अवैध धान तस्कर नियंत्रण पथकाच्या ताब्यात ◼️6.60 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त

अवैध धान तस्कर नियंत्रण पथकाच्या ताब्यात

◼️6.60 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त

गोंदिया : जिल्ह्यातील देवरी येथून धान खरेदी करून चिचगड-ककोडी मार्गे छत्तीसगड राज्यातील हातबंजारी येथे नेत असलेला ट्रक कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव लोकेश सोनुले आणि त्यांच्या उड्डाण पथकाने 24 डिसेंबर रोजी दुपारी 2.40 च्या सुमारास पकडला. या कारवाईत धानाची 200 पोती व ट्रक असा एकूण 6 लाख 60 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

मिळालेल्या माहितीनुसार, कृषी उत्पन्न बाजार समिती देवरीचे नियंत्रण पथक आपले कार्यक्षेत्र देवरी व सालेकसा परिसरात अवैध धान खरेदीवर नियंत्रण ठेवण्यासाठी गस्तीवर असताना मंगळवारी दुपारी 12.30 वाजताच्या सुमारास देवरी-चिचगड-ककोडी मार्गावरील गणुटोला येथे दुपारी ट्रक क्र. सीजी 08 – V 6015 ची तपासणी करण्यात आली. यावेळी हातबंजारी (छत्तीसगड) येथील रहिवासी ट्रक मालक माणिक शाहू हा बेकायदेशीरपणे देवरी येथून धान खरेदी करून चालकाच्या मदतीने छत्तीसगड राज्यातील हातबंजारी येथे नेत असल्याचे आढळून आले.

दरम्यान, कृउबास देवरीचे सचिव लोकेश सोनुले व त्यांच्या पथकाने कारवाई करून वाहन ताब्यात घेतले. सोनुले यांच्या या कारवाईने देवरी व सालेकसा तालुक्यातील अवैध धान खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांचे धाबे दणाणले असून या कारवाईत 1 लाख 60 हजार रुपये किमतीचे 200 पोती धान व 5 लाख रुपये किंमतीचे ट्रक असा 6 लाख 60 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पुढील कारवाई बाजार समितीचे नियंत्रण पथक करीत आहे.

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

More posts