माहीत असतात. पण सर नेमके अशा ठिकाणी फारच क्वचित गेलेले असतात. कारण त्यांची उमेदवारीच्या काळातील सगळी फिरती आंदोलनांच्या ठिकाणीच झालेली आहे. अमेरिकेत गुगल, फेसबुकच्या सीईओंशी ज्या सहजपणे आज ते इंग्रजी बोलतात त्याच सहजपणे, ते विदर्भातल्या छोटया कास्तकाराशी खास व-हाडी शैलीत बोलू शकतात ..!!
ऐन मंत्रीमंडळ बैठकीतही, “मी तुम्हाला पुन्हा असं सांगून राहिलो की..” असं म्हणून ते आपलं वैदर्भीय असणं छान मिरवतात. देहबोली, भाषा, स्वभावाचा पुरेपूर वापर करणारे समर्थ संवाद-नैपुण्य हा त्यांच्या यशामागचा महत्वाचा आधारस्तंभ आहे. सत्तावन्न वर्षांच्या महाराष्ट्राचे नेतृत्व बव्हंशी ग्रामीण महाराष्ट्रातून उभारले. ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, सहकार, शेती ह्यात मुरलेले असे हे नेतृत्व होते. त्यामुळे एका बाजूला हे विषय, आणि दुस-या बाजूला माहिती तंत्रज्ञान, नागरीकरण, मेट्रो, सोशल मिडिया हे एकविसाव्या शतकातले विषय ही दरी कायमच राहिली ..!!
कृषी, सिंचन, सहकार हे ग्रामीण महाराष्ट्राशी संलग्न विषय आणि नागरी वाहतूक, आय.टी, ‘मेक इन-महाराष्ट्र’ असे उच्चभ्रू विषय हयांची सांगड घालणारे देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्रातले विरळाच नेतृत्व. एकीकडे जलयुक्त शिवार, बळीराजा चेतना अभियान ह्या सारख्या योजना त्यांच्या कल्पनेतून साकारल्या. छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतून न भूतो न भविष्यती अशी कर्ज-माफी झाली. त्याचवेळी दुसरीकडे नागपूर, मुंबई, पुणे येथील मेट्रो, नागपूर-मुंबई समृध्दी महामार्ग, मुंबईतला कोस्टल रोड, शिवडी ते न्हावाशेव्हा सागरी पूल, नवी मुंबई-पुणे विमानतळ, असे पायाभूत सुविधा प्रकल्प त्यांनी प्रगती पथावर नेले. नागरी भागात यशस्वी केलेल्या अनेक प्रकल्पांमुळे नगर परिषदा, महानगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये घवघवीत यश मिळाले ..!!
एक अभ्यासू, सु-स्वभावीनेता ते ‘हुकूमी ब्रँड देवेंद्र फडणवीस’ असा प्रवास निव्वळ अडीच वर्षांच्या कालावधीत घडला. कोणालाही अचंबा वाटावा असा हा प्रवास आहे. मोठया व्यक्तीच्या सतत आजूबाजूला राहाणा-यांना त्या व्यक्तीच्या थोरपणाची सवय होऊन जाते, त्या थोरपणाची महती फार वाटेनाशी होते अशा अर्थाची एक इंग्रजी म्हण आहे. पण मला सरांच्या बाबतीत ती पटत नाही. उलट जितकं त्यांच्या आजूबाजूला असावं तितकी त्यांच्या व्यक्तिमत्वाची संपन्नता जास्त जास्त खुलत जाते आणि एका लेखाच्या मर्यादेत ही संपन्नता व्यक्त करणं हे अशक्यप्रायच ..!! त्यासाठी बहुखंडी चरित्र-ग्रंथच लिहायला हवा आणि कधी तरी, योग्य वेळी माझ्या हातून हे काम व्हावं असं मला फार वाटतं ..!! एका दैदिप्यमान कारकिर्दींची पंचवीस वर्ष पूर्ण होतआहेत. अजून खूप मोठा प्रवास पुढे आहे. हया वाटचालीकरता अकरा कोटी महाराष्ट्रीयांच्या शुभेच्छा त्यांच्या सोबत आहेत. परमेश्वराचे उदंड आशीर्वाद त्यांच्यावर असावेत हीच प्रार्थना ..!!
फडणवीस यांचे मुख्य सचिव श्रीमान श्रीकर परदेसी
