सराईत घरफोडी आरोपीला ६ वर्षांचा कारावास; ₹२० हजार दंडाची शिक्षा
नागपूर WH NEWS : लकडगंज पोलिसांच्या शास्त्रीय तपासाला न्यायालयीन दोषसिद्धीचे यश मिळाले आहे. घरफोडीच्या गंभीर गुन्ह्यातील सराईत आरोपी नरेश अंकालू महिलांगे (वय ३४) याला मा. DJ-2 न्यायालय, नागपूर यांनी ६ वर्षे कारावास आणि ₹२०,००० दंडाची शिक्षा सुनावली.
पोलीस ठाणे लकडगंज येथे दाखल अपराध क्र. 15/2021, कलम 380, 457, 411, 413, 414, 34 भादंवि अंतर्गत हा गुन्हा दाखल होता. सदर प्रकरण सेशन केस क्र. 6477/2021 म्हणून न्यायालयात सुरू होते.
पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपीविरुद्ध नागपूर शहर, नागपूर ग्रामीण तसेच महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये सुमारे 120 घरफोडी व शरीराविरुद्धचे गुन्हे दाखल असल्याची पार्श्वभूमी आहे. आरोपीविरुद्ध यापूर्वी MCOCA, तडीपार आणि MPDA अंतर्गतही प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. तो सध्या नागपूर मध्यवर्ती कारागृहात आहे.
तपासादरम्यान CCTV फुटेजचे सूक्ष्म विश्लेषण, तांत्रिक पुरावे, C.A. रिपोर्ट तसेच वैज्ञानिक व पूरक पुरावे यांचा प्रभावी वापर करण्यात आला. तसेच साक्षीदारांचा सातत्याने पाठपुरावा करून त्यांना न्यायालयासमक्ष हजर करण्यात आले.
सरकारी पक्षाच्या वतीने ॲड. साई खेडकर यांनी प्रभावी बाजू मांडली. तपास यंत्रणेने सादर केलेले पुरावे आणि सरकारी पक्षाची प्रभावी मांडणी यामुळे न्यायालयाने आरोपीला दोषी ठरवत ६ वर्षांचा कारावास व ₹२० हजार दंडाची शिक्षा सुनावली.
ही कारवाई मा. पोलीस आयुक्त, सह पोलीस आयुक्त, अपर पोलीस आयुक्त उत्तर विभाग, पोलीस उपायुक्त परिमंडळ-३ आणि सहाय्यक पोलीस आयुक्त लकडगंज विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
कारवाईत वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुकुंद कवाडे, API राजेंद्र सानप, पोलीस हवालदार अमर काळे, नितीन सातपुते, पंकज दहापुते, शैलेंद्र चौधरी, आनंद मर्सकोल्हे, पोलीस अंमलदार सुशीला धुर्वे, कार्तिक मडगुलवार, मयूर बनसोडे तसेच सरकारी अभियोक्ता ॲड. साई खेडकर यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
नागपूर पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, घरफोडी, चोरी किंवा संशयास्पद हालचाल निदर्शनास आल्यास तात्काळ पोलिसांना माहिती द्यावी. आपत्कालीन परिस्थितीत 112 वर संपर्क साधावा.
“नागरिकांचा विश्वास – पोलिसांची ताकद; गुन्हेगारांवर कायद्याचा वचक – सुरक्षित नागपूरचा संकल्प!”
