पावसाळी अधिवेशन विशेष!
नागपुरात 10,953 गंभीर गुन्ह्यांची नोंद; ‘ऑपरेशन थंडर’चा परिणाम किती?
-199 हत्या, 1,236 अपहरण, 549 बलात्कार, 6,113 चोरीच्या घटना; कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह
-RTI मधून धक्कादायक खुलासा : विधानसभेत उठणार मुद्दा!
नागपूर WH NEWS | ( विजय खवसे )
नागपूर शहर पोलीस आयुक्तालयाकडून माहितीच्या अधिकार (RTI) अंतर्गत प्राप्त झालेल्या आकडेवारीतून शहरातील गुन्हेगारीचे चिंताजनक चित्र समोर आले आहे. पोलीस आयुक्त रवींद्र सिंघल यांच्या कार्यकाळात 2024 ते एप्रिल 2026 या कालावधीत हत्या, खुनाचा प्रयत्न, अपहरण, बलात्कार, घरफोडी, चोरी, खंडणी आणि दरोडा अशा गंभीर स्वरूपाच्या तब्बल 10,953 गुन्ह्यांची नोंद झाल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाले आहे.

आरटीआय अंतर्गत नागपूर पोलीसांच्या गुन्हे शाखेकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार, या कालावधीत 199 हत्या, 390 खुनाचे प्रयत्न, 1,236 अपहरण, 549 बलात्कार, 2,288 घरफोड्या, 6,113 चोरी,179 ऍट्रॉसिटी,148 खंडणी आणि 30 दरोड्यांचे गुन्हे नोंदविण्यात आले आहेत.
विशेष म्हणजे वर्ष 2024 मध्ये 83 हत्या, 2025 मध्ये 91 हत्या, तर 2026 च्या एप्रिलपर्यंत 25 हत्या अश्या 199 हत्या झाल्याची नोंद आहे. त्यामुळे शहरातील गंभीर गुन्ह्यांच्या नियंत्रणाबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.या हत्येने नागपूर शहराचे नाव देशात दोन नंबर आले आहे.
अमली पदार्थांच्या गुन्ह्यांत मोठी वाढ!
आरटीआय मधील माहितीनुसार, NDPS कायद्यांतर्गत 2024 मध्ये 272 गुन्हे नोंदविण्यात आले होते. 2025 मध्ये ही संख्या वाढून 601 वर पोहोचली. जानेवारी ते एप्रिल 2026 या कालावधीत 123 गुन्ह्यांची नोंद झाली आहे.
झोन-6 हा सर्वाधिक संवेदनशील ठरला असून 2025 मध्ये येथे 187 गुन्हे नोंदविण्यात आले. जरीपटका, कपिलनगर आणि जुनी कामठी परिसरात सर्वाधिक कारवाया झाल्याचे आकडेवारीतून समोर आले आहे.

‘ऑपरेशन थंडर’मध्ये 1022 प्रकरणे
1 मार्च 2024 ते 22 मे 2026 या कालावधीत नागपूर पोलिसांनी राबविलेल्या ‘ऑपरेशन थंडर’ अंतर्गत 1022 प्रकरणे नोंदवून 1345 आरोपींना अटक केल्याची माहिती देण्यात आली आहे.
या कारवाईत गांजा, एमडी (मेफेड्रोन) आणि इतर अमली पदार्थांवर मोठ्या प्रमाणावर कारवाई झाल्याचे पोलीस प्रशासनाचे म्हणणे आहे. मात्र दुसरीकडे NDPS गुन्ह्यांमध्ये झालेली वाढही चिंतेचा विषय ठरत आहे.ऑपरेशन थंडर सुरु असतांना एवढ्या मोठया प्रमाणात शहरात अमली पदार्थ आले कसे असा प्रश्न पोलिसांवर उठत आहे.

जुगारविरोधी कारवाया वाढल्या!
जुगारविरोधी कारवाईत 2024 मध्ये 795 गुन्हे, 2025 मध्ये 971 गुन्हे, तर 2026 च्या पहिल्या चार महिन्यांत 275 गुन्हे नोंदविण्यात आले आहेत.
सर्वाधिक जुगारविषयक गुन्हे झोन-3 मध्ये नोंदविण्यात आले असून पाचपावली, तहसील, एमआयडीसी, अजनी, नंदनवन आणि गिट्टीखदान पोलीस ठाण्यांच्या हद्दीत मोठ्या प्रमाणावर कारवाया झाल्याचे आकडे सांगतात.

महिलांवरील अत्याचाराचे चित्र चिंताजनक!
बलात्काराच्या 549 घटनांबरोबरच महिलांवरील अत्याचाराच्या घटनाही मोठ्या प्रमाणात समोर आल्या आहेत. पती किंवा नातेवाईकांकडून होणाऱ्या क्रूरतेच्या (498-A) प्रकरणांमध्ये 2024 मध्ये 267, 2025 मध्ये 226 आणि एप्रिल 2026 पर्यंत 53 गुन्ह्यांची नोंद झाली आहे.

ॲट्रॉसिटीचे शेकडो गुन्हे चिंताजनक!
अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत फेब्रुवारी 2024 ते मे 2026 या कालावधीत शेकडो गुन्ह्यांची नोंद झाली आहे. सामाजिक तणाव आणि जातीय अत्याचाराच्या घटनांकडेही ही आकडेवारी लक्ष वेधते.
ॲट्रॉसिटीचे 170 गुन्हे
अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत
फेब्रुवारी 2024 ते डिसेंबर 2024 : 238 गुन्हे
वर्ष 2025 : 176 गुन्हे
मे 2026 पर्यंत : 170 गुन्हे नोंद झाली.
ही आकडेवारी सामाजिक तणाव आणि जातीय अत्याचाराच्या घटनांकडेही लक्ष वेधणारी असून चिंताजनक आहे.

अपघातांत घट; मात्र गुन्हेगारी कायम चिंतेचा विषय!
रस्ते अपघातांच्या संख्येत काही प्रमाणात घट झाल्याचे आकडेवारीत दिसून येते. मात्र हत्या, अपहरण, अमली पदार्थ, जुगार आणि महिलांवरील अत्याचाराचे वाढते प्रमाण शहरातील कायदा-सुव्यवस्थेसाठी मोठे आव्हान असल्याचे चित्र समोर येत आहे.

पावसाळी अधिवेशनात नागपुरातील प्रश्न गाजणार?
मुंबई येथे सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनात नागपूर शहरातील वाढती गुन्हेगारी, अमली पदार्थांचे जाळे, जुगार आणि इतर अवैध व्यवसायांबाबत प्रश्न उपस्थित होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.
राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे गृहशहर असलेल्या नागपुरात समोर आलेली ही आकडेवारी गंभीर मानली जात आहे. शहरातील कायदा-सुव्यवस्था अधिक प्रभावी करण्यासाठी प्रशासन कोणती अतिरिक्त पावले उचलते, याकडे आता नागपूरकरांचे लक्ष लागले आहे.
पोलीस आयुक्त रवींद्र सिंघल यांच्या कार्यकाळात गुन्ह्याची आकडेवारी!
हत्या – 199
खुनाचा प्रयत्न – 390
अपहरण – 1,236
बलात्कार – 549
घरफोडी – 2,288
चोरी – 6,113
खंडणी – 148
दरोडे – 30
एकूण गंभीर गुन्हे – 10,953
(सदर वृत्त माहितीचा अधिकार अधिनियमांतर्गत नागपूर पोलीस आयुक्तालयाकडून प्राप्त झालेल्या अधिकृत आकडेवारीवर आधारित आहे.)
