दुष्काळाच्या जळत्या छायेत शेतकऱ्याचा संसार खाक
– दीड लाखांचे नुकसान, पण श्रेयसच्या धैर्याने वाचले मुक्या प्राण्यांचे प्राण
शिरजगाव मोझरी : आकाशात पावसाचा पत्ता नाही, हातातोंडाशी आलेला घास दुष्काळाने हिसकावून घेतलाय… अशा परिस्थितीत उद्या आपल्या गुराढोरांना काय खायला घालायचे, या चिंतेत रात्रंदिवस घाम गाळणाऱ्या बळीराजावर निसर्गाने नव्हे, तर आगीच्या भीषण ज्वाळांनी काळाचा घाला घातला आहे. मंगळवारी मध्यरात्री शिरजगाव मोझरी येथे घडलेल्या एका भीषण अग्निकांडात प्रकाश ठवरे आणि पुष्पा बेलसरे या दोन हवालदिल शेतकऱ्यांचे एकूण सुमारे दीड लाख रुपयांचे साहित्य जळून खाक झाले.
एकीकडे कोरड्या दुष्काळाच्या तीव्र झळा संपूर्ण शिवार भाजून काढत आहेत. शेतात पिके करपली, विहिरींनी तळ गाठला. अशा बिकट परिस्थितीत वर्ष-दोन वर्षांचा गुरांचा चारा आणि कुटार जपून ठेवणाऱ्या प्रकाश ठवरे यांच्या गुरांच्या गोठ्याला मंगळवारी मध्यरात्री ३ वाजता अचानक भीषण आग लागली. आगीचा भडका एवढा रौद्र होता की, बाजूलाच असलेले कडुनिंबाचे ओले झाडही तब्बल २० फुटांपर्यंत पेटून उठले. आगीच्या त्या ज्वाळांमध्ये शेतातील अवजारे, गुरांचा चारा आणि पुष्पा बेलसरे यांच्या शेतातील स्प्रिंकलरचे ६० पाईप क्षणात राख झाले.
आगीची बातमी पसरताच गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन बादल्यांनी पाणी टाकून आग विझवण्याचा आटापिटा केला; पण आगीचे तांडव मोठे होते. अखेर सामाजिक कार्यकर्ते प्रशांत कांबळे यांनी तातडीने चांदूर रेल्वे नगरपरिषदेच्या अग्निशामक दलाला पाचारण केले. पहाटे ७:३० वाजेच्या सुमारास आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवण्यात यश आले.
———
श्रेयसच्या धैर्याने वाचला ८ दिवसांच्या वासराचा जीव
हृदय पिळवटून टाकणाऱ्या या घटनेत एक दिलासादायक आणि अभिमानास्पद चित्रही पाहायला मिळाले. गोठ्याला लागलेली आग शेजारी राहणाऱ्या एका महिलेच्या लक्षात येताच, तिच्या मुलगा श्रेयस बकाले या युवकाने स्वतःच्या जिवाची यत्किंचितही पर्वा न करता धगधगत्या आगीत झेप घेतली. गोठ्यात मृत्यूच्या दाढेत बांधलेल्या निष्पाप जनावरांना त्याने धैर्याने सुरक्षित बाहेर काढले. अवघ्या आठ दिवसांच्या गाईच्या चिमुकल्या बछड्याला त्याने आगीच्या तावडीतून बाहेर आणले.
———
तातडीने आर्थिक मदतीची मागणी
या आगीत दोन्ही शेतकऱ्यांचे दीड लाखांहून अधिक नुकसान झाले असून, त्यांचे उरलेसुरले आयुष्य उघड्यावर आले आहे. घटनेची माहिती मिळताच तलाठी माळोदे यांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला असून, तिवसा तालुक्याच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाकडे अहवाल सोपवला आहे. आधीच अस्मानी आणि सुलतानी संकटाने पिचलेल्या या शेतकऱ्यांना सावरण्यासाठी शासनाने कोणताही विलंब न करता तातडीने भरघोस आर्थिक मदत द्यावी, अशी आग्रही मागणी सामाजिक कार्यकर्ते प्रशांत कांबळे आणि गावकऱ्यांनी केली आहे
तिवसा नगरपंचायतची अग्निशमन वाहन नादुरुस्त
तिवसा येथून अवघ्या १५ मिनिटांच्या अंतरावर असलेल्या शिरजगाव मोझरी येथील आगीसाठी नागरिकांनी तिवसा नगरपंचायत कार्यालयातील संबंधित कर्मचाऱ्यांना अग्निशमन वाहनासाठी फोन केले. मात्र, गेल्या तीन दिवसांपासून अग्निशमन वाहन एका आंदोलनाच्या ठिकाणीच नादुरुस्त अवस्थेत लावारिस पडून आहे. सध्या शेतामध्ये सोयाबीन काढणी सुरू aahe. अशावेळी अनेक आगीच्या घटना वाढतात. शिवाय, राष्ट्रीय महामार्गावर तिवसा असल्याने इथली अग्निशमन वाहन अत्याधुनिक आणि दुरुस्त असणे अत्यंत आवश्यक आहे. मात्र, नादुरुस्त वाहनामुळे अखेर शिरजगाव मोझरी येथील आग विझवण्यासाठी चांदूर रेल्वे येथील नगरपरिषदेच्या अग्निशमन दलाला बोलावण्यात आले.
