पत्रकार गोपाळ मोटघरे यांना पुण्यात मूकनायक पुरस्काराने सन्मानित…निर्मळ मनाचा पत्रकार गोपाळ -राऊत
पुणे – गेल्या 15 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत असून, दुर्गम आणि नक्षलग्रस्त भाग असलेल्या गोंदिया जिल्ह्यातून त्याने आपल्या पत्रकारितेला सुरुवात केली. गोंदिया,भंडारा ते पुणे असा प्रवास त्याने या निमित्ताने केला आहे. आयबीएन लोकमत मध्ये असताना भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यातून एकापेक्षा एक चांगले रिपोर्ट गोपाळने केले आहे. त्याच्या पत्रकारितेच्या प्रवासाचा मी एक साक्षीदार आहे.
आजही पुण्यात अनेक अशा सामाजिक संघटना, छोटे मोठे पक्ष असतील ज्यांची कुणी एका ओळीने दखल घेत नाही,त्या सर्वांचा गोपाळ हा एक हक्काचा मित्र,पत्रकार आहे. एक संवेदनशील, सामाजिक भान जपणारा पत्रकार म्हणून गोपाळने आपली ओळख कायम जपली आहे. त्याहीपेक्षा एक उत्तम माणूस ,मैत्री निभावणारा, शांत,संयमी आणि निर्मळ मनाचा व्यक्ती म्हणून त्याची एक वेगळी ओळख आहे. अलीकडच्या पत्रकारितेतील भाऊगर्दीत त्याने स्वतःला हरवू दिलं नाही,हे विशेष.
प्रत्येक तासाला,मिनिटाला बदलणाऱ्या या दुनियेत गोपाळ मात्र कधीच बदलला नाही. आयुष्यात अनेक वाईट दिवस आले ,वाईट प्रसंग वाट्याला आले, कित्येकदा ठेचा खाल्ल्या मात्र गोपाळने आपला चांगुलपणा,सच्चेपणा कधी सोडला नाही. तो धडपडत असताना,परिस्थितीसोबत हात दोन हात करताना देखील त्याने जीवनात, मनात कधी कडवटपणा येऊ दिला नाही.तो कधी कुणावर रागावला,चिडला,मला आठवत नाही. त्याच्या मनात कुणाबद्दल आकस ,द्वेषाची भावना येणे ही तर फार दूरची गोष्ट. गोपाळच्या व्यक्तिमत्वातले अनेक अशे अनेक पैलू आहेत,जे मी स्वतः अनुभवले आहेत. गोंदिया सारख्या भागातून येऊन त्याने पुण्यासारख्या शहरात आपल्या स्वभावामुळे मित्रांचा मोठा गोतावळा तयार केला,आयुष्यात संघर्ष करताना दुसऱ्याच्या कामात तो पडला.
मी आजपर्यंत गोपाळबद्दल कुणी वाईट बोलणारा व्यक्ती बघितला नाही आणि ऐकलं नाही.माझ्या आयुष्यात गोपाळसारखे फार कमी लोक,मित्र आहेत. गोपाळची दोस्ती हा खूप मोठा आधार आणि शक्ती आहे. फार कमी लोक हे समजू शकले. असो, जीवनाच्या एका टप्प्यावर त्याच्या कामाची दखल घेतली,याचे समाधान आहे.
विनोद राऊत वरिष्ठ पत्रकार मुम्बई
