प्रामाणिक ऑटोचालकाचा आदर्श! साडेचार लाखांची बॅग लकडंगंज पोलिसांच्या माध्यमातून महिलेच्या स्वाधीन!
नागपूर WH NEWS : रस्त्यावर सापडलेली लाखो रुपयांची बॅग स्वतःकडे न ठेवता ती पोलिसांच्या माध्यमातून संबंधित महिलेला परत करून एका ऑटोचालकाने प्रामाणिकपणाचा आदर्श निर्माण केला आहे. सचिन मोतीरामजी निखारे असे या प्रामाणिक ऑटोचालकाचे नाव आहे.

दिनांक 31 ऑगस्ट 2026 रोजी ममता नरेश यादव, व्यवसायाने शासकीय शिक्षिका असून त्या यादव नगर, नागपूर येथील रहिवासी आहेत. त्या जुना मोठा स्टँड चौक, अमर टॉकीजसमोर खरेदीसाठी गेल्या असता त्यांची बॅग हरवली होती. या बॅगेत ₹1 लाख 75 हजार रोख, दीड तोळ्याची सोन्याची अंगठी अंदाजे ₹2 लाख 50 हजार, सुमारे ₹50 हजार किमतीचा मोबाईल फोन आणि तीन एटीएम/डेबिट कार्ड असा एकूण सुमारे ₹4 लाख 75 हजारांचा मुद्देमाल होता.

याप्रकरणी लकडगंज पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. पोलिसांकडून तपास सुरू असतानाच दिनांक 1 सप्टेंबर 2026 रोजी ऑटोचालक सचिन मोतीरामजी निखारे (वय 40) यांना सदर बॅग व त्यातील मुद्देमाल मिळून आला.
लाखो रुपयांचा मुद्देमाल सापडल्यानंतरही कोणताही स्वार्थ न ठेवता सचिन निखारे यांनी तो लकडगंज ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुकुंद कवाडे यांच्या माध्यमातून ममता यादव यांच्याकडे सुरक्षितपणे परत केला. त्यामुळे महिलेचा संपूर्ण मुद्देमाल पुन्हा त्यांच्या स्वाधीन झाला.
सचिन निखारे यांच्या या प्रामाणिकपणा आणि सामाजिक बांधिलकीची दखल घेत लकडगंज पोलीस ठाण्याच्या वतीने त्यांचा सत्कार करून प्रशस्तीपत्र देत गौरव करण्यात आला.
लाखो रुपयांचा मुद्देमाल सापडल्यानंतरही तो स्वतःकडे न ठेवता प्रामाणिकपणे परत करणाऱ्या ऑटोचालक सचिन निखारे यांच्या कृतीचे सर्वत्र कौतुक होत आहे. नागरिकांनीही प्रामाणिकपणा आणि सामाजिक बांधिलकी जपत पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन लकडगंज पीआई मुकुंद कवाडे यांनी नागरिकांना केले आहे.
