पक्षासाठी परीश्रम घेणारा कार्यकर्ताच उद्याचा नेता!
– चंद्रशेखर बावनकुळे यांचे प्रतिपादन
• हातकणंगले लोकसभा मतदारसंघात प्रवास
• संपर्क से समर्थन व घरचलो अभियानात सहभाग
• सुपर वॉरिअर्स व पदाधिकाऱ्यांशी संवाद
हातकणंगले ब्युरो –
भाजपाला सर्वांत मोठा पक्ष होण्यासाठी अनेक नेत्यांनी योगदान दिले. कार्यकर्त्यांनी केलेल्या मेहनतीमुळे भाजपा जगातला सर्वांत मोठा पक्ष ठरला आहे. पक्षासाठी सातत्याने परिश्रम घेणारे कार्यकर्ते हेच उद्याचे नेतृत्त्व आहे, असे प्रतिपादन भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष श्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले. ‘महाविजय-२०२४’ हा संकल्प पूर्ण करून पंतप्रधानपदी तिसऱ्यांदा नरेंद्र मोदी यांना बसविल्याशिवाय स्वस्थ बसू नये.

शुक्रवारी प्रदेशाध्यक्ष श्री बावनकुळे यांनी पश्चिम महाराष्ट्रातील हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचा प्रवास केला. यावेळी त्यांनी इस्लामपूर येथे शिराळा, शाहूवाडी-पन्हाळा व इस्लामपूर येथे आणि इचलकरंजी येथे हातकणंगले, शिरोळ व इचलकरंजी या विधानसभा क्षेत्रातील सुपर वॉरियर्सशी संवाद साधला. ते म्हणाले, पंतप्रधान मोदी यांनी आत्मनिर्भर भारताचा संकल्प केला असून त्यात भागीदार होण्याची ही सर्वोत्तम संधी आहे. विरोधी पक्षांकडे विकासाचा कोणताही अजेंडा नाही. राज्यात भाजपासोबत एकनाथ शिंदे व अजित पवार आले आहेत. त्यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीत भाजपा नेतृत्त्वातील महायुतीचाच विजय होणार हे निश्चित आहे.
हातकणंगले लोकसभा प्रवासात त्यांच्यासोबत कामगार मंत्री सुरेश खाडे, खासदार संजयकाका पाटील, प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ, हातकणंगले लोकसभा निवडणूक प्रमुख सत्यजित देशमुख, प्रदेश उपाध्यक्ष तथा हातकणंगले लोकसभा समनव्यक विक्रम पावस्कर, सांगली जिल्हाध्यक्ष निशिकांत भोसले, कोल्हापूर पूर्व (हातकणंगले) जिल्हाध्यक्ष राजवर्धन निंबाळकर, निवास पाटील, संदीप सावंत, भास्कर कदम, धैर्यशील मोरे, जयराज पाटील, अशोक खोत, अमर कांबळे, शशिकांत मोहिते, शयाजी भोसले, राजकुमार भाकरे, सतीश पंडित, अमृत भोसले यांच्यासह सर्व स्थानिक आमदार व सर्व प्रमुख पदाधिकारी व जिल्हा कार्यकारिणीतील सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

• मोदी-मोदीच्या घोषाने भरला उत्साह
हातकणंगले लोकसभा मतदारसंघात इस्लामपूर येथे छत्रपती शिवाजी महाराज चौक ते गांधी चौकपर्यंत आणि इचलकरंजी येथे जनता बॅंक चौक ते गांधी पुतळा पर्यंत या दोन्ही ठिकाणच्या मुख्य बाजारपेठेतून ‘घर चलो अभियानात’ प्रदेशाध्यक्ष श्री बावनकुळे सहभागी झाले. हातात माईक घेऊन त्यांनी थेट जनतेशी संवाद साधला. नागरिकांच्या अडचणी समजून घेतल्या तर मोदी सरकारच्या विविध योजनांची माहिती दिली. त्यांनी पुढचा पंतप्रधान कोण असा प्रश्न विचारताच सर्वत्र मोदी-मोदीच्या घोषाने वातावरणात व कार्यकर्त्यांत उत्साह निर्माण झाला. या प्रवासात त्यांनी इस्लामपूर येथे गजानन फल्ले आणि इचलकरंजी येथे गजानन महाजन यांची स्नेह भेट घेतली व त्यांना ‘मोदी@20’ हे पुस्तक भेट दिले व मोदी सरकारच्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती दिली व समर्थन मागितले.
