डीजे चालक-मालकांची पोलीस आयुक्तांशी बैठक!
– गणेशोत्सवापूर्वी नागपूर पोलिसांचा इशारा; नियमभंग केल्यास कठोर कारवाई
नागपूर WH NEWS , ४ सप्टेंबर २०२६ : आगामी गणेशोत्सव व सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर ध्वनीप्रदूषणाला आळा घालण्यासाठी आणि कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी नागपुरातील डीजे व साऊंड सिस्टिम चालक-मालकांची बैठक घेतली.

या बैठकीत पोलीस आयुक्तांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, २०२३ मधील कलम १६३ अंतर्गत जारी आदेशातील तरतुदींची माहिती देत डीजे चालक-मालकांना नियमांचे काटेकोर पालन करण्याच्या सूचना दिल्या.
बैठकीत डॉल्बी साऊंडचे टॉप-मिड-बेस मल्टीलेअर सेटअप, प्लाझ्मा साऊंड, प्रेशरमिड साऊंड तसेच तत्सम उच्च क्षमतेच्या ध्वनीप्रणालींच्या वापराबाबत निर्बंध असल्याचे स्पष्ट करण्यात आले. अशा साऊंड सिस्टिमसाठी मॉडिफाय केलेली किंवा अनधिकृत बदल केलेली वाहने उत्सव काळात वापरू नयेत, तसेच अशी वाहने मूळ स्थितीत ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या.

यासोबतच सार्वजनिक कार्यक्रम आणि मिरवणुकांमध्ये बीम व लेझर लाईट्सचा वापर करू नये, असेही पोलिसांनी स्पष्ट केले. लेझर लाईट्समुळे वाहनचालकांच्या दृष्टीवर परिणाम होऊन अपघाताचा धोका निर्माण होऊ शकतो.
दरम्यान, निर्धारित ध्वनीमर्यादेत आणि नियमांचे पालन करून वापरल्या जाणाऱ्या सामान्य साऊंड सिस्टिमवर सरसकट बंदी नाही, हेही स्पष्ट करण्यात आले. मात्र, ध्वनीप्रदूषणाच्या नियमांचे किंवा पोलीस आयुक्तांच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायद्यानुसार कठोर कारवाई केली जाणार असल्याचा इशारा देण्यात आला.

पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी डीजे व साऊंड सिस्टिम चालक-मालकांना उत्सव आनंदाचा आणि सामाजिक सलोख्याचा ठेवण्याचे आवाहन केले.
“कायद्याचे पालन करून उत्सव साजरे करा. ध्वनीप्रदूषण किंवा नागरिकांना त्रास होईल, तसेच कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणाऱ्या उच्च क्षमतेच्या ध्वनीप्रणालींचा वापर टाळा,” असे आवाहन पोलीस आयुक्तांनी केले.
