महाखनिजमधील तांत्रिक अडथळे १० दिवसांत दूर करा; अन्यथा कारवाईला सामोरे जा : महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे
– महाखनिज २.० शी विविध विभागांच्या प्रणाली जोडण्याचे निर्देश; राज्यव्यापी दौऱ्यात एकही तक्रार येता कामा नये
मुंबई, WH NEWS ८ ऑक्टोबर २०२६ : महाखनिज २.० प्रणालीतील तांत्रिक अडचणी तातडीने दूर करून येत्या १० दिवसांत प्रणालीमध्ये स्पष्ट सुधारणा दिसली पाहिजे, असे निर्देश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले. पोर्टल संथ होणे, वारंवार एरर येणे किंवा तांत्रिक अडचणींमुळे नागरिकांची गैरसोय होता कामा नये. अडचणी वेळेत दूर न झाल्यास संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.
मंत्रालयात महाखनिज २.० प्रणालीच्या आढावा बैठकीत बावनकुळे यांनी विविध विभागांच्या प्रणाली महाखनिजशी जोडण्याच्या कामाला गती देण्याचे निर्देश दिले. बांधकाम परवानग्यांसाठी वापरण्यात येणाऱ्या बीपीएमएस आणि ऑटो डीसीआर प्रणाली महाखनिज २.० शी तातडीने जोडाव्यात, तसेच संबंधित विभागांनी आवश्यक आदेश काढून संलग्नीकरणाची प्रक्रिया पूर्ण करावी, असे त्यांनी सांगितले.
विविध विभागांकडील प्रकल्प, कंत्राटदार आणि गौण खनिजांशी संबंधित माहिती महाखनिजवर नोंदवून ती नियमितपणे अद्ययावत ठेवण्याच्या सूचनाही देण्यात आल्या. संबंधित विभागांनी महाखनिजवर स्वतंत्र ‘कन्झ्युमर’ म्हणून नोंदणी करून माहितीची देवाणघेवाण सुलभ करावी, असेही बावनकुळे यांनी स्पष्ट केले.
पर्यावरण व वन विभागाच्या प्रणालीही जोडणार
स्टोन क्रशर आणि आरएमसी प्लांटच्या परवानग्यांसाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची प्रणाली तसेच पर्यावरण मंजुरीसाठीचे पोर्टल महाखनिजशी जोडण्याची प्रक्रिया वेगाने पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले.
खानपट्टा मंजुरीसाठी आवश्यक वन विभागाच्या नाहरकत प्रमाणपत्रांचा स्वतंत्र डेटाबेस तयार करून तो महाखनिजशी जोडावा आणि माहिती नियमित अद्ययावत ठेवावी, असेही बावनकुळे यांनी सांगितले. खाणकामासाठी अनुज्ञेय क्षेत्रांची माहिती महाखनिजवर उपलब्ध करून देण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.
“राज्यव्यापी दौऱ्यात महाखनिजबाबत एकही तक्रार नको”
महाखनिजमधील तांत्रिक अडचणींचे केवळ तात्पुरते निराकरण न करता त्यामागील मूळ कारणे शोधून कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, असे बावनकुळे यांनी अधिकाऱ्यांना सांगितले.
“मी आता राज्यव्यापी दौरा करणार आहे. या दौऱ्यात महाखनिजसंदर्भात कोणतीही तक्रार माझ्याकडे येता कामा नये. दहा दिवसांत प्रणालीमध्ये सुधारणा झाली पाहिजे. तांत्रिक अडचणी वेळेत दूर झाल्याच पाहिजेत,” असे त्यांनी स्पष्ट केले.
महाखनिज २.० ही गौण खनिजांच्या परवानग्या, वाहतूक, ऑनलाइन प्रक्रिया, वाहन निरीक्षण आणि तक्रार निवारणासाठी एकत्रित डिजिटल व्यवस्था म्हणून कार्यरत आहे. नागरिकांना आणि संबंधित घटकांना सुरळीत सेवा मिळण्यासाठी प्रणालीची तांत्रिक क्षमता वाढवण्याबरोबरच विविध विभागांमधील संलग्नीकरण मजबूत करण्यावर बैठकीत भर देण्यात आला.
बैठकीस महसूल विभागाच्या सहसचिव मनीषा जायभाये, अपर जिल्हाधिकारी संजय पवार, रेलटेल कंपनीचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. कोकण विभागीय आयुक्त रुबल अग्रवाल यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठकीत सहभाग घेतला.
